शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

गडचिरोलीच्या तीन मतदारसंघांमध्ये ७ उमेदवारांची माघार, गडचिरोली भाजपात बंडखोरी

Monday, 7th October 2019 06:47:34 AM

गडचिरोली,ता.७: विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या पहिल्या आणि अखेरच्या दिवशी जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांमधील ४४ उमेदवारांपैकी ७ उमेदवारांनी रिंगणातून माघार घेतली. यामुळे आता ३७ उमेदवार रिंगणात आहेत.

आरमोरी मतदारसंघात १७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. आज शरद सोनकुसरे, नीताराम कुमरे, अनिल कुमरे, वामन सावसागडे व रमेश मानागडे या पाच अपक्ष उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता तेथे १२ उमेदवार रिंगणात आहेत.

गडचिरोली मतदारसंघात १७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी मन्साराम आत्राम या अपक्ष उमेदवाराने रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे आता तेथे १६ उमेदवार रिंगणात आहेत.

अहेरी विधानसभा मतदारसंघात १० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी संदीप कोरेत या अपक्ष उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता तेथे ९ उमेदवार रिंगणात आहेत.

आरमोरीत चंदेल, तर गडचिरोलीत गुलाब मडावींचे भाजपपुढे आव्हान

आरमोरी विधानसभा क्षेत्रात शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल हे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. यंदाच्या जानेवारी महिन्यात आरमोरी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी ते शिवसेनेतून बाहेर पडले. लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी भाजपचे उमेदवार अशोक नेते यांना समर्थन दिले होते. परंतु आता ते स्वतंत्र उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. त्यामुळे भाजप उमेदवार व विद्यमान आमदार क्रिष्णा गजबे यांची डोकेदुखी वाढणार आहे.

र्कॉग्रेसचे उमेदवार व माजी आमदार आनंदराव गेडाम यांचे एकेकाळचे सहकारी आणि आरमोरी पंचायत समितीचे माजी सभापती बगू ताडाम हेही अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. त्यामुळे गेडाम यांची अडचण होणार आहे.

गडचिरोली मतदारसंघात भाजपचे गडचिरोली नगर परिषदेचे नगरसेवक गुलाब मडावी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. त्यामुळे भाजपचे उमेदवार व विद्यमान आमदार डॉ.देवराव होळी यांच्यापुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मडावी यांनी रिंगणातून माघार घ्यावी, यासाठी पक्षाच्या नेत्यांनी त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न्‍ केला. परंतु त्यांना यश आले नाही. दरम्यान, गुलाब मडावी यांच्यावर पक्ष शिस्तभंगाची कारवाई करेल, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे यांनी ‘गडचिरोली वार्ता’ ला सांगितले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
DG4K4
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना