
ग्लोरी ऑफ आलापल्ली फॉरेस्ट
'ग्लोरी ऑफ आलापल्ली फॉरेस्ट' या शब्दसमुहातूनच आलापल्ली परिसरातील जंगलाच्या वैभवाची प्रचिती यावी. केवळ गडचिरोली जिल्ह्यातच नव्हे ; तर देश आणि विदेशातही आलापल्लीच्या सागवान लाकडांनी धूम मचवली आहे.
आलापल्ली वनविभागात दोन खूप जुने सागवान वृक्ष होते. हे वृक्ष 'राम' आणि 'लक्ष्मण'या नावाने प्रसिद्ध आहेत. 1960च्या सुमारास आलापल्ली वनविभागाचे तत्कालिन उपवनसंरक्षक एस.एम.बुटा यांनी त्या वृक्षांचे नामकरण केल्याची माहिती सांगितली जाते. आलापल्ली-भामरागड मार्गावरील जंगलात तलवाडा गावापासून दक्षिणेस 7किलोमीटर अंतरावर हे वृक्ष आहेत. त्यापैकी 'राम'नावाचा वृक्ष 1962मध्ये कोसळला.या वृक्षाचे महाकाय लाकूड अजूनही बल्लारपूर येथील वनविभागाच्या आगारात सुरक्षित ठेवले आहे. पर्यटक जेव्हा बल्लारपूरच्या लाकूड आगाराला भेट देतात; तेव्हा त्यांना हा वृक्ष मोहिनी घातल्याशिवाय राहत नाही. जंगलातील 'लक्ष्मण' वृक्ष अजूनही डौलाने उभा असून, त्याची गोलाई 360सेंटीमीटर व उंची 34मीटर एवढी आहे. आलापल्लीपासून 18 किलोमीटर अंतरावर 1953मध्ये 'ग्लोरी ऑफ आलापल्ली फॉरेस्ट' अर्थात 'वनवैभव आलापल्ली'ची निर्मिती करण्यात आली.यात 6हेक्टर क्षेत्र राखीव असून,त्यात सागवान, बिजा व बेल वृक्ष मोठ्या प्रमाणावर आढळतात. तेथे आढळणारे काही सागवान वृक्ष 400हून अधिक वर्षांचे असल्याचे सांगण्यात येते.
सोबतच तेंदू, बांबू, हिरडा, बेहडा, चारोळी असे लाखो रुपयांचे महसूल मिळवून देणारे गौण वनोपजही येथे आढळते. भारत देश पारतंत्र्यात असताना इंग्लंडच्या राणीसाठी आलापल्लीच्या जंगलातून तिच्यासाठी सागवान लाकडाचा पलंग बनवून नेण्यात आला होता, अशीही माहिती सांगितली जाते. या वनवैभवाच्या जवळच मिरकल येथील वनतलाव आहे. हेमलकसा येथील डॉ.प्रकाशआमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पाला भेट देणारे पर्यटक या वनतलावालाही आवर्जून भेट देतात.