शुक्रवार, 26 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

आ.कृष्णा गजबे यांच्या अंगरक्षकाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

Thursday, 22nd June 2017 08:29:03 PM

 

देसाईगंज, ता.२३: आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या अंगरक्षकाने त्यांच्याच जनसंपर्क कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आज भल्या सकाळी सव्वा सहा वाजताच्या सुमारास रिव्हॉल्वरमधून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. भास्कर चौके(३५) असे मृत अंगरक्षकाचे नाव आहे.

प्राथमिक माहितीनुसार, आज सकाळी भास्कर चौके हा मोटारसायकलने आ.कृष्णा गजबे यांच्या देसाईगंज येथील जनसंपर्क कार्यालयात आला. मोटारसायकल खाली ठेवून तो वरच्या मजल्यावरील जनसंपर्क कार्यालयात गेला. यावेळी कार्यालय कुलुपबंद होते. काही क्षणातच त्याने प्रवेशद्वारासमोरच स्वत:च्या कानशिलात गोळी झाडली. बंदुकीच्या गोळीचा आवाज येताच समोरील पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांनी आ.गजबे यांच्या कार्यालयाकडे धाव घेतली. त्यांनी लगेच आ.गजबे यांनाही माहिती दिली. आ.गजबे लगेच कार्यालयात पोहचले. त्यांनी जखमी अंगरक्षक भास्कर चौके यास ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे प्रथमोपचार केल्यानंतर भास्कर चौके यास गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मात्र तेथील डॉक्टरांनी भास्करला मृत घोषित केले. पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहचून माहिती जाणून घेतली. आ.कृष्णा गजबे यांच्याशीही त्यांनी चर्चा केली.

यासंदर्भात आ.गजबे यांनी 'गडचिरोली वार्ता'ला सांगितले की, आपण काल पक्षाच्या बैठकीसाठी नागपूरला गेलो होतो. परंतु पोटगाव येथील एका व्यक्तीचे निधन झाल्याने मी माझा परिवार व अंगरक्षकास अंत्ययात्रेसाठी जाण्यास सांगितले होते. मात्र अंगरक्षक भास्कर चौके हा अंत्ययात्रेस गेला नाही. आपण रात्री ११ वाजता गावी परतलो. आज सकाळी त्याच्या आत्महत्येची माहिती मिळाली. ही अत्यंत दुर्दैवी घटना असल्याचे आ.गजबे म्हणाले.

भास्कर चौके हा आ.कृष्णा गजबे यांच्या पोटगाव या गावचा रहिवासी आहे. तो आपल्या परिवारासह देसाईगंज येथे वास्तव्य करीत होता. दोन वर्षांपासून तो आ.गजबे यांचा अंगरक्षक म्हणून कार्यरत होता. दुर्गम भागातील जवान तसेच लोकप्रतिनिधींचे अंगरक्षक बरेचदा तणावात असतात. यापूर्वी दुर्गम भागातील अंगरक्षकांनी आत्महत्या केल्याच्या घटना जिल्ह्यात घडल्या आहेत.

प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याची चर्चा......

अंगरक्षक भास्कर चौके आज सकाळी मोटारसायकलने एका महिलेला घेऊन कार्यालयात आला. भास्करसोबत ती महिलाही कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोहचली. मात्र त्याने गोळी झाडताच ती रडत रडत खाली उतरून बाहेर गेली. तिला बाहेर पडताना काही जणांनी बघितले आणि नंतर तिला पकडून आणले. पोलिसांनी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. प्रेमप्रकरणातून भास्करने आत्महत्या केल्याची चर्चा आहे. देसाईगंज पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
559U0
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना