सोमवार, 29 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  आयपीएलवर ऑनलाईन सट्टा: दहा जणांना अटक, अहेरी पोलिसांची कारवाई             रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत           

अशोक नेतेंच्या नावेला तारुन देण्यासाठी पोरेड्डीवार सावकारांचे नेतृत्व सज्ज

Tuesday, 16th April 2024 12:32:38 AM

आरमोरी,ता.१६:गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील भाजपाच्या उमेदवाराविषयी लोकांमध्ये नाराजीचा सूर उमटत असला; तरी पोरेड्डीवार परिवाराकडे असलेली खंद्या कार्यकर्त्याची फौज, दांडगा जनसंपर्क आणि  निवडणुकीचे सुक्ष्म नियोजन यामुळे पोरेड्डीवारांच्या नेतृत्वात यावेळी अशोक नेते यांची नाव तारुन निघेल, अशी चर्चा जोर धरु लागली आहे.

गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात भाजपचे अशोक नेते आणि काँग्रेसचे डॉ.नामदेव किरसान यांच्यासह एकूण दहा उमेदवार रिंगणात आहेत. अशोक नेते यांनी दहा वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. परंतु मागील पाच वर्षांत ते जनसंपर्कात कमी पडल्याने मतदारांमध्ये थोडी नाराजी आहे.अशा परिस्थितीत अरविंद सावकार पोरेड्डीवार आणि प्रकाश सावकार पोरेड्डीवार यांचे कुशल नेतृत्व अशोक नेते यांना बळ देण्यासाठी कामाला लागले आहे.

गडचिरोली जिल्हा अस्तित्वात येण्यापूर्वी तत्कालीन चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणात  त्यावेळचे आमदार  स्व.नामदेवराव सावकार पोरेड्डीवार यांचे मोठे प्रस्थ होते. चंद्रपूर जिल्ह्याचे राजकारणही त्यावेळी आरमोरीतूनच चालायचे. दोन्ही जिल्हयांमध्ये त्यांना मानणारा वर्ग होता. त्यानंतर त्यांची परंपरा त्यांचें पुत्र ज्येष्ठ सहकार नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार व प्रकाश सावकार पोरेड्डीवार यानी यशस्वीपणे पुढे चालवत कार्यकर्त्यांचा गोतावळा टिकवून ठेवला. पोरेड्डीवार घराण्याचा जिल्ह्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि सहकार क्षेत्रात गेल्या कित्येक दशकांपासून मोठा प्रभाव आणि दबदबा राहिला आहे. 

गडचिरोली जिल्ह्याचे नाव राज्याच्या सहकार क्षेत्रात पोरेड्डीवार सावकार यांच्यामुळे घेतले जाते. गडचिरोली जिल्ह्यातील मध्यवर्ती सहकारी बँक, कृषी उत्पन्न बाजार समित्या असोत की सहकारी संस्था; गेल्या कित्येक वर्षांपासून त्या सावकारांच्या ताब्यात आहेत. नुकत्याच आठ-नऊ महिन्यांपूर्वी झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आरमोरी आणि गडचिरोली कृषी उत्पन्न बाजार समितीवर पोरेड्डीवार  सावकारांनी एकहाती सत्ता आणून विरोधकांना पाणी पाजले, तर सिरोंचा कृषी उत्पन्न बाजार समितीतसुध्दा त्यानी बहुमत मिळविले. इतकेच नाही, तर अनेक खासदार, आमदार, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद व पंचायत समिती सभापती, सदस्य निवडून आणण्यात त्यांनी नेहमी किंगमेकरची भूमिका बजावली आहे. अनेक लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची धुरा पोरेड्डीवार सावकारांनी सांभाळली आहे.

गडचिरोली जिल्ह्यासह आरमोरीला लागून असलेल्या ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातही पोरेड्डीवारांचा प्रभाव आहे. त्यांचें खंदे कार्यकर्ते, युवकाची फळी व कार्यकर्त्यांची निष्ठा यामुळे लोकसभा क्षेत्रातील आरमोरी, गडचिरोली व ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात सावकारांची ताकद वाढलेली आहे. त्याचा फायदा या निवडणुकीत अशोक नेते यांना मिळण्याची शक्यता आहे. तिन्ही विधानसभा क्षेत्रात सावकारांनी प्रचाराची यंत्रणा कार्यान्वित केली आहे. त्यामुळे सावकाराच्या नेटवर्कला भेदण्यात काँग्रेसचे उमेदवार डॉ.नामदेव किरसान कितपत यशस्वी होतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

……………………………


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
60O8S
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना