शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

विषमता दूर झाली तरच नक्षलवाद संपेल:पद्मश्री डॉ.प्रकाश आमटे यांचे मत

Sunday, 12th June 2016 08:24:06 PM

 

ठाणे, ता.१३: समाजात सध्या असणारी विषमता आणि समाजावर होणारा अन्याय दूर झाला तरच नक्षलवादाची समस्या संपेल, असे मत ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ.प्रकाश आमटे यांनी व्यक्त केले. कल्याणमधील सुभेदार वाडा कट्ट्याच्या वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त डॉ.प्रकाश आणि डॉ.मंदाकिनी आमटे या दाम्पत्याची प्रकट मुलाखत घेण्यात आली. सुप्रसिद्ध निवेदक मिलिंद भागवत यांनी ही मुलाखत घेतली. त्यावेळी बोलताना डॉ.आमटे यांनी हे मत व्यक्त केले.

आम्ही आयुष्यभर निरपेक्ष भावनेने काम केले. ते करीत असताना कुठेही पैशांची मदत मागितली नाही. सामाजिक काम करण्यासाठीही पैसे लागतातच. परंतू आम्ही आमच्या गरजा कमी ठेवत लोकांच्या मनात अपराधीपणाची जाणीव निर्माण करण्यात यशस्वी ठरलो. या समाजाने भरभरून दिलेल्या आणि देत आलेल्या प्रेमाच्या बळावर आमचा हा खडतर, अशक्यप्राय प्रवास यशस्वीपणे करता आला. समाजात आजही संवेदना जागृत असल्याचे डॉ. प्रकाश आमटे यांनी सांगितले.

आज आपण पाहत असलेले हेमलकसा, इथले काम हे मूळातच बाबांची कल्पना. सहलीच्या बहाण्याने त्यांनी मला, विकासला इथे आणले आणि इथल्या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याचा विचार बोलून दाखवला. त्यावर मागचा पुढचा काही एक विचार न करता आपण ती जबाबदारी स्वीकारल्याचे ते म्हणाले. 

१९७३ मध्ये आम्ही इथे एक झोपडी बांधून आमच्या नवीन आयुष्याची सुरुवात केली. त्यावेळी इथे फक्त आणि फक्त जंगलच होते. ६-६ महिने घरच्यांशी संपर्क नसायचा. मात्र आम्ही आमच्या मनाची तयारी करून आलो असल्याने आपल्याला फारसा त्रास झाला नसल्याचे डॉ. मंदाकिनी आमटे यांनी सांगितले.

तसेच आपल्या शहरी भागातील लोकांच्या तुलनेत इकडचे लोक खूपच वास्तववादी, सुसंस्कृत असल्याचे आपल्याला वाटते. त्यांना माहिती आहे की आपण कोणत्या गोष्टीसाठी रडत बसलो तर आपल्याला जेवायला मिळणार नाही. त्यामुळेच त्यांच्याकडून आपल्यासारखा जगण्याचा किंवा संघर्षाचा कोणताही बाऊ केला जात नसल्याचेही मंदाकिनी आमटे यांनी सांगितले.

अशा प्रतिकूल परिस्थतीत पहिला आदिवासी रुग्ण आपल्याकडे येण्यासाठी बराच वेळ साधारणपणे २ वर्षे लागली. त्याठिकाणी आजारी व्यक्तीला मांत्रिकाकडे नेण्याची पद्धत होती. परंतु मांत्रिकानेही आशा सोडलेला एक रुग्ण आम्ही ठणठणीत बरा केला आणि मग हळूहळू आमच्याकडे उपचारासाठी हे आदिवासी लोक येऊ लागले. या २ वर्षांच्या काळात आम्ही त्यांच्या भाषेचा एक शब्दकोश तयार केला. त्यांच्याच भाषेत त्यांच्याशी संवाद साधू लागल्याने त्यांना आम्ही आपलेसे वाटू लागल्याचेही डॉ. प्रकाश आमटे यांनी सांगितले. तर एकीकडे २ पायाचे ते आदिवासी आणि दुसरीकडे माकड, अस्वल, बिबट्या यांसारखे विविध प्राणी यांच्यासोबत आमचा प्रवास सुरु होता. सरकारने आपल्याला उशिराने जागा दिल्यामुळेच मी आणि मंदाकिनी आम्ही एकत्र येऊ शकलो. नाही तर आतापर्यंत आपण अविवाहितच राहिलो असतो, असेही डॉ. प्रकाश आमटे यांनी मिश्कीलपणे सांगितले.

सुभेदार वाडा कट्टयाच्या सामाजिक कार्याचे कौतुक करीत जनरल एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. उल्हास कोल्हटकर यांनी संस्थेच्या सर्व शाखांमध्ये अशाच प्रकारचा उपक्रम राबविण्यासाठी आवाहन केले.

या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांनी सादर केलेल्या बाबूजींच्या अवीट गाण्यांना उपस्थितांनी अतिशय जोरदार दाद दिल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान या कार्यक्रमातून गोळा झालेला निधी डॉ. प्रकाश आमटे, दुष्काळग्रस्त आणि कर्करोगाने आजारी असणारे पत्रकार आशिष पाठक यांना देण्यात आला.

या कार्यक्रमाला खासदार कपिल पाटील, कल्याण डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर, जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ. उल्हास कोल्हटकर, झी २४ तासचे मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर, सुभेदार वाडा कटट्याचे अध्यक्ष दीपक जोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

(साभार-इनाडू इंडिया) 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
UZRMZ
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना