शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

नवोदय विद्यालयाने उच्च दर्जाचे विद्यार्थी घडविले:डॉ. वाय.आर. जॉन्सन

Monday, 9th December 2019 08:05:54 AM

घोट,ता.९ : येथील जवाहर नवोदय विद्यालयाने उत्कृष्ट दर्जाचे विद्यार्थी घडविले असून, ते देश-विदेशात उच्च पदावर कार्य करीत आहेत. ही परंपरा कायम राहील, असे प्रतिपादन या विद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. वाय आर जॉन्सन यांनी केले.

घोट येथील जवाहर नवोदय विद्यालयात रविवारी(ता.८) माजी विद्यार्थ्याचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, यावेळी मार्गदर्शन्‍ करताना ते बोलत होते. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून खासदार अशोक नेते, तर अध्यक्ष स्थानी विद्यालयाचे प्राचार्य नागेश्वर राव उपस्थित होते. १९८७ ला स्थापन झालेल्या जवाहर नवोदय विद्यालयाने नानाविध अडचणींवर मात करुन प्रगतीचे शिखर गाठले. १९९२ ते १९९६ या कालावधीत प्राचार्य म्हणून कार्यभार सांभाळणारे डॉ. वाय आर जॉन्सन यांनी त्यावेळच्या विद्यार्थ्याना दर्जेदार शिक्षणाच्या प्रवाहात आणले. याची जाणीव ठेवून डॉ. वाय आर जॉन्सन यांना या कार्यक्रमासाठी खास कन्याकुमारी येथून विशेष अतिथी मानून पाचारण करण्यात आले होते.

जवाहर नवोदय विद्यालयातील समस्यांची सोडवणूक केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे आश्वासन खा. अशोक नेते दिले. याप्रसंगी सामाजिक बांधिलकीची जाणीव म्हणून २४ जणांनी रक्तदान केले.

नवोदय माजी विद्यार्थी संघटनेच्या(नेस्मो) वतीने वर्तमान विद्यार्थ्यांमधून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सतीश चिचघरे, डॉ.जयंत पर्वते, डॉ.यशवंत दुर्गे, अनिल तिडके, पंकज घोरमोडे, डॉ. सचिन मडावी, आशिष सोरते व इतर माजी विद्यार्थांनी सहकार्य केले.

गडचिरोलीच्या विकासासाठी सरसावले माजी विद्यार्थी

आजच्या मेळाव्याला नवोदयचे २५० माजी विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी रातुम नागपूर विद्यापीठात प्रोफेसर असलेले डॉ.श्याम कोरेटी यांनी गडचिरोलीत केंद्रीय विद्यापीठ आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. अभय नन्नावरे(भाप्रसे)यांनी विद्यार्थ्यांनी यूपीएससी व एमपीएससीतील यशाचे गमक काय, यावर मार्गदर्शन केले. ‘नेस्मो’चे अध्यक्ष ओमप्रकाश साखरे यांनी नवोदयच्या विकासासाठी सदैव कार्यरत राहू, असे सांगितले. तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी नवोदय विद्यालयाएवढे पोषक वातावरण कुठेही उपलब्ध नाही, असे नेस्मोचे सचिव प्रा.राकेश चडगुलवार म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन धीरज खोब्रागडे, तर आभार विद्यालयाचे शिक्षक श्री.पिंपळकर यांनी मानले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
40S8D
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना