![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
लख्खामेंडा येथील महाभारतकालिन अवशेष अहेरी-सिरोंचा मार्गावर रेपनपल्ली हे गाव आहे. या गावापासून काही अंतरावर लख्खामेंडा येथे एक डोंगर आहे. या डोंगरावर असलेले महाभारतकालिन अवशेष आदिवासींचे श्रद्धास्थान बनले आहे. लोक सांगतात की, महाभारत काळात पांडवांनी लख्खामेंडा येथील डोंगरावर 'लक्षगृह' बांधले होते. यावरून या डोंगराला लख्खामेंढा नाव पडले. पुढे कौरवांनी हे लक्षगृह जाळून टाकले. मात्र, या लक्षगृहाच्याविटा अजूनही त्याची साक्ष देत आहेत. या विटा दोन फूट लांबीच्या असून जमिनीखाली दबलेल्या आहेत. येथून एक भुयारी मार्गही गेला आहे. परंतु तो कुठपर्यंत गेला, याची माहिती नाही. देखभालीअभावी हा भुयारी मार्ग बुजला आहे. कौरवांनी लक्षगृह जाळल्यानंतर पांडव याच भुयारी मार्गाने बाहेर निघून गेले, अशी आख्यायिका सांगितली जाते. या डोंगरावर एक तलावदेखील आहे. डोंगरावरून या तलावात पाणी पडत असल्याने तेथ धबधब्याचे दृश्य दिसते. या तलावाचे पाणी पिकावर शिंपडल्यास पिकावरील रोगराई नष्ट होते, असे लोक सांगतात. त्यादृष्टीने संशोधन होणे गरजेचे आहे. या ठिकाणी एक गुहासुद्धा आहे. या गुहेला स्थानिक बोलीभाषेत 'राक्षसी दोना'असे म्हणतात. या ठिकाणी मोठमोठे दगड असून, डोंगरावर चढण्यासाठी अरुंद पायवाटही आहे. वरच्या भागात डोंगर, तर खाली दरी आहे. लोक अजूनही येथे श्रद्धेने पूजाअर्चा करण्यासाठी येतात. दामरंचा, कमलापूर, भंगारामपेठा, जिमलगट्टा, छल्लेवाडत्त, ताटीगुडम, कोडसेलगुडम, देचलीपेठा, राजाराम, अहेरी, आलापल्ली व अन्य ठिकाणचे लोक लख्खामेंडाच्या दर्शनासाठी अजूनही येतात |