
आरमोरी तालुक्यातील वैरागड हे ऐतिहासीक वारसा लाभलेले ठिकाण म्हणून प्रसिध्द आहे. येथील विराट राज्याचा किल्ला, भंडारेश्वर देवस्थान, गोरजाई माता मंदिर, एकोरी माता मंदीर अशी विविध स्थळे प्रसिध्द असून त्याचबरोबर येथील पाच पांडव देवस्थान प्रसिध्द आहे. प्राचीन काळात येथे पाच पांडवांनी वास्तव्य केल्याची आख्यायिका आहे. त्यामुळे वैरागड येथील पाच पांडव देवस्थानला पौराणिक काळापासून विशेष महत्व आहे.
वैरागड पासून 1 किमी अंतरावर 'निसर्ग सानिध्यात' वसलेले पाच पांडव देवस्थान आहे. हे देवस्थान एका तलावाकाठी वसलेले आहे.मंदिरात पौराणीक असून मंदिरात तीन घोडे आहेत. मध्यभागी असलेला काळा घोड्याला विशेष महत्व आहे. पूर्वी याघोड्यावर पांढरा वाघ बसून राहत असल्याचे गावातील जुने नागरीक सांगतात.या घोड्याच्याखाली असलेला शेंदूर लावलेला दगड जमिनीतून बाहेर आल्याचे सांगण्यात येते. शेंदूर लावलेली वस्तू दगड आहे की, अन्य कोणत्या धातूची आहे, याचा अद्याप उलगडा न झाल्याचे भाविक सांगतात. या शेंदूररूपी गोट्याला 'त्रिशूल' म्हणून ओळखले जाते.
या त्रिशूलाच्या मागे दगडाच्या दोन मूर्ती आहेत. पाच पांडवाचे मूख पूर्वेकडेच्या दिशेने असून समोरच आपट्याचे (शमी) झाड आहे. या पांडव अज्ञातवासात असताना याच शमी वृक्षाच्या झाडाखाली आपली शस्त्रे ठेवल्याचे भाविकांकडून सांगण्यात येते. पांडवानी शस्त्रे ठेवले शमी वृक्षाचे झाड प्राचीन काळापासून 'जसे-थे' अवस्थेत असल्याचे जुन्या नागरिकांकडून सांगण्यात येते. पाच पांडव देवस्थानच्या डाव्या बाजूस एक कडूलिंबाचे झाड होते. या झाडाची विशेषतः म्हणजे झाडाच्या पूर्वेकडील दिशेची पाने खाल्यास ती गोड स्वरूपात, तर पश्च्मि भागाकडील पाने खाल्यास या पानाची चव कडू लागत असल्याचे सांगण्यात येते. मात्र अज्ञात व्यक्तीकडून हे कडूलिंबाचे झाड बुडापासून नष्ट करण्यात आले. पूर्वीच्या काळी शेकडो दिंड्या घेऊन भाविक पाच पांडवाच्यादर्शनाला येत होते. पावसाचा दुष्काळ, रोगराईची साथ पसरल्यास पुजा, अर्चना केल्याने संकट दूर होत असल्याचे भाविकांमध्ये समज आहे. पाच पांडवांना 14 वर्षाचा वनवास भोगावा लागल्यानंतर दोन वर्षाच्या अज्ञात वासाच्या काळात धर्मराज युधिष्ठीर याने कंकण, भिमाने बंग, अर्जुनाने बृहगंदा, नकुलने अवर्तक, सहदेवाने तिरूत्तक तर द्रोपदीने सह्याद्री या नावांनी आपले नामांतर व वेषभूषा बदलवून विराट राजाच्या नगरीत वास्तव्य केले. विराट नगरीत वास्तव्य करण्यापूर्वी पांडवानंी आपली शस्त्रे किल्याच्या दोन किमी अंतरावरील शमीच्या झाडावर ठेवली होती. तेव्हा पासून या स्थळाला पाच पांडव देवस्थान नाव पडल्याचे सांगण्यात येते.
पाच पांडव देवस्थान भाविकांचे श्रध्दास्थान असून येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. या देवस्थानच्या विकासाठी शासन व प्रशासनाने सर्वोतपरी मदत केल्यास हे पौराणिक देवस्थान ऐतिहासीक पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास येईल, याकडे लक्ष देण्याची मागणी भाविक भक्तांकडून केली जात आहे.