
१९८२ साली स्वतंत्र गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाली. या निर्मितीला लोकचळवळीचा आयाम होता. मात्र, स्वतंत्र जिल्हा तर निर्माण झाला; पण या जिल्ह्याचे पालनपोषण करायचे कसे, याची नियोजनविषयक दृष्टी जिल्ह्यातील ज्या थोडयाथोडक्या मंडळींकडे होती; त्यात अरविंद सावकार पोरेड्डीवार यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. वडिलोपार्जीत 'सावकारी' असूनही सहकाराच्या अवघड आणि लोकोद्धारिक मार्गाची निवड करून अरविंद सावकारांनी या
जिल्ह्याला स्वयंभू बनविण्यासाठी 8 नोव्हेंबर 1985 ला दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना केली. तुटपुंज्या साधनसंपत्तीवर 14 शाखांनी सुरुवात झालेला या बँकेचा डोलारा आज 46 शाखा आणि 5 विस्तारकक्षांमध्ये विस्तारला, त्याची ही खडतर आणि तेवढीच वेचक-वेधक कहाणी.........
तो काळ गडचिरोलीवासीयांसाठी शैक्षणिक मागासलेपणाचा आणि दळणवळण व औद्योगिक साधनांच्या अभावाचा होता. 1882 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातून विभाजन झाल्यानंतर स्वतंत्र गडचिरोली जिल्हा जेमतेम रांगायला लागला होता. पण, स्वतःच्या पायावर या जिल्ह्याला उभे करायचे, तर त्याला सहकार क्षेत्राचा आधार देणे गरजेचे होते. कारण इथली माणसं गरीब. त्यांना दोनवेळच्या भोजनाची सदैव चिंता पडलेली. शहरापासून खूप दूर आणि जंगलाला लागून असलेल्या पाड्याला गाव समजून राहत असलेल्या इथल्या आदिवासी माणसांचं जीवन जंगलावरच पूर्णतः अवलंबून होतं. त्यात बदल करण्यासाठी अरविंद सावकार पोरेड्डीवारांनी 8 नोव्हेंबर 1985 ला दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना केली. केवळ 25 लाखांचे भागभांडवल व तुटपुंज्या साधनसंपत्तीवर सुरू झालेली ही बँक पहिल्या एक वर्षांत 14 शाखांवर पोहचली. पुढे 1986 ला बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक झाली आणि अरविंद सावकार पोरेड्डीवार बँकेचे पहिले अध्यक्ष झाले. 1986 ते 2001 या काळात 13 नवीन शाखा सुरू झाली. अशाप्रकारे बँकेने 27 शाखांमध्ये विस्तार केला. यातील 27 वी शाखा अतिदुर्गम व अविकसीत भाग असलेल्या एटापल्ली तालुक्यातील कसनसूर येथे सुरू झाली.
1992 च्या दरम्यान जिल्ह्यातील 28 आदिवासी सेवा सहकारी संस्थांचा आकडा 120 वर पोहचला आणि या संस्थांचे रूपांतर आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमध्ये झाले. 1997मध्ये अरविंद सावकारांचे कनिष्ठ बंधू प्रकाश सावकार पोरेड्डीवार बँकेचे अध्यक्ष झाले. याच सुमारास रिझर्व्ह बँकेने देशातील सहकारी बँकांना एनपीए नॉर्म्स लागू केल्यानंतरही दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नफ्यात ठेवण्याची किमया पोरेड्डीवार बंधूंनी केली. ही घोडदौड चालू असताना गडचिरोलीच्या बँकेने स्वयंसाहाय्यता बचत गटांचे खाते उघडून त्यांना कर्जपुरवठा करण्याचा धाडसी आणि महत्वाकांक्षी निर्णय घेतला, त्यावेळी राज्यातील सहकार क्षेत्रातील धुरिणांच्या भुवया उंचावल्या.
स्वयंसाहाय्यता बचत गटांचे कार्य पाहून भारावलेल्या नाबार्डने 2001-02 व 2007-08 या वर्षी बँकेला उत्कृष्ठ कार्यक्षमता पुरस्काराने सन्मानित केले.
आजमितीस बँकेकडे 8412 स्वयंसाहाय्यता बचत गटांचे खात असून, मागील वर्षीपर्यंत 2285 गटांना तब्बल 14 कोटींचे कर्जवाटप करण्याचे जिकरीचे कामही बँकेने केले आहे. तसेच 20 शाखेत ग्राहकांना संगणकाद्वारे बँकींगसेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 2007 मध्ये अरविंद सावकारांचे चिरंजीव प्रंचित पोरेड्डीवार यांनी बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा खांद्यावर घेतली आणि मग या उमद्या नेतृत्वाने बँकेला कात टाकायला लावली. आजबॅकेच्या चार शाखांमध्ये एटीएमची सुविधा असून, अन्य 8 शाखांमध्ये ती लवकरच सुरू करण्यात येणार आहे. यंदा बँकेच्या 10 नवीन शाखा सुरू झाल्या आहेत.
2011-12 ची गोष्ट. जिल्ह्यात पीक कर्जवाटपाचे लक्ष्य 29 कोटींचे असूनही, बँकेने 35 हजार शेतकरी सभासदांना तब्बल 35 कोटींचे कर्जवाटप करून इतर राष्ट्रीयकृत बँकांच्या तुलनेत 65 टक्के हिस्सा उचलण्याचे काम बँकेने केले. यापूर्वी बँकेला दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटीव्ह बँक असोसिएशनतर्फे 'कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ठ जिल्हा मध्यवर्ती बँक' म्हणून राज्यातून सन्मानित करण्यात आले आहे.
वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून प्रंचित पोरेड्डीवार यांनी सहकार क्षेत्राला नवी दिशा देण्याचे काम केले आहे. बचत गटांच्या बाबतीत नोबेल पुरस्कार मिळविणारे प्रो. मोहम्मद युनूस यांची ढाका येथे भेट घेऊन प्रंचित सावकारांनी त्यांच्याकडूनही बचत गटांच्या समृद्धीचे धडे गिरवले, हेही नसे थोडके. आज बँकेचे भागभांडवल 11 कोटींवर पोहचले असून, 606 कोटींच्या ठेवी आहेत. कोरचीपासून तर असरअलीपर्यंत बँकेची सेवा सुरू आहे. एका कौलारू घरात सुरू झालेल्या बँकेचे कार्यालय आजएखाद्या कार्पोरेट कंपनीसारखे आहे.
केवळ बँकेच्या नव्हे, तर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातूनही पोरेड्डीवारांनी मोठी कामगिरी केली आहे. आज आरमोरी व देसाईगंज येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची उलाढाल प्रचंड असून, शेतकर्यांसाठी ती वरदान ठरलेली आहे.
बँकेच्या या प्रगतीसाठी अरविंद सावकारांचे दृष्टे व्यक्तिमत्त्व कारणीभूत आहे. माणसं जोडण्याची आणि ती टिकवून ठेवण्याची लकब त्यांच्यात नसती, तर आज बँंकेने आणि या जिल्ह्यानेही सहकार क्षेत्रात नावलौकिक मिळवला नसता. राज्यातील, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील मोठमोठ्या पुढार्यांच्या सहकारी बँका अवसायनास निघाल्या असताना गडचिरोलीची सहकारी बँक मात्र सदैव नफ्यात ठेवण्याचे कौशल्यही त्यांचेच आहे. या कौशल्यामुळेच अरविंद सावकार 1992 पासून आजतागायत राज्य सहकारी मार्केटिंग फेडरेशनचे संचालक व उपाध्यक्ष राहिले. राज्याची शिखर बँक दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे संचालक व उपाध्यक्ष म्हणूनही त्यांच्या पदाचा उपयोग राज्याच्या सहकारी चळवळीला झाला, हे येथे सांगावेच लागेल. पण, नजरेत भरणारं कार्य करूनही या माणसाला विधिमंडळ चालविणार्यांनी 'नजरअंदाज' केलं,ही या जिल्ह्याची शोकांतिकाच म्हणावी लागेल.
केवळ सहकारच नव्हे; तर कला, साहित्य व शैक्षणिक क्षेत्राशी त्यांची आंतरिक जवळीक आहे. या सर्वांवर प्रेम करताना अरविंद सावकारांनी विविध राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांपासून ते गावच्या कार्यकर्त्यांपर्यंत संबंध टिकवून ठेवले. दिवंतग शंकरराव चव्हाण, सुधाकरराव नाईक, विलासराव देशमुख, शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, पतंगराव कदम अशा कित्येक मोठ्या नावांशी या निगर्वी मनाने नाते जोडलेले आहे. म्हणूनच मोठ्यांपासून लहानांपर्यंत कोणीही या जिल्ह्यात आला, तर तो अरविंद सावकारांची आठवण केल्यावाचून परत जात नाही, ही या सहकारमहर्षीच्या आयुष्यातली सर्वांत मोठी 'पुंजी' आहे, हे येथे मुद्दाम नमूद करावेसे वाटते.