बुधवार, 1 मे 2024
लक्षवेधी :
  आयपीएलवर ऑनलाईन सट्टा: दहा जणांना अटक, अहेरी पोलिसांची कारवाई             रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत           

ही वेळ बेभान सत्ताधाऱ्यांना नियंत्रित करण्याची-अॅड.प्रकाश आंबेडकर

Sunday, 12th August 2018 07:46:07 AM

गडचिरोली, ता.१२: जेव्हा सत्ताधारी मंडळी बेभान होतात;तेव्हा प्रशासनही बेभान होऊन वागू लागतं. अशा वेळी गरिबाचं मोठं नुकसान होतं. सध्याचे सत्ताधारी हेच काम करीत असून, अशा बेभान सत्ताधाऱ्यांना नियंत्रित करण्याची वेळ जवळ आली आहे, असे प्रतिपादन भारिप-बहुजन महासंघाचे नेते व वंचित आघाडीचे संयोजक अॅड.प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी आज येथे केले.

येथील कात्रटवार भवन येथे वंचित आघाडीच्या वतीने आयोजित संवाद यात्रेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून 'उपरा'कार लक्ष्मण माने, माजी आमदार हरिदास भदे, अॅड.विजय मोरे, रोहिदास राऊत, सीताराम टेंभुर्णे, बाळू टेंभुर्णे, माला भजगवळी, प्रा.प्रकाश दुधे, श्री.मगरे उपस्थित होते. 

अॅड.आंबेडकर पुढे म्हणाले, ७० वर्षांत वंचितांना कुणीच स्वीकारलं नाही. त्यांना पाहिजे तसं शिक्षण मिळालं असतं, तर त्यांनी आरक्षण मागितलं नसतं. ही व्यवस्थाच ओरबडणारी व्यवस्था आहे. येथे कोण रक्तबंबाळ होईल हे सांगता येत नाही. केंद्रातील सरकार हे अतिविद्वान लोकांचं सरकार आहे. त्यामुळेच गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्याला वैद्यकीय महाविद्यालय देण्यात येत नाही, अशी टीका अॅड.आंबेडकर यांनी केली. गेल्या ७० वर्षांत समाजासमाजात भांडण लावण्याचे काम केले गेले. आता मात्र समाज जागृत होत आहे. त्यामुळे सत्ता भोगणाऱ्या नेत्यांना वाळीत टाकण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे, असे आंबेडकर म्हणाले.

नरेंद्र मोदी हे बेभान झाले आहेत. ते आकडे फुगवून सांगतात. जीएसटीमुळे शासनाच्या तिजोरीत किती पैसा आला, याचे उत्तर मोदींकडे नाही. पेटीएम व विजाकार्डच्या माध्यमातून भारतीयांचा पैसा विदेशी कंपन्यांच्या घशात घालण्यात येत असल्याची टीकाही त्यांनी केली. पंतप्रधान आपली शैक्षणिक कागदपत्रे दाखवायला तयार नाहीत. खोटं बोलण्याची प्रवृत्ती देशाच्या सर्वोच्च माणसात नसावी. देशाचा कुटुंबप्रमुखच खोटं बोलत असेल, तर इतरांचे काय, असा सवाल अॅड.आंबेडकरांनी केला.

पंतप्रधानांच्या विमानात कोण बसलं होतं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीला गेले होते. त्यावेळी त्यांच्या विमानात कोण बसले होते, याचा खुलासा पंतप्रधानांनी करावा, अशी जोरदार मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली. पंतप्रधान बाहेर देशात जातात; तेव्हा त्यांच्या शिष्टमंडळात कोणाचा समावेश असावा, याची यादी पंतप्रधानांच्या संमतीशिवाय तयार होऊच शकत नाही. त्यामुळे देशाला चुना लावून देश सोडून जाणारे लोक त्यांच्या विमानात बसतात, असा गंभीर आरोप अॅड.आंबेडकर यांनी केला.

'उपरा'कार लक्ष्मण माने म्हणाले की, येथे वंचित समुहांवर नेहमी अन्याय केला जातो. मूळ निवासी असलेल्या आदिवासींना छळले जाते. ग्रामसभांचं ऐकून घेतलं जात नाही. हा देश आजही गुलाम असून, येथे कुणीही स्वतंत्र नाही, अशी टीका त्यांनी केली. यावेळी माजी आमदार हरिदास भदे, रोहिदास राऊत, श्री.मगरे यांनीही सभेला संबोधित केले. कार्यक्रमाचे संचालन बाळू टेंभुर्णे, तर आभाप्रदर्शन माला भजगवळी यांनी केले.

वंचितांना १२ जागा दिल्या तरच आघाडी:अॅड.प्रकाश आंबेडकर

येत्या लोकसभा निवडणुकीत वंचित समुहासाठी लोकसभेच्या १२ जागा सोडल्या तरच काँग्रेसशी आघाडी करु, असे अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. सर्किट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत अॅड.आंबेडकर यांनी सांगितले की, पंढरपूरच्या धनगर समाजाच्या मेळाव्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप, सेनेकडे जायचे नाही,असा निर्धार करण्यात आला. त्यानंतर अलुतेदार, बलुतेदार, भटके व विमुक्त यांनीही तीच भूमिका घेतली. या सर्वांना एकत्र करुन सामाजिक ऋण फेडण्यासाठी वंचित आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. ही आघाडी विधानसभेच्या किमान ५० जागा लढवेल. मात्र, आघाडीचा प्रस्ताव आलाच तर लोकसभेच्या किमान १२ जागा आम्ही मागू, असे अॅड.आंबेडकर म्हणाले. या जागांमध्ये धनगर, माळी, ओबीसी, लहान ओबीसी, भटके व विमुक्त व मुस्लिम या घटकांना प्रत्येकी २ जागा मागण्यात येतील, आंबेडकरांनी स्पष्ट केले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
SYKWA
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना