शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

अभिनेत्रीवर एकतर्फी प्रेम करणारा मालदुगीचा युवक झाला गजाआड

Wednesday, 26th April 2017 02:44:56 AM

 

बंडूभाऊ लांजेवार/कुरखेडा, ता.२६: प्रेमाला जात, धर्म, पंथ आणि वयाचेही बंधन नसते. तसेच आजच्या इंटरनेटच्या युगात कुठला युवक कुठल्या युवतीच्या प्रेमात पडेल, हेही काही सांगता येत नाही. कुरखेडा तालुक्यातील मालदुगी येथील एक युवक मुंबईतील एका युवतीच्या एकतर्फी प्रेमात पडला आणि बक्षीस म्हणून त्याला मिळाली पोलिस कोठडी. स्वप्नील सहारे असे आरोपी युवकाचे नाव आहे.

स्वप्नील सहारेची ही प्रेमकहाणी मोठी रंजक आहे. कुरखेडा येथील एका महाविद्यालयात बी.ए.प्रथम वर्षाचा विद्यार्थी असलेल्या स्वप्नीलचे मुंबईतील एका युवतीवर प्रेम जडले. बरे, ही युवती काही साधीसुधी नाही. टीव्हीवर गाजलेल्या दोन-तीन मालिकेतील ती अभिनेत्री आहे. दोन वर्षांपूर्वी स्वप्नीलला ती आवडू लागली. त्याने आपल्या हातावर तिचे नावही गोंदवून घेतले. नंतर त्याने तिचा मोबाईल क्रमांक मिळविला. त्यावर तो तिला प्रेमाचे संदेश पाठवू लागला. काही दिवसांनी व्हॉटस् अॅप सुरु झाल्यावर त्याने त्यावर संदेश पाठविण्यास सुरुवात केली. हळूहळू प्रेमाचे संदेश सोडून तो अश्लिल संदेश पाठवू लागला. अनेकदा तर त्याने अश्लिलतेचा कळस गाठणारे संदेश त्या अभिनेत्रीला पाठविले. पण, 'असेल कुणीतरी दिवाणा' म्हणून तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, एक दिवस त्या अभिनेत्रीला घाबरवून सोडणारा संदेश स्वप्नीलने पाठविला. 'मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तू माझ्याशी लग्न केलं नाही तर मी आत्महत्या करेन', असा तो संदेश होता. संदेश वाचताच त्या अभिनेत्रीची भंबेरी उडाली. नाहकच आपल्यामागे भानगड लागेल म्हणून तिने कुराड व्हिलेज मालाड पोलिस ठाण्यात तक्रार केली.

तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली असता, अभिनेत्रीला अश्लिल संदेश पाठविणारा आणि आत्महत्या करण्याची धमकी देणारा युवक कुरखेडा तालुक्यातील मालदुगी येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर कुराड व्हिलेज मालाड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक श्री.खरात हे आपल्या चार सहकारी पोलिसांसह काल(ता.२५)मालदुगी येथे पोहचले. त्यांनी स्वप्नील सहारे यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता,'आपणच त्या अभिनेत्रीला अश्लिल संदेश पाठवून धमकी दिली', अशी कबुली स्वप्नीलने दिली. त्यानंतर पोलिसांनी कुरखेडा पोलिसांना माहिती देऊन स्वप्नील सहारे यास माहिती तंत्रज्ञान अधिनियमान्वये गुन्हा दाखल करुन अटक केली. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यास न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यास ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मालाड पोलिस त्याला मुंबईला घेऊन गेले असून, आता त्याची 'त्या' अभिनेत्रीशी थेट-भेट करुन देणार आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
KD4IW
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना