शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

अंतर्गत वाद व संशयामुळेच कमांडर गोपीचे आत्मसमर्पण!

Saturday, 15th November 2014 02:38:32 AM

 
गडचिरोली, ता़१५
जवळपास १५ वर्षे नक्षल चळवळीत राहून हिंसक कारवाया करून वरिष्ठ नक्षलवाद्यांचा विश्वास संपादन करणार्‍या गोपीवरच सहकार्‍यांकडून संशय व्यक्त करण्यात येत होते़ त्यामुळे त्याचे वरिष्ठ नक्षल्यांशी बिनसले होते़ त्यातच त्याची प्रेयसी चकमकीत मारल्या गेल्याने गोपी एकटा पडला होता़ एकीकडे वरिष्ठांचा संशय आणि प्रेयसी गमावल्याचे दु:ख यामुळे गोपीने अखेर पोलिसांपुढे आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती पुढे आली आहे़
निरिंगसाय मडावी उर्फ गोपी याने रविवारी ९ नोव्हेंबर रोजी सावरगावच्या जंगलात एका सहकार्‍याच्या माध्यमातून पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले़ मूळचा कोरची येथील रहिवासी असलेला गोपी २००२ मध्ये नक्षल दलममध्ये सहभागी झाला़ अनेक हिंसक कारवाया केल्यानंतर त्याला कोरची तालुका दलम कमांडर म्हणून बढती देण्यात आली़ पुढे त्याला उत्तर गडचिरोली-गोंदिया विभागीय समितीचा सदस्यही बनविण्यात आले़
दरम्यान आधीच विवाहित असलेल्या गोपीची नक्षल चळवळीतील शामको उर्फ शांता कोरचा हिच्याशी ओळख झाली़ ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले़ त्यामुळे गोपीचे चळवळीतील कारवायांवर लक्ष लागेना़ याची माहिती मिळताच वरिष्ठ नक्षल्यांनी त्याच्या हालचालीवर पाळत ठेवण्यास सुरुवात केली़ वरिष्ठ नक्षली त्याच्यावर संशय घेऊ लागले़ यासंदर्भात नक्षल्यांच्या केंद्रीय कमिटीचा सदस्य व राज्य कमिटीचा सचिव मिलिंद तेलतुंबडे यांनी उत्तर गडचिरोली-गोंदिया डिव्हिजनल कमिटीचा कमांडर पहाडसिंह उर्फ कुमारसाय कतलामी यास गोपी आणि शामकोच्या प्रेम प्रकरणाबाबत एक पत्र लिहिले़ ‘गोपी के साथ लगातार राजनैतिक संवाद जारी रखो़ दोनों को एकसाथ नहीं रखना़ गोपी को दृढता से खडा करना बहुत जरूरी है़ उसे फिलहाल अकेला अलग जिम्मेदारी में नही भेजना, अपने साथ रखो’ असा मजकूर त्या पत्रात होता़ यावरून गोपीचा वरिष्ठ नक्षल्यांशी असलेला वाद विकोपाला गेला आणि गोपी व शामको यांना वेगवेगळे ठेवण्यात येऊ लागले़ वरिष्ठांच्य या कृतीमुळे गोपी व शामको यांच्या मनात संताप निर्माण झाला़ त्यातच १७ फेब्रुवारी २०१४ रोजी कोरची तालुक्यातील बेतकाठी येथे झालेल्या पोलिस-नक्षल चकमकीत शामको ठार झाली़ यामुळे गोपी पूर्णपणे हतबल झाला़ एकीकडे प्रेयसी गेली आणि दुसरीकडे वरिष्ठांचा संशय यामुळे जगायचे कसे, याचा विचार गोपी करू लागला़ आत्मसमर्पण करण्याचे विचार त्याच्या मनात घोंगावू लागले़ त्याची ही मानसिकता ओळखून पोलिसांनी एका मध्यस्थामार्फत त्याच्यावर दबाव वाढविला़ अखेर गोपीने पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले़ त्यावेळी गोपीची प्रकृती बरी नव्हती़ तो तापाने फणफणत असल्याने पोलिसांनी त्यास रुग्णालयात दाखल केले़ आता तो बरा झाला असून, पोलिसांना सहकार्य करीत असल्याचे सांगितले जात आहे़


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
0AGT5
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना