सोमवार, 6 मे 2024
लक्षवेधी :
  जादुटोण्याच्या संशयावरुन वृद्धाला दिले तप्त सळाखीचे चटके, एटापल्ली तालुक्यातील दुसरी घटना             जादुटोणा प्रकरण: दोघांना जिवंत जाळणाऱ्या १५ आरोपींना ५ दिवसांची पोलिस कोठडी             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             आयपीएलवर ऑनलाईन सट्टा: दोघांवर गुन्हे दाखल, देसाईगंज पोलिसांची कारवाई             गडचिरोली जिल्हा हादरला: जादुटोण्याच्या संशयावरुन दोघांना जीवंत जाळले, १४ जणांना अटक, एटापल्ली तालुक्यातील बारसेवाडा येथील घटना             ठाणेगाव येथून १८ लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त, तिघे जण ताब्यात: स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई             छत्तीसगडमधील चकमकीत गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत चार नक्षल कमांडर ठार           

एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृत्यू प्रकरण: आणखी एकास अटक

Friday, 27th October 2023 08:08:01 AM

गडचिरोली,ता.२७:अहेरी तालुक्यातील महागाव(बु)येथील कुंभारे परिवारातील पाच जणांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी आणखी एकास अटक केली आहे. अविनाश ताजने रा.खामगाव, जि.बुलढाणा असे आरोपीचे नाव असून, तो मुख्य आरोपी संघमित्रा कुंभारे हिचा मित्र आहे. मुंबई येथून विष खरेदी करण्यासाठी अविनाशनेच संघमित्राला पैसे पुरविल्याचे पोलिस तपासात सिद्ध झाले आहे.

शंकर तिरुजी कुंभारे(५५) हे महागाव(बु) येथील रहिवासी होते. गावातच त्यांचे फर्निचरचे दुकान होते. त्यांना पत्नी विजया(४९), सागर(३२) व रोशन(२९) ही दोन मुले आणि कोमल विनोद दहागावकर(३१) ही विवाहित मुलगी होती. मोठा मुलगा सागर याने टाटा इन्स्टीट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमधून एमएसडब्लूचे शिक्षण घेतले असून, सध्या तो दिल्ली येथे एका नामांकित संस्थेत कार्यरत आहे. लहान मुलगा रोशन हा डाक विभागात नोकरीला असून, त्याच विभागात कार्यरत संघमित्रा गवई(मु.पो.अकोला) हिच्याशी डिसेंबर २०२२ मध्ये त्याचा विवाह झाला होता.

२६ सप्टेंबर २०२३ ला शंकर कुंभारे यांचा दवाखान्यात मृत्यू झाला, तर दुसऱ्या दिवशी २७ सप्टेंबरला पत्नी विजया कुंभारे यांनीही प्राण सोडला. त्यानंतर मुलगी कोमल दहागावकर हिने ८ ऑक्टोबरला प्राण सोडला. पुढे १४ ऑक्टोबरला विजया कुंभारे यांची बहीण आनंदा उराडे यांची प्राणज्योत मालवली, तर लहान मुलगा रोशन याचा १५ ऑक्टोबरला मृत्यू झाला. सागर कुंभारे आणि वाहनचालक राकेश मडावी हे अजूनही उपचार घेत असून, दोघांचीही प्रकृती सुधारत आहे.

२० दिवसांच्या कालावधीत एकापाठोपाठ एक अशा पाच जणांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र खळबळ माजली. कुणी विषबाधेने मृत्यू झाला म्हणत होते, तर कुणी घातपाताची शंका व्यक्त करीत होते. पोलिसांपुढेही पाच जणांच्या मृत्यूचे कारण शोधण्याचे आव्हान उभे ठाकले होते. अखेर पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी चौकशीचे आदेश दिले. अपर पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड, पोलिस निरीक्षक मनोज काळबांडे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी यांच्या नेतृत्वात चार तपास पथके गठित करण्यात आली. यात सहायक पोलिस निरीक्षक राहुल आव्हाड, पोलिस निरीक्षक बालाजी सोनवणे यांचाही सहभाग होता. या पथकांनी गोपनीय यंत्रणा सक्रिय करुन तपास सुरु करताच पाच जणांच्या मृत्यूचे गूढ उकलण्यास सुरुवात झाली. पाचही जणांना संघमित्राने विष पाजून ठार केल्याचे तपासात उघड झाले.

पाचही जणांच्या हत्येत शंकर कुंभारे यांचा लहान मुलगा रोशन याची पत्नी संघमित्रा आणि रोशनची मामी रोजा रामटेके यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली. त्यांची १० दिवसांची पोलिस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने पुन्हा चार दिवसांची कोठडी वाढवून दिली. तपासादरम्यान संघमित्रा कुंभारे हिचा जुना मित्र असलेला खामगाव येथील अविनाश ताजने याने तिला विष खरेदी करण्याकरिता पैसे पुरविल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन काल(ता.२६) त्याला खामगावातून अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

संघमित्रा कुंभारे व अविनाश ताजने हे शालेय जीवनापासून मित्र आहेत. संघमित्राचा रोशन कुंभारेशी विवाह झाल्यानंतर तिचा अविनाशशी काही दिवस दुरावा निर्माण झाला. परंतु मध्यंतरीच्या काळात संघमित्रा ही उपचारार्थ अकोला येथे तिच्या माहेरी गेल्यानंतर पुन्हा ती अविनाश ताजनेच्या संपर्कात आली. तेव्हा तिने सासरच्या मंडळींकडून त्रास होत असल्याचे अविनाशला सांगितले. हळूहळू दोघांमधील संबंध वाढले आणि संघमित्राने सासरच्या मंडळींना ठार करण्याची योजना अविनाशला सांगून त्याची मदत मागितली. पुढे संघमित्राच्या सांगण्यावरुन अविनाशने दोनवेळा विष खरेदी केले. त्यासाठी पैसेही त्यानेच दिले. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
A5KJ4
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना