शनिवार, 11 मे 2024
लक्षवेधी :
  बालंबाल बचावले गडचिरोलीचे पोलिस! टिपागड पहाडावर आढळली शक्तीशाली स्फोटके             जादुटोण्याच्या संशयावरुन वृद्धाला दिले तप्त सळाखीचे चटके, एटापल्ली तालुक्यातील दुसरी घटना             जादुटोणा प्रकरण: दोघांना जिवंत जाळणाऱ्या १५ आरोपींना ५ दिवसांची पोलिस कोठडी             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             आयपीएलवर ऑनलाईन सट्टा: दोघांवर गुन्हे दाखल, देसाईगंज पोलिसांची कारवाई             गडचिरोली जिल्हा हादरला: जादुटोण्याच्या संशयावरुन दोघांना जीवंत जाळले, १४ जणांना अटक, एटापल्ली तालुक्यातील बारसेवाडा येथील घटना           

'गोंडवाना'च्या कुलगुरुंच्या कक्षाबाबतचे गडकरींचे विधान विद्यापीठाचा अपमान करणारे:अॅड.गोविंद भेंडारकर

Saturday, 14th July 2018 08:52:46 PM

गडचिरोली, ता.१५: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरुंच्या कक्षाबाबत काढलेले विधान हे विद्यापीठाचा अपमान करणारे असल्याची टीका सिनेट सदस्य अॅड.गोविंद भेंडारकर यांनी केली आहे.

अॅड.गोविंद भेंडारकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ८ जुलै रोजी नागपुरातील गांधीसागर तलावाजवळील शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांवर निवडून आलेल्या 'शिक्षक मंच' या संघटनेच्या उमेदवारांचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिक्षक मंच ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाची विद्यापीठ क्षेत्रात काम करणारी संघटना आहे. त्यामुळे नितीन गडकरी यांनी त्यांचे कौतुक आणि सत्कार करणे ही स्वाभाविक गोष्ट आहे. त्यावर आमचा काहीही आक्षेप नाही. 

परंतु या कार्यक्रमात त्यांनी गरज नसताना गोंडवाना विद्यापीठाचे कुलगरू डॉ. नामदेव कल्याणकर यांच्या विद्यापीठातील कक्षाबाबत अतिशय खालच्या पातळीवरील उद्गार काढून समस्त गोंडवाना विद्यापीठाचा अपमान केला आहे. गडकरी म्हणाले की, 'मी अलिकडेच गोंडवाना विद्यापीठात गेलो होतो. तेथील कुलगुरूंचे कक्ष इतके अस्वच्छ आहे की, त्यापेक्षा स्वच्छतागृह म्हणजेच संडास बरा असतो. तेथे आपणास बसण्याचीही इच्छा होत नव्हती'.

गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या कक्षाची संडासशी तुलना करणे, यावरून गडकरी यांची मानसिकता लक्षात येते. कोणीही सामान्य माणूस विचार करेल की, भारतातातील एखाद्या सरकारमान्य विद्यापीठाच्या कुल्गुरुचे कक्ष इतके वाईट असू शकेल का?  की ज्याची तुलना त्यांनी संडासशी करावी. गडकरींचे हे विधान म्हणजे पूर्व विदर्भातील शिक्षक, प्राद्यापक व विद्यार्थ्यांचा अपमान आहे, असे अॅड.गोविंद भेंडारकर यांनी म्हटले आहे. 

नितीन गडकरी यांनी कोतेपणाने असे उद्गार का काढले, हेही स्पष्ट आहे. नागपूर विद्यापीठात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीची शिक्षण मंच ही संघटना विजयी होते, पण, या संघटनेची डाळ गोंडवाना विद्यापीठात शिजली नाही. हे त्यांचे खरे दु:ख आहे. 

त्याचप्रमाणे कुलगुरू डॉ. कल्याणकर हे संघाच्या शिस्तीमधील नाहीत, हेही शल्य त्यांना बोचणारे आहे. भाजपच्या नेत्यानी गोंडवाना विद्यापीठ चंद्रपूरला पळवून नेण्यासाठी जंग जंग पछाडले. परंतु त्यांना ते शक्य झाले नाही.  मुख्यमंत्री हे गोंडवाना विद्यापीठाच्या क्षेत्रातील आहेत. अर्थमंत्री मुनगंटीवार हे चंद्रपूरचे आहेत. परंतु त्‍यांना इतकी वर्षे गोंडवाना विद्यापीठासाठी शंभर-दीडशे एकर जागा मिळवणे जमले नाही. त्यांना ते अशक्य नव्हते. मात्र, त्यांची इच्छाशक्ती नव्हती. 

परंतु हे काम एकट्याने कुलगुरू डॉ. कल्याणकर यांनी राज्यपालांच्या सहकार्याने केले. हे भाजप नेत्यांच्या मनात खुपत आहे. म्हणून त्याचा वचपा काढण्यासाठी गडकरींसारखे नेते कुलगुरु व विद्यापीठाचा अपमान करीत आहेत. हा केवळ विद्यापीठाचाच नव्हे, तर आदिवासी बांधवांचाही अपमान असल्याची टीका अॅड.गोविंद भेंडारकर यांनी केली आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
5OZH3
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना