
डॉ.अभय बंग आणि डॉ.राणी बंग संचालित मानवी जीवन उंचविण्याचे वैशिष्ट्यपूर्ण कार्य करणारी 'सर्च'(सोसायटी फॉर एज्युकेशन, अॅक्शन अँड रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ) संस्था ही गडचिरोली जिल्ह्याच्या विकासात योगदान देणारी महत्त्वपूर्ण संस्था आहे. 26 ऑगस्ट 1982 ला गडचिरोली जिल्ह्याची स्थापना झाल्यानंतर लगेच चार वर्षांनंतर 1986 पासून जिल्ह्यात 'सर्च' संस्था कार्यरत आहे. जिल्ह्यातील 150 हून अधिक गावांमध्ये संस्थेचे काम नियमित सुरू आहे. संपर्क आणि सुविधांचा अभाव,अनारोग्य, अंधश्रद्ध आणि दारिद्र्याचा प्रभाव, नक्षलवादी, मागास जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्याचे नाव 'सर्च' संस्थेच्या कार्यामुळे आज देश-विदेशात पोहचले आहे. उच्च वैद्यकीय शिक्षणप्राप्त डॉ.बंग दाम्पत्याने लोकांचा सहभाग आणि संशोधन या दोन पद्धतींना आग्रही करीत गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्याशी संबंधित विविध समस्यांच्या निर्मुलनासाठी प्रयत्न केले. लोकांच्या मागणीनुसार, लोकांच्याच सहभागातून गडचिरोली जिल्ह्याची दारूबंदी 1993 मध्ये केली.
गावपातळीवर व्यसनमुक्ती शिबिर घेऊन जवळपास 3 हजार व्यक्तींना दारूमुक्तीचा उपचार दिला. कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू आणि त्यांचे वाढते प्रमाण थांबविण्यासाठी 'घरोघरी नवजात बाळाची काळजी'(घनाबाका)ही पद्धती शोधून गडचिरोलीसारख्या सामान्य ठिकाणी राहून असामान्य असे काम बंग दाम्पत्याने केले व जगाच्या नकाशात गडचिरोली जिल्ह्याचे नाव अधोरेखित केले. गडचिरोली जिल्हा अतिशय दुर्गम असून, गावात शासकीय यंत्रणेद्वारे पुरविण्यात येणारी वैद्यकीय मदत बरेचदा लवकर मिळत नाही. ही अडचण लक्षात घेऊन बंग दाम्पत्याने गावातील महिलांना विशेष प्रशिक्षण देऊन नवजात शिशूंना वाचविण्यासाठी एक वेगळा प्रयत्न केला. गावातील कमीशिक्षण घेतलेल्या महिलेला प्रशिक्षण देऊन बालमृत्यू दर 120 वरून 30 वर आणून दाखविला. देशात दरहजारी बालमृत्यू 75 असताना गडचिरोली जिल्ह्यातील 39 गावांमध्ये 'घरोघरी नवजात बाळाची काळजी'हा प्रयोग यशस्वी केला.
हा प्रयोग म्हणजेच बेअरफूट डॉक्टरचा प्रयोग. गडचिरोली जिल्ह्यात बेअरफूट डॉक्टर्स ही मोहीम डॉ.बंग यांनी प्रत्यक्षात उतरवून दुर्गम भागात राहणार्या लोकांसाठी एक नवी व्यवस्था निर्माण केली आणि खर्या अर्थाने 'आरोग्य स्वराज'ही संकल्पना साकार केली. गावातील लोकांच्या बैठका घेऊन, त्यांचे विचार समजून घेऊन, त्यांच्याचकडून उत्तरे काढून रोगाची वैद्यकीय व वैज्ञानिक कारणमीमांसा सांगायची आणि जितकी आधुनिक वैद्यकीय सेवा शक्य असेल ती पुरवायची, अशी ही प्रक्रिया आहे.
हायड्रोसील,हर्निया, फायलेरिया, पाठ, कंबरदुखी, मलेरिया, खरूज, सर्पदंश, गर्भाशयाचे आजार, जननेंद्रियाचे आजार, रक्तदाब, मधुमेह अशा विविध आजारांवर प्राथमिक उपचार व जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी संस्थेने मॉ दंतेश्वरी सेवक संगी यांची आदिवासी भागात, तर गैरआदिवासी भागात आरोग्य दूत नेमून आरोग्य सेवेची सोय उपलब्ध केली. गावात एक दिवसाचे तपासणी शिबिर घेऊनवेगवेगळ्या आजारांची तपासणी गावातच करून घेणे या द्वारेही अनेक गरजू रुग्णांना सर्च संस्थेद्वारे आरोग्य सेवा मिळाली व मिळत आहे. स्त्रियांमध्ये असलेल्या प्रजनन आजाराबाबत डॉ.राणी बंग यांनी स्वतः अभ्यास करून जिल्ह्यात मार्गदर्शन मेळावे घेतले. प्रत्यक्ष उपचारासाठी शस्त्रक्रिया शिबिरांची सोय उपलब्ध केली. आदिवासी भागात महिलांमध्ये विटाळाच्या वेळी वापरात येणारा 'कुर्मा'आदिवासी संस्कृतीची सांगड घालून आणखी कसा चांगला करता येईल, आदिवासी स्त्रीचे आरोग्य कसे जपता येईल यासाठी महिलांमध्ये जाऊन आणि कुर्म्याचे योग्य मॉडेल गावात उभारून नवा पायंडा घातला. आदिवासींच्या आरोग्यसुधार कार्यक्रमाबरोबरच त्यांचे जीवनमान कसे उंचावता येईल याकडेही बंग दाम्पत्याने लक्ष दिलं. गावात ग्रामकोष निर्माण करून बँक आणि बचतीचे मार्गही सुरू केले. या ग्रामकोषातून लोक अडीअडचणीला कर्ज घेऊन आपल्या गरजा भागवायला समर्थ झाले. शेतीत सेंद्रीय पद्धती कशी आणता येईल, यासाठी कृषी दूतांना प्रशिक्षण देऊन शेती सुधार कार्यक्रमही बंग दाम्पत्याने सुरू केला. गडचिरोली जिल्ह्यातील लोकांमध्ये असलेल्या अंधश्रद्धा, मागासलेपण व इतर कारणांमुळे असलेले मानसिकआजार कसे कमी करता येतील, यासाठी शहरात महागडे आणि तज्ज्ञ म्हणून ओळखले जाणार्या मानसिकरोगतज्ज्ञांना 'सर्च'मध्ये बोलावून जिल्ह्यात मानसिक उपचार कार्यक्रम दर महिन्याला सुरू केला.
जिल्ह्यातील महाविद्यालयात 'तारुण्यभान' शिबिरे घेऊन युवक व युवतींमध्ये वयात आल्यानंतर निर्माण होणारे प्रश्न व गैरसमज दूर करण्यासाठी सर्च संस्थेनं मोठं काम केलं आहे. अस्वस्थ आणि भरकटलेल्या तरुणाईला सामाजिक कामात जोडण्यासाठभ 'निर्माण'शिबिराची चळवळ 2006 पासून सुरू केली. याच शिबिरांची फलश्रूती म्हणून कारवाफा आणि पेंढरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एमबीबीएस असलेल्या अकोला आणि औरंगाबादच्या दोन तरुण डॉक्टरांनी वैद्यकीय सेवेला प्रारंभ केला. अकोला येथील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतलेल्या तरुणाने महावितरणमध्ये नोकरी पत्करून पेंढरीसारख्या दुर्गम भागात सेवा दिली.
अशा पद्धतीने 40 टक्के आदिवासी व 60 टक्के बिगरआदिवासी, गरिबी, अंधश्रद्धेने ग्रासलेल्या या गडचिरोली जिल्ह्यासाठी 'थिंक ग्लोबली, अॅन्ड लोकली' या पद्धतीने काम करीत बंग दाम्पत्याने एक नवी क्रांती आणली आहे. आरोग्याबाबतची जागृती लोकांमध्ये वाढवत लोकांना स्वावलंबी बनवीत आरोग्य स्वराज्याचे स्वप्न 'सर्च' संस्थेने साकारले आहे.