मंगळवार, 19 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

एका कॉम्रेडचा अपारंपरिक विवाह

Sunday, 12th April 2015 10:44:52 PM

 

 

 

गडचिरोली, ता.१२/जयन्त निमगडे

गडचिरोली जिल्हा परिषदेचे सदस्य आणि युवा कम्युनिस्ट नेते
कॉ. अमोल मारकवार आज(ता.१२) आरमोरी येथे सत्यशोधक पद्धतीने विवाहबद्ध झाले. पारंपरिक रितीरिवाजांना फाटा देत या कडव्या कम्युनिस्टाचा वैचारिक संसार सुरु झाला, त्याची ही गोष्ट....

अारमोरी हे गाव तसे कम्युनिस्ट चळवळीसाठी प्रसिद्धच आहे. कॉ.हरिपाल खोब्रागडे, कॉ. चंद्रभान मेश्राम अशा जुन्या कम्युनिस्टांनी येथे गोरगरिबांची चळवळ रुजविली. त्यांच्याच तालमीत डॉ. महेश कोपुलवार, हिरालाल येरमे, जगदीश मेश्राम, अमोल मारकवार, विशाल दामपल्लीवार अशा कार्यकर्त्यांची फौज तयार झाली. पैसा आणि खोटया प्रतिष्ठेच्या मर्यादित विश्वपरिघाला भेदून ही मंंडळी गोरगरिबांसाठी टाचा घासू लागली. रस्त्यावर संघर्ष करताना हे लोक वैचारिकतेचा बुरुजही अभेद्य ठेवतात. अगदी वैयक्तिक जीवनातही हा विचारप्रवाह मार्ग बदलण्याचा विचार करीत नाही. त्याचे प्रत्यंतर काॅ.अमोल मारकवार यांच्या लग्ननिमित्त आले. 

अमोल मारकवार हे आज नांदेड जिल्हयातील किनवट येथील अर्चना आचकुलवार यांच्याशी विवाहबद्ध झाले. अमोलने विवाहपत्रिका देताना मार्क्सवादी सिद्धांताप्रमाणे गरीब-श्रीमंत अशी दरी ठेवली नाही. अगदी हमालापासून तर खासदार, आमदारांपर्यंत एकच पत्रिका पोहचली. पत्रिकेवर दैववादाला थारा नव्हता. पत्रिकेवरील देवदेवतांसाठी राखीव असलेली जागा महापुरुषांनी घेतली होती.

लग्नात ना भटजी, ना मंगलाष्टके, ना अक्षता, ना बँडबाजा. बस्स ! कॉ. भालचंद्र कांगोंनी शपथ दिली आणि दोघांचा वैचारिक संसार सुरु झाला. नवरदेव आपल्या नेहमीच्या कपडयातच बोहल्यावर चढला. नवरदेव-नवरीच्या भोवताल नातेवाईकांचा गोतावळा नव्हता, तर होते चळवळीतील नेते आणि कार्यकर्ते. आणि हो.... अख्खा मंच समर्पित होता अंधश्रद्धा निर्मुलन करता-करता शहीद झालेले डॉ.नरेंद्र दाभोळकर आणि महाराष्ट्राला खरा शिवाजी सांगता-सांगता गोळया झेलणारे कॉ.गोविंद पानसरे यांच्या स्मृतींना ! विवाहानंतर समाजप्रबोधनपर गितांचा कार्यक्रम झाला. अमोलचे प्रात्यक्षिक जीवन बघितल्यामुळे भालचंद्र कांगो यांच्यासारख्या ज्येष्ठ विचारवंतालाही औरंगाबाद महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या धामधुमीतून वेळ काढून आरमोरीला येण्याचा मोह आवरता आला नाही. आ.विजय वडेट्टीवार, माजी आमदार हिरामण वरखडे, कॉ. श्याम काळे आदींनाही हा कार्यक्रम टाळला आला नाही. वि

वाहाच्या अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत परंपरेला फाटा देणाऱ्या या "अपारंपरिक उर्जास्त्रोता"पासून समाज प्रेरणा घेईल........?


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
E440A
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना