रविवार, 23 सप्टेंबर 2018
लक्षवेधी :
  शिक्षक बदली घोटाळ्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी सभापती विश्वास भोवते यास अटक, न्यायालयीन कोठडीत रवानगी             कोंबडी चोरुन खाल्ली म्हणून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास ५ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा-जिल्हा व सत्र न्यायालयाचा निवाडा             नक्षल्यांनी कमलापूरच्या मुख्य चौकात बांधले बॅनर, परिसरात दहशत             राष्ट्रीय ओबीसी महासंघाने जाळला ११ सप्टेंबरचा ओबीसींवर अन्याय करणारा जीआर             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
96%
नाही :
4%

बस्तरचे पोलिस अधीक्षक आरिफ शेख आयएसीपी ऑस्कर अवॉर्डने सन्मानित

Sunday, 5th November 2017 01:20:22 PM

गडचिरोली, ता.५: प्रचंड जोखिम असलेल्या नक्षलग्रस्त क्षेत्रात सोशल पुलिसिंगच्या माध्यमातून सर्वोत्कृष्ठ सामाजिक कार्य केल्याबद्दल छत्तीसगडमधील बस्तरचे पोलिस अधीक्षक आरिफ शेख यांना नुकतेच इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ चीफ ऑफ पोलिसद्वारा 'आयएसीपी' अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे.  'सोशल पुलिसिंग'साठी मिळालेला हा पुरस्कार जगभरातील पोलिसांसाठी सर्वोच्च पुरस्कार समजला जातो.

आयएसीपीद्वारे दिला जाणारा हा पुरस्कार छत्तीसगडने सलग दुसऱ्यांदा पटकावला असून, आरिफ शेख यांनाच तो मिळाला आहे. यापूर्वी बालोदचे पोलिस अधीक्षक असताना श्री.शेख यांनीच हा पुरस्कार पटकावला होता. होमलँड सेक्युरिटी म्हणजे जोखमीच्या क्षेत्रात सर्वोत्कृष्ठ सामाजिक कार्य केल्याबद्दल हा पुरस्कार मिळाल्याने त्याचे महत्त्वही अनन्यसाधारण आहे. आयएसीपी ही संस्था जगातील २०० हून अधिक देशांमधील पोलिसांच्या कामगिरीचे मूल्यांकन करुन सर्वोत्कृष्ठ काम करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना पुरस्काराने सन्मानित करीत असते.

सद्य:स्थितीत देशात बस्तर जिल्हा सर्वाधिक नक्षलग्रस्त आहे. मात्र आरिफ शेख यांनी पोलिस अधीक्षकपदाची सूत्रे सांभाळल्यानंतर बस्तरमध्ये 'आमचो बस्तर-आमचो पुलिस' नामक अभियान राबविणे सुरु केले. अल्पावधीतच या अभियानाचे चांगले परिणाम बस्तरमध्ये दिसू लागले. या अभियानाच्या माध्यमातून नक्षल विचारधारेशी जुळलेल्या मुलांचे पुनर्वसन करण्यात येत आहे. शिवाय बाल संगममध्ये काम करणाऱ्या मुलामुलींना नक्षल चळवळीतून बाहेर काढून त्यांना शिक्षण देण्याचे कामही बस्तर पोलिस करीत आहेत. आतापर्यंत एक डझनहून अधिक मुलामुलींना शिक्षण देण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. 

आरिफ शेख यांना २२ ऑक्टोबर रोजी अमेरिकेतील फिलाडेल्फीया येथे आयोजित खास समारंभात जगातील २४ देशांच्या निवडक पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. 

आरिफ शेख यांची विचार आणि काम करण्याची पद्धतच न्यारी आहे. बस्तरच्या पोलिस अधीक्षकपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी आपले अधिनस्थ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सामाजिक पुलिसिंगबद्दल मार्गदर्शन केले. याचदरम्यान दरभा पोलिस नक्षलवादग्रस्त कोलेंग भागात नक्षलशोध अभियान राबवीत होते. पोलिसांना पाहताच काही अल्पवयीन मुले पळू लागली. पोलिसांनी त्यांना पकडून आपल्या सोबत नेले. पोलिस अधीक्षक आरिफ शेख यांना ही माहिती मिळताच ते दरभा येथे गेले. त्यांनी त्या मुलांशी दीर्घ चर्चा केली. नक्षलवादी मुलांना गावाच्या चारही दिशांना एका विशिष्ट ठिकाणी उभे राहण्यास सांगून पोलिस येत असल्याची सूचना देण्याचे फर्मान सोडतात. तसेच कधीकधी मुलांना कपडे आणि भांडी धुवायला लावतात, त्यांना शाळेत जाऊ देत नाही, असे चर्चेअंती आरिफ शेख यांच्या लक्षात आले. त्याचवेळी श्री.शेख यांनी दरभा पोलिस संरक्षणात मुलांची संपूर्ण जबाबदारी स्वीकारण्याचे मनोमन ठरविले. मुलांना शाळेत दाखल करुन त्यांचा सर्व खर्च पोलिस विभागाद्वारे करण्याचे निर्देश त्यांनी अधिनस्थ अधिकाऱ्यांना दिले. आज मुले शाळेत जात असून, ते आपल्या घरी जाऊ इच्छित नाही. या सामाजिक कार्यामुळेच दरभा व लोहंडीगुडा क्षेत्रातील मारडूम व बिनता परिसरातील नक्षलवाद जवळपास संपुष्टात आला आहे. 'आमचो बस्तर, आमचो पोलिस' या अभियानामुळे नागरिकांमध्ये पोलिसाबाबत वर्षानुवर्षापासून असलेली धारणा बदलत असून, ते पोलिसांना आपले मित्र मानू लागले आहे. आरिफ शेख थेट लोकांमध्ये मिसळत असल्याने त्यांची लोकप्रियताही वाढत आहे.      'आमचो बस्तर, आमचो पोलिस' या अभियानांतर्गत झिराम खेड्यात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बस्तरचे आयजी विवेकानंद सिन्हा, दंतेवाड्याचे डीआयजी सुंदरराज पी. आणि आरिफ शेख या कार्यक्रमाला गेले. आदिवासींनी 'चेंगडा एन्दंड' हे गोंडी नृत्य सुरु केले आणि तिघांनाही या नृत्याच्या तालावर फेर धरण्याचा मोह आवरता आला नाही.             

आरिफ शेख यांच्याविषयी थोडेसे....

२००५ च्या बॅचचे छत्तीसगड कॅडरचे आयपीएस अधिकारी असलेले आरिफ शेख यांनी पुणे विद्यापीठातून इलेक्ट्रानिक इंजिनिअरची पदवी घेतली आहे. पोलिस सेवेत येण्यापूर्वी त्यांनी दोन वर्षे प्रतिष्ठित एचसीएल कंपनीत नेटवर्क इंजिनिअर म्हणून काम केले. पुढे आयपीएस झाल्यानंतर श्री.शेख यांनी गरियाबाद, धमतरी, स्पेशल टास्क फोर्स, जंजगिर-चांपा व बालोदचे पोलिस अधीक्षक म्हणून काम केले. 'सोशल पुलिसिंग' या विषयावर ते वृत्तपत्रातून लेखन करीत असतात. सिव्हील सर्व्हीसेची परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी त्यांनी 'इंटरव्युव्हालॉजी' हे पुस्तक लिहिले असून, अनेक जणांना ते पथदर्शक ठरत आहे. आर्थिक गुन्हे, सायबर गुन्हे व सोशल पुलिसिंग हे त्यांचे आवडते विषय आहेत. आरिफ शेख यांच्या अर्धांगिनी शमी आबिदी आयएएस अधिकारी असून, छत्तीसगडमध्येच त्या जिल्हाधिकारी आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
6K99V
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना