गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.५: गडचिरोली शहरात दूध विक्री करून गावी परत जाताना भरधाव ट्रकने धडक दिल्याने दूध विक्रेता जागीच ठार झाला. ही घटना आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास शहरानजीकच्या कठाणी नदीच्या पुलावर घडली.
मारोती भोयर (५५), रा. महादवाडी ता. गडचिरोली असे मृताचे नाव आहे. भोयर हे शेतीसह दुग्धव्यवसायही करायचे. नेहमीप्रमाणे ते आज सकाळी गडचिरोलीत आले. ग्राहकांना दूध वाटप केल्यानंतर त्यांनी गुरांसाठी पशुखाद्य खरेदीकेले. त्यानंतर खाद्य आणि दुधाच्या केटल्या घेऊन ते मोटारसायकलने गावी परत जात होते. मात्र, आरमोरी मार्गावरील कठाणी नदीच्या पुलावर पाठीमागून आलेल्या मालवाहू ट्रकने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यानंतर मारोती भोयर हे खाली कोसळले. ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर गडचिरोली पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. घटनेनंतर चालकाने ट्रक तेथेच ठेवून पलायन केले. पोलिस त्याचा शोध घेत असून, त्यांनी ट्रक ताब्यात घेतला आहे.
……………………