शनिवार, 27 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

नक्षल भूसुरुंगस्फोटातील आरोपी राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुकाध्यक्ष

Friday, 5th July 2019 06:16:52 PM

गडचिरोली, ता.५: महाराष्ट्रदिनी कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा-लेंडारी गावादरम्यान झालेल्या भूसुरुंगस्फोटाच्या तपासादरम्यान अटक करण्यात आलेला एक आरोपी हा राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुकाध्यक्ष असल्याची माहिती पुढे आली आहे.

३० एप्रिलच्या रात्री नक्षल्यांनी कुरखेडा तालुक्यातील दादापूर (रामगड) येथील रस्त्याच्या कामावरील २७ वाहने व अन्य यंत्रसामग्री जाळली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी १ मे रोजी जांभुळखेडा -लेंडारी गावादरम्यान असलेल्या नाल्याच्या पुलावर नक्षल्यांनी भूसुरुंगस्फोट घडविला. यात १५ पोलिस व एका खासगी वाहनचालक शहीद झाले होते. या प्रकरणी अलिकडेच विधिमंडळाच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित झाल्यानंतर गृहराज्यमंत्र्यांनी कुरखेड्याचे तत्कालिन उपविभागीय पोलिस अधीक्षक शैलेश काळे यांना निलंबित करण्याची घोषणा केली. तत्पूर्वी भूसुरुंगस्फोटाच्या घटनेशी संबंधित नक्षल्यांच्या पश्चिम सबझोनल ब्युरोची प्रमुख नर्मदाक्का व तिचा पती किरणकुमार यांना अटक करण्यात आली. त्यांनी दिलेल्या माहितीवरुन व अन्य तांत्रिक पुराव्यांवरुन पोलिसांनी वेगवेगळ्‌या दिवशी दिलीप हिडामी, परसराम तुलावी, सोमनाथ्ज्ञ म्डावी, किसन हिडामी व सुकरु गोटा या पाच जणांना अटक केली. पोलिस कोठडीदरम्यान या पाच जणांची विचारपूस केल्यानंतर पोलिसांना मोठा मासा गवसला.

२९ जूनला कुरखेडा येथील व्यावसायिक कैलास प्रेमचंद रामचंदानी यास अटक केली. कैलासचे कुरखेडा येथे इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान असून, तो अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ताही आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुकाध्यक्ष आहे. भूसुरुंगस्फोटासारख्या गंभीर गुन्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तालुकाध्यक्षच अडकल्याने खळबळ माजली आहे. त्याचा या घटनेत नेमका कसा सहभाग होता, किती दिवसांपासून तो नक्षल्यांच्या संपर्कात्‍ होता, याविषयी पोलिस तपास करीत आहेत. दरम्यान एका प्रमुख राजकीय पक्षाचा तालुकाध्यक्षच या प्रकरणात अडकल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांना विचारणा केली असता, त्यांनी कैलास रामचंदानी हा राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुकाध्यक्ष असल्याचे कबुल केले. लवकरच त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे वासेकर यांनी सांगितले. दरम्यान भूसुरुंगस्फोटाचा तपास योग्यरितीने सुरु असून, कैलास रामचंदानीच्या जवाबात काही महत्वाच्या बाबी पुढे येत आहेत. योग्य वेळी आम्ही त्या उघड करु, असे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी ‘गडचिरोली वार्ता’ला सांगितले. ही राष्ट्रीय पातळीवरची घटना असून, यूएपीए कायद्यान्वये कारवाई झाली असल्याने आणखी बऱ्याच गोष्टी पुढे येण्याची शक्यता असल्याचे श्री.बलकवडे यांनी सांगितले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
IK8I1
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना