शनिवार, 27 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

नक्षल्यांच्या गोळीबारात एक आत्मसमर्पित नक्षली ठार, दुसरा जखमी

Wednesday, 11th September 2019 02:56:23 AM

 

गडचिरोली, ता.११: गावाकडे गेलेल्या दोन आत्मसमर्पित नक्षल्यांवर नक्षल्यांनी गोळीबार केला असून, यात एक जण ठार, तर दुसरा जखमी झाला आहे. ही घटना काल(ता.१०) एटापल्ली तालुक्यातील गिलनगुडा येथे घडली. किशोर उर्फ मधुकर मट्टामी(३२), रा. नैनवाडी, ता.एटापल्ली असे ठार झालेल्या, तर  

अशोक उर्फ नांगसू होळी(३०), रा.झारेवाडा, ता.एटापल्ली असे जखमी आत्मसमर्पित नक्षल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक होळी हा भामरागड दलममध्ये कार्यरत होता. त्याने २०१० मध्ये पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले होते. किशोर उर्फ मधुकर पेका मट्टामी हा नक्षल्यांच्या कंपनी क्रमांक ४ व १० मध्ये कार्यरत होता. त्याने २०१३ मध्ये आत्मसमर्पण केले होते. आत्मसमर्पण केल्यानंतर दोघेही गडचिरोलीत राहत होते. दोघेही अधूनमधून आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आपापल्या गावी जात होते.

९ सप्टेंबरला दोघेही आपल्या गावी गेले होते. दुसऱ्या दिवशी १० सप्टेंबरला किशोर मट्टामी हा अशोक होळीच्या गावी गेला. त्यानंतर दोघेही मोटारसायकलने गडचिरोलीकडे येण्यास निघाले. दरम्यान गिलनगुडा गावानजीक नक्षल्यांनी दोघांना अडवून त्यांच्यावर गोळीबार केला. यात अशोक होळी जखमी झाला. त्याने नक्षल्यांच्या तावडीतून स्वत:ची सुटका करीत गट्टा(जांभिया) पोलिस मदत केंद्र गाठले. पोलिसांनी त्यास हेलिकॉप्टरने गडचिरोली येथे आणून जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले. मात्र, किशोर उर्फ मधुकर मट्टामी हा नक्षल्यांच्या तावडीत सापडला. नक्षल्यांनी त्यास गोळ्या घालून ठार केले.

आत्मसमर्पण केलेल्या दोन्ही नक्षल्यांनी विकासाच्या प्रवाहात सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. परंतु नक्षल्यांनी त्यांना जीवन जगण्याचा अधिकार हिरावून घेत क्रूरपणे त्यांच्यावर गोळ्या घातल्या. यावरुन नक्षल्यांचा क्रूर चेहर जगापुढे आल्याचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी म्हटले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
6ASZ1
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना