शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

गोंडवाना विद्यापीठाची बदनामी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार:कुलगुरु डॉ.कल्याणकर

Friday, 29th June 2018 05:55:02 AM

गडचिरोली, ता.२९:गोंडवाना विद्यापीठात होत असलेल्या नोकरभरतीबाबत भ्रष्टाचाराचा आरोप करणारा मजकूर व्हॉटस्अॅपवर व्हायरल झाल्यानंतर शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचले असून, कुलगुरु डॉ. नामदेव कल्याणकर यांनी आज तातडीची पत्रकार परिषद घेऊन विद्यापीठाची बदनामी करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करु, असा इशारा दिला.

दोन दिवसांपासून व्हॉटस्अॅपवर 'जाहीर आवाहन-१०० टक्के भ्रष्ट गोंडवाना विद्यापीठातील २०१८-१९ नोकरभरतीवर बहिष्कार टाका व विरोध करा' या मथळ्याखाली एक मजकूर व्हायरल होत आहे. प्रत्येकच पदवीधर मुलगा आईवडिलांनी काटकसर करुन वाचविलेले पैसे खर्च करुन अभ्यास करतो व नोकरीसाठी प्रयत्न करीत असतो. परंतु गोंडवाना विद्यापीठाची नोकरभरती असली, की त्याचा भ्रमनिरास होतो. हे विद्यापीठ नोकरभरतीत शंभर टक्के घोटाळा करीत आहे, अशा आशयाचा मजकूर व्हॉटस्अॅपवर व्हॉयरल होत असून, त्यात विविध कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी किती पैसे घेतले जातात, याचा उल्लेख केला आहे. यापूर्वीच्या काळात एकाच घरचे ३-४ लोक या विद्यापीठात नोकरीवर लागले. आताही असाच घोटाळा होत आहे. परंतु लोकप्रतिनिधींचेही उमेदवार नोकरीवर लागत असल्याने ते बोलत नाही, असा आरोपही या मजकुरात करण्यात आला आहे.

हा मजकूर व्हायरल झाल्यानंतर आज कुलगुरु डॉ.नामदेव कल्याणकर यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, सध्या राज्यात सर्वप्रकारच्या पदभरतीवर बंदी आहे. परंतु गोंडवाना विद्यापीठ नवीन असल्याने व '१२ ब' साठी संपूर्ण पदे भरणे आवश्यक असल्याने शासनाने विशेष बाब म्हणून पदभरतीला मान्यता दिली आहे. त्यानुसार १५ शिक्षक व २० शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वीच २० शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे भरण्याची जाहिरात राज्य पातळीवर प्रकाशित करण्यात आली. त्यात २५ जून ही अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख होती. या २० पदांसाठी तब्बल १७०० उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. सर्व प्रक्रिया नियमानुसारच होत आहे. असे असताना व्हॉटस्अॅपवर नोकरभरतीत घोटाळा होत असल्याचा आरोप करणारा मजकूर प्रसिद्ध होत आहे. हे क्लेशदायक असून, विद्यापीठाची बदनामी करणारी बाब आहे. अशी बदनामी आपण सहन करणार नाही व या विरोधात आपण पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केल्याची माहिती कुलगुरु डॉ.कल्याणकर यांनी दिली. पोलिस लवकरच मजकूर प्रसिद्ध करणाऱ्याचा शोध घेतील, असा विश्वास व्यक्त करुन डॉ.कल्याणकर यांनी दोषी व्यक्ती विद्यापीठाशी संबंधित असली; तरी त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा दम दिला.

पूर्वीच्या काळात काय झाले, याविषयी आपणास माहिती नाही. मात्र, आपण कुलगुरु झाल्यापासून विद्यापीठात गैरप्रकाराला थारा दिला नाही. नोकरभरती पारदर्शकपणे होणार असून, गुणवत्ताधारक उमेदवारांचीच निवड होईल, असे ठामपणे सांगून कुलगुरु डॉ.कल्याणकर यांनी गैरप्रकार करणाऱ्यांपासून उमेदवारांनी सावध राहावे व तसे काही आढळल्यास विद्यापीठाला माहिती द्यावी, असे आवाहन केले. पत्रकार परिषदेला प्र-कुलगुरु डॉ.चंद्रशेखर भुसारी, प्रभारी कुलसचिव डॉ.ईश्वर मोहुर्ले उपस्थित होते.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
U5JG0
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना