रविवार, 19 मे 2024
लक्षवेधी :
   अज्ञात वाहनाच्या धडकेत युवा अभियंता ठार: देसाईगंज येथील घटना             अस्वलाच्या हल्ल्यात तेंदूपाने तोडणारा मुलगा जखमी, कोरची तालुक्यातील खसोळा येथील घटना             रुग्णवाहिका खड्ड्यात जाताच झाली महिलेची प्रसूती, कोरची तालुक्यातील प्रकार           

बालंबाल बचावले गडचिरोलीचे पोलिस! टिपागड पहाडावर आढळली शक्तीशाली स्फोटके

Monday, 6th May 2024 01:05:10 AM

गडचिरोली,ता.६: लोकसभा निवडणुकीदरम्यान नक्षल्यांनी टिपागड पहाडावर दडवून ठेवलेली शक्तीशाली स्फोटके पोलिसांनी आज सकाळी हुडकून काढली. यामुळे मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा घातपात करण्याचा नक्षल्यांचा कट फसला.

पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलला गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राची निवडणूक झाली. या निवडणुकीदरम्यान नक्षल्यांनी टिपागड परिसरात स्फोटके दडवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. परंतु त्यावेळी ही स्फोटके पोलिसांना सापडली नाही. शिवाय मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त असल्यामुळे नक्षल्यांनाही घातपात करता आला नाही. परंतु काल स्फोटके असल्याची खात्रीशिर माहिती मिळाल्यानंतर सी-६० पोलिस आणि केंद्रीय राखीव दलाचे जलद प्रतिसाद पथक तसेच बॉम्ब शोधक व नाशक विभागाचे दोन पथक टिपागड परिसरात पाठविण्यात आली. या पथकातील जवानांनी पहाडावर दडवून ठेवलेली स्फोटके, क्लेमोर माईन्स आणि प्रेशर कुकर्स हुडकून काढली.

पोलिसांना घटनास्थळी स्फोटकांनी भरलेली ६ प्रेशर कुकर्स, डेटोनेटर्स, स्फोटके असलेली ३ क्लेमोर माईन्स आणि ३ रिकामी क्लेमोर माईन्स आढळून आली. शिवाय गन पावडर, ब्लँकेट आणि औषधीही तेथे सापडली. त्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या पोलिसांनी ही स्फोटके आणि क्लेमोर माईन्स नष्ट केली, अशी माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली. पोलिस जवळच्या पोलिस ठाण्यात सुखरुप पोहचल्यानंतर तेथे नक्षल्यांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही ते म्हणाले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
182S1
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना