शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

नक्षल्यांनी लाकूड बिट जाळले, अनेक ठिकाणी बॅनर व रस्त्यांची अडवणूक

Sunday, 19th May 2019 11:11:44 PM

गडचिरोली, ता.१९: आज पुकारलेल्या जिल्हा बंदला हिंसक वळण देण्याचा प्रयत्न करीत नक्षल्यांनी पहाटे कुरखेडा तालुक्यातील वारवी(चिपरी),तसेच एटापल्ली तालुक्यातील गुरुपल्ली येथील वनविभागाच्या लाकूड बिटांना आग लावली. भामरागड तालुक्यातील कुमरगुडा येथे रोलर जाळला. शिवाय एटापल्ली व भामरागड तालुक्यात ठिकठिकाणी पत्रके टाकून रस्त्यांची अडवणूक केली.

२७ एप्रिलला झालेल्या चकमकीत जहाल नक्षली रामको नरोटी व शिल्पा दुर्वा ह्या ठार झाल्याचा दावा पोलिसांनी केला होता. मात्र, ही चकमक खोटी होती आणि दोघींनाही पोलिसांनी यातना देऊन ठार केले, असा आरोप नक्षल्यांनी बॅनर व पत्रकांमधून केला आहे. शिवाय या घटनेच्या निषेधार्थ १९ मे रोजी जिल्हा बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. 

बंदच्या पार्श्वभूमीवर, नक्षल्यांनी आज पहाटे कुरखेडा तालुक्यातील वारवी(चिपरी) येथील जंगलात वनविभागाच्या लाकूड बिटांना आग लावली. घटनास्थळ पुराडा वनपरिक्षेत्रातील असून, येडापूर व कुरंडी कुपातील लाकडे तोडून ती वारवी येथील जंगलात ठेवण्यात आली होती. जंगल कामगार सहकारी संस्थांनी ही लाकडे तोडून ठेवली होती. मात्र, नक्षल्यांनी ती जाळून टाकल्याने वनविभागाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 

नक्षल्यांनी घटनास्थळी पत्रक व बॅनर लावून त्यावर बिट कटाई करणाऱ्या वनकर्मचाऱ्यांना हाकलून लावा, जल, जंगल व जमिनीवर जनतेचा अधिकार आहे, असा मजकूर लिहिला आहे. 

दक्षिण गडचिरोलीतील भामरागड तालुक्यातील कुमरगुडा येथे नक्षल्यांनी रस्त्याच्या कामावरील रोलरची जाळपोळ केली. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत हे काम सुरु होते. शिवाय आज आलापल्ली-एटापल्ली मार्गावरील गुरुपल्ली गावाजवळ लाकडे आडवी टाकून रस्ता अडविला. तसेच त्या ठिकाणी दोन महिन्यांपूर्वी जाळलेल्या ट्रकला बॅनर बांधला. भामरागड तालुक्यातही ठिकठिकाणी बॅनर बांधले. शिवाय गुरुपल्ली येथील जंगलात असलेल्या वनविभागाच्या लाकूड डेपोलाही आगीच्या स्वाधीन केले. त्यामुळे वनविभागाचे मोठे नुकसान झाले आहे. भामरागडच्या आधी असलेल्या पर्लकोटा नदीवर बॅनर बांधले. 

दुर्गम भागात बाजारपेठा बंद.......

नक्षल बंदच्या दिवशी कोरची, भामरागड शहर व या तालुक्यांमधील दुर्गम भागातील बाजारपेठा बंद आहेत. अनेक रस्त्यांवरही शुकशुकाट आहे. दरम्यान पोलिसांनी सीमावर्ती भागात हाय अॅलर्ट जारी केला असून, अतिसंवेदनशील २५ पोलिस ठाण्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
U8163
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना