शनिवार, 18 मे 2024
लक्षवेधी :
   अज्ञात वाहनाच्या धडकेत युवा अभियंता ठार: देसाईगंज येथील घटना             अस्वलाच्या हल्ल्यात तेंदूपाने तोडणारा मुलगा जखमी, कोरची तालुक्यातील खसोळा येथील घटना             रुग्णवाहिका खड्ड्यात जाताच झाली महिलेची प्रसूती, कोरची तालुक्यातील प्रकार           

जादुटोणा प्रकरण: दोघांना जिवंत जाळणाऱ्या १५ जणांना ५ दिवसांची पोलिस कोठडी

Saturday, 4th May 2024 06:11:58 AM

गडचिरोली,ता.४: जादुटोणा केल्याच्या संशयावरुन गावकऱ्यांनी एका महिलेस दोन जणांना जिवंत जाळल्याप्रकरणी एटापल्ली पोलिसांनी १५ जणांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

महाराष्ट्र हादरवून टाकणारी ही घटना १ मे रोजी एटापल्ली तालुक्यातील बारसेवाडा येथे घडली होती. गावातील काही नागरिकांनी जमनी देवाजी तेलामी(५२) व देवू कटिया आतलामी(५७) यांना बेदम मारहाण करुन नंतर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्यात आले.

काही दिवसांपूर्वी बारसेवाडा येथील आरोही बंडू तेलामी या साडेतीन वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. शिवाय गावातील काही जण आजारीही पडले होते. जमनी तेलामी हिने एका वस्तूद्वारे जादुटोणा केल्यानेच आरोहीचा मृत्यू झाला आणि इतर जण आजारी पडले, असा गावकऱ्यांचा संशय होता. त्यामुळे काही नागरिकांनी जमनी तेलामी हिच्या घरी जाऊन जाब विचारला. मात्र, तिने ती वस्तू आपल्याकडे नसून, देवू आतलामी याच्याकडे असल्याचे सांगितले. त्यानंतर गावकरी जमनीला घेऊन देवूच्या घरी गेले. त्यांनी दोघांनाही बेदम मारहाण केली आणि नंतर गावाबाहेरील नाल्यात दोघांच्याही अंगावर पेट्रोल ओतून त्यांना जाळून टाकले.

दुसऱ्या दिवशी जमनीचा वासामुंडी येथे राहणारा भाऊ शाहू मोहनंदा याने पोलिसांत तक्रार केली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी तत्काळ छडा लावण्याचे आदेश दिले. त्यानुसार अपर पोलिस अधीक्षक एम.रमेश, उपविभागीय पोलिस अधिकारी चैतन्य कदम, पोलिस निरीक्षक नीळकंठ कुकडे यांनी गावात जाऊन चौकशी केली.

त्यानंतर अजय तेलामी, भाऊजी तेलामी, अमित मडावी, मिरवा तेलामी, बापू तेलामी, सोमजी तेलामी, दिनेश तेलामी, श्रीहरी तेलामी, मधुकर पोई, अमित तेलामी, गणेश हेडो, मधुकर तेलामी, देवाजी तेलामी, दिवाकर तेलामी व बिरजा तेलामी यांना भादंवि कलम ३०२, ३०७, २०१, १४३, १४७, १४९, सहकलम ३(२) महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व्‍ अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंधक अधिनियमान्वये अटक करण्यात आली. यातील आरोपी देवाजी तेलामी हा मृत जमनी तेलामी हिचा पती, दिवाकर तेलामी हा मुलगा आहे.

आरोपींना अहेरी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली, अशी माहिती पोलिस निरीक्षक नीळकंठ कुकडे यांनी दिली.

अंनिस पदाधिकाऱ्यांनी घेतली अपर पोलिस अधीक्षकांची भेट

बारसेवाडा येथील घटनेनंतर आज अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुरेश झुरमुरे, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष अॅड.गोविंद भेंडारकर, मनोहर हेपट यांनी गडचिरोली येथे अपर पोलिस अधीक्षक एम.रमेश आणि यतीश देशमुख यांची भेट घेतली. जादुटोण्याच्या संशयावरुन दोघांना मारहाण करण्यास प्रवृत्त करणाऱ्यांवरही कठोर कारवाई व्हावी अशी मागणी अंनिस पदाधिकाऱ्यांनी केली. शिवाय अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाने महाराष्ट्र जादुटोणाविरोधी कायद्यासंदर्भात जनजागृती करण्याकरिता पुढाकार घेतल्यास अंनिस सहकार्य करेल, असे आश्वासनही दिले.

…………………


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
4EPCA
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना