शनिवार, 27 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीच्या हल्ल्यात हिदूर येथील तीन महिला गंभीर जखमी             आचारसंहितेचा भंग; भाजपच्या गडचिरोलीतील दोन नेत्यांवर गुन्हा दाखल             रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना २ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा

Tuesday, 20th June 2017 07:33:25 AM

 

गडचिरोली, ता.२०: येथील नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीत प्रचारादरम्यान वाद झाल्याने तत्कालिन नगरसेवक अरुण हरडे यांना जीवानिशी ठार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना जिल्हा व सत्र न्यायालयाने २ वर्षांचा सश्रम कारावास व १ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दीपक मडके, माजिद सय्यद व राजेंद्र कुकुडकर अशी दोषी इसमांची नावे असून, ते गडचिरोली येथील रहिवासी आहेत..

ही घटना साडेसात वर्षापूर्वीची आहे. डिसेंबर २००९ मध्ये गडचिरोलीच्या कॉम्प्लेक्स वॉर्डाची पोटनिवडणूक होती. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तत्कालिन नगरसेवक अरुण हरडे व दीपक मडके यांच्यात वाद झाला. निवडणुकीनंतरही वादाची धग कायम होती. २१ डिसेंबर २००९ रोजी रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास अरुण हरडे हे आपल्या सहकाऱ्यांसह रस्त्याने जात असताना पोलिस ठाण्यासमोर आरोपी दीपक मडके, माजिद सय्यद व राजेंद्र कुकुडकर यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून अरुण हरडे यांच्यावर तलवार, लोखंडी पट्टी व काठीने डाव्या हाताचा अंगठा, छाती, पाठ व मानेवर वार करुन त्यांना गंभीर जखमी केले. श्री.हरडे यांच्या फियादीनंतर पोलिसांनी दीपक मडके, माजिद सय्यद व राजेंद्र कुकुडकर यांच्यावर भादंवि कलम ३०७, ३४, मुपोका कलम १३५ व भारतीय हत्यार कायद्याच्या कलम ४/२५ अन्वये गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली. तत्कालिन पोलिस निरीक्षक पी.एम.मडामे यांनी गुन्ह्याचा तपास पूर्ण केल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

आज या प्रकरणाचा निकाल लागला. जिल्हा व सत्र न्यायालयाने साक्षदारांचे बयाण नोंदवून व सरकारी पक्षाचा युक्तीवाद मान्य करुन आरोपी दीपक मडके, माजिद सय्यद व राजेंद्र कुकुडकर यांना प्रत्येकी २ वर्षांचा सश्रम कारावास व १ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील नीळकंठ भांडेकर यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलिस उपनिरीक्षक जयेश खंदरकर यांनी जबाबदारी सांभाळली. 

गुन्हेगारांवर वचक निर्माण होईल-अरुण हरडे

जिल्हा व सत्र न्यायालयाच्या निकालावर आपण समाधानी असून, या निकालामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर कायद्याचा वचक निर्माण होईल, अशी प्रतिक्रिया माजी नगरसेवक व भाजपचे विद्यमान नेते अरुण हरडे यांनी व्यक्त केली.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
607EI
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना