रविवार, 23 सप्टेंबर 2018
लक्षवेधी :
  शिक्षक बदली घोटाळ्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी सभापती विश्वास भोवते यास अटक, न्यायालयीन कोठडीत रवानगी             कोंबडी चोरुन खाल्ली म्हणून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास ५ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा-जिल्हा व सत्र न्यायालयाचा निवाडा             नक्षल्यांनी कमलापूरच्या मुख्य चौकात बांधले बॅनर, परिसरात दहशत             राष्ट्रीय ओबीसी महासंघाने जाळला ११ सप्टेंबरचा ओबीसींवर अन्याय करणारा जीआर             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
96%
नाही :
4%

तेंदूपत्ता व्यवसायात ग्रामसभांची दमदार एन्ट्री: गावे होणार कोट्यधीश

Sunday, 18th June 2017 03:08:27 AM

 

गडचिरोली, ता.१८: तेंदूपत्ता कंत्राटदारांचा एकछत्री अंमल हाणून पाडत धानोरा, एटापल्ली व भामरागड तालुक्यातील ४१ ग्रामसभांनी आता स्वत:च तेंदूपत्ता संकलन करुन तो थेट विडी कारखानदारांना विकण्याचा केलेला संकल्प पूर्णत्वास जात असून, यामुळे अनेक गावे कोट्यधीश होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

गडचिरोली जिल्ह्यात तेंदूपत्ता हंगाम अत्यंत महत्वाचा समजला जातो. उन्हाळ्यात पंधरा ते २० दिवस चालणाऱ्या या व्यवसायातून गोरगरीब मजुरांना रोजगार मिळतो. एकीकडे मजूर वर्गाला त्यांच्या गरजेपुरता पैसा मिळत असला, तरी कंत्राटदार मात्र या व्यवसायातून मालामाल होत होते. अशातच अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी अधिनियम २००६ व नियम २००८ अन्वये नैसर्गिक संसाधनांवर ग्रामसभांना मालकी हक्क मिळाल्याने त्यांनी तेंदूपत्ता लिलाव करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी वृत्तपत्रात जाहिराती देऊन दोनदा निविदा मागविल्या. परंतु ग्रामसभांच्या अटी व शर्ती जाचक असल्याचे सांगत कंत्राटदार या प्रक्रियेत सहभागी झाले नाही. त्यामुळे मूळत: गावांची मालकी असलेल्या तेंदूपत्त्याचा व्यवसाय आपणच केला तर?, असा प्रश्न ग्रामसभांच्या काही म्होरक्यांना पडला. खल सुरु झाला आणि सर्वजण आपणच व्यवसाय करण्याच्या निर्णयाप्रत येऊन पोहचले. 

तेंदूपत्ता व्यवस्थापनाचा कुठलाही अनुभव नसताना आणि या व्यवसायासाठी लागणारे प्रचंड आर्थिक पाठबळ नसताना ग्रामसभांनी स्वत: तेंदूपाने संकलन करण्याचे ऐतिहासीक धाडस केले. सुरुवातीला त्यांनी काही हितचिंतक आणि अन्य ग्रामसभांकडे आर्थिक मदतीची याचना केली. त्यांनीही होकार दिला आणि पैशाची जुळवाजुळव झाली. यातूनच मजुरांची मजुरी व व्यवस्थापनावर खर्च केला जात आहे. आर्थिक व्यवहारही ई-बँकिंग पद्धतीने करण्याचा प्रयत्न होत आहे.

तेंदूपत्ता संकलन व साठवणुकीसाठी लागणारे चेकर, दिवाणजी, व्यवस्थापक, हमाल यासारखे मनुष्यबळही ग्रामसभांनी निर्माण केल्याने मजुरांना पाने संकलनानंतर संपलेला रोजगार पुढेही मिळण्यास मदत झाली. ग्रामसभांनी कायदेशिररित्या गठित केलेल्या गौण वनोजप प्रबंधन समित्या व काही ग्रामसभांच्या ग्रामस्तरीय वनहक्क समित्यांना तेंदू संकलनाच्या हिशेबाची जबाबदारी देण्यात आल्याने चोरीवर नियंत्रण मिळविण्यातही यश आले. शिवाय पानांची गुणवत्ता राखण्यातही मोठी मदत झाली. संकलित केलेला तेंदूपत्ता आणि गोदामांमध्ये सुरक्षित साठविण्यात आला असून, त्याची देखभाल करण्यात येत आहे. विडी कारखान्यांना लागणारी तेंदूपानांची गुणवत्ता राखण्याकडे अधिक लक्ष देण्यात येत असल्याने ग्रामसभांना कोट्वधीचा नफा मिळणार आहे. यामुळे गावे कोट्यधीश होतीलच, पण नैसर्गिक संसाधनांवरील तेंदू कंत्राटदारांची मक्तेदारी संपुष्टात येईल, हेही नसे थोडके.

तेंदू व्यवस्थापनाच्या कामात प्रथम महिलांचा सहभाग...

पेंढरी परिसरातील मोहगाव येथे २० ग्रामसभांनी तेंदूपत्ता संकलित करुन ठेवला. या केंद्रावरील तेंदू व्यवस्थापनाचे काम सोनिया भगत नावाची विज्ञान शाखेची पदवीधर युवती चोखपणे करीत आहे. आर्थिक व्यवहार, तेंदूपानांचा हिशेब, विविध ठराव, टी.पी.तयार करणे इत्यादी कामे सोनियाने व्यवस्थितरित्या केली. तेदूपत्ता व्यवसायाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी एखाद्या युवतीने पार पाडण्याची ही पहिलीच वेळ आहे. यानंतरच्या हंगामात अनेक युवतींचा सहभाग वाढण्यास सोनियाच्या कामगिरीमुळे मदत होणार आहे.

तेंदूने खुणावले आयआयटीच्या विद्यार्थ्यांना!

जिल्हा परिषद सदस्य अॅड.लालसू नोगोटी यांच्या मार्गदर्शनात मुंबई येथील आयआयटीची विद्यार्थिनी भाग्यश्री पाटील व ओंकार घाटपांडे, तसेच एमबीएचा विद्यार्थी आशिष दोनाडकर यांनी भामरागड तालुक्यातील लाहेरी परिसरातील ग्रामसभांच्या तेंदू संकलन केंद्रांवर तेंदू व्यवस्थापन, व्यवहार व त्याचा ग्रामसभा आणि लोकांना होणारा फायदा या बाबींचा अभ्यास केला. सुरुवातीला कुतूहल म्हणून तेदू व्यवसाय बघण्यासाठी आलेले उच्च शिक्षित विद्यार्थी आता या व्यवसायाची व्यापकचा लक्षात घेता तेंदूकडे आकर्षित होऊ लागले आहे. त्यामुळे भविष्यात हा व्यवसाय हायटेक होणार आहे.

ग्रामसभांना सक्षम बनविणार-रामदास जराते

देशातील नामवंत विडी कारखान्यांशी करार करुन, ग्रामसभांनी संकलित केलेल्या तेंदूपानांपासून भविष्यात स्थानिक स्थरावरच विडी तयार करण्याचे नियोजन करण्यावर विचार सुरु आहे. यामुळे ग्रामसभा आर्थिकदृष्ट्या स्वयंभू होतील, असा विश्वास मोहगाव परिसरातील ग्रामसभांच्या तेंदूसंकलनाचे प्रवर्तक रामदास जराते यांनी व्यक्त केला. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
78HZ5
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना