शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

गडचिरोली-चिमूर क्षेत्रातून अशोक नेते यांना पुन्हा भाजपची उमेदवारी जाहीर

Thursday, 21st March 2019 07:40:53 AM

गडचिरोली, ता.२१: होळीचे दहन आणि रंगपंचमीची धूळवड संपल्यानंतर आज संध्याकाळी भाजपने आपल्या १८२ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातून विद्यमान खासदार अशोक नेते यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्री जे.पी.नड्डा यांनी आज नवी दिल्ली येथील भाजप कार्यालयात संध्याकाळी साडेसात वाजता पत्रकार परिषद घेऊन पहिल्या यादीतील १८२ उमेदवारांची घोषणा केली. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, गृहमंत्री राजनाथसिंह, दळणवळण मंत्री नितीन गडकरी या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील १६ मतदारसंघांचा समावेश आहे नितीन गडकरी(नागपूर), डॉ. हिना गावीत(नंदूरबार), डॉ.सुभाष भामरे(धुळे), रक्षा खडसे(रावेर),संजय धोत्रे(अकोला),रामदास तडस(वर्धा), अशोक नेते (गडचिरोली-चिमूर) हंसराज अहीर(चंद्रपूर),रावसाहेब दानवे(जालना), कपिल पाटील(भिवंडी), गोपाल शेट्टी (मुंबई उत्तर), पूनम महाजन(उत्तर मध्य मुंबई), सुजय विखे(अहमदनगर),डॉ.प्रीतम मुंडे(बीड), सुधाकर शृंगारे(लातूर), संजयकाका पाटील(सांगली) यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. 

गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील पाचपैकी चार भाजप आमदारांनी विद्यमान खासदार अशोक नेते यांना पुन्हा उमेदवारी देण्यास विरोध दर्शविल्यानंतर नाही-नाही म्हणत पक्षश्रेष्ठींनी पुन्हा अशोक नेते यांनाच उमेदवारी बहाल केली आहे.

आज भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली, त्यात अशोक नेते यांचे नाव आहे. अशोक नेते यांच्या पाच वर्षातील कारकिर्दीबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी नाखूश आहेत, तसेच पाचपैकी चार आमदारांनी नेते यांना विरोध केल्याने पक्षनेतृत्व दुसऱ्या उमेदवारांच्या नावाबाबत चाचपणी करीत आहे, अशा आशयाच्या बातम्या अनेक वर्तमानपत्रे व सोशल मीडियातून प्रकाशित झाल्या. त्यावर जिल्ह्यातील भाजपच्या प्रवक्त्याने खुलासाही केला. तरीही गडचिरोलीचे आमदार डॉ.देवराव होळी व राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना भाजपची उमेदवारी मिळेल, असा तर्क कार्यकर्ते लावत होते. मात्र, विरोध कायम असूनही भाजपने अशोक नेते यांनाच पुन्हा उमेदवारी दिली आहे. आता भाजपचे ते चार आमदार नेते यांचा प्रचार मनापासून करतात की कसे, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मात्र, पक्षातीलच चार आमदार आणि काही पदाधिकाऱ्यांचा जोरदार विरोध असतानाही तिकिट खेचून आणल्याने अशोक नेते यांचे पक्षातील वजन पुन्हा एकदा सिद्ध झाले असून, विरोधक तोंडघशी पडले आहेत.

कोण आहेत अशोक नेते

भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चाचे वजनदार नेते म्हणून ओळख असलेल्या अशोक नेते यांनी पक्ष संघटनेत अनेक महत्वाची पदे भूषविली आहेत. १९९१ ते ९४ या कालावधीत श्री.नेते हे भाजयुमोचे तालुकाध्यक्ष होते. १९९४ ते ९७ पर्यंत भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्षपद त्यांनी सांभाळले. १९९७ ते ९९ पर्यंत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष, १९९९ मध्ये अनुसूचित जमाती मोर्चाचे राज्य सरचिटणीस, २००१ मध्ये भाजपचे राज्य सचिव, २००६ ते २००९ या कालावधीत ते अनुसूचित जमाती मोर्चाचे राष्ट्रीय सदस्य, २००९ मध्ये श्री.नेते यांच्याकडे अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्षपद व जुलै २०१७ पासून अनुसूचित जमाती मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशी महत्वाची पदे अशोक नेते यांनी पक्षात भूषविली आहेत.

१९९९ ते २००९ अशी दहा वर्षे ते गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार होते. परंतु २००९ मध्ये त्यांना लोकसभा व विधानसभा अशा दोन्ही निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. पुढे २०१४ मध्ये अशोक नेते लोकसभा निवडणुकीत विजयी झाले. आता पुन्हा त्यांनाच उमेदवारी मिळाली आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
P1E60
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना