गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

सिरोंचाला जाताय? कलेक्टर आंब्याचा स्वाद घ्याच!

Tuesday, 22nd July 2014 10:07:34 AM

अनेक जण गमतीने विचारतात, 'आंबा एवढा मोठा, तर घुई केवढी असेल?' हो, लोकांचे हे म्हणणे खरेच आहे़कारण चक्क 5 किलोचा आंबा सिरोंचात आहे आणि त्याचे नाव आहे कलेक्टर आंबा. जसा जिल्हाधिकाऱ्याचा रुबाब, तसाच या आंब्याचाही तोरा! सिरोंचातील कोंड्रा विश्वेश्वरराव हे वडिलोपार्जीत या आंब्याचे उत्पादन घेत असून, आजवर भल्याभल्यांना हा आंबा खाण्याचा मोह आवरता आलेला नाही.

या आंब्याची कहानी मोठी मनोरंजक आहे. ब्रिटीश काळात मद्रास स्टेट होते. या स्टेटमध्ये चार जिल्हे एक अपर गोदावरी, दुसरा लोअर गोदावरी, तिसरा इस्ट गोदावरी आणि चौथा वेस्ट गोदावरी अपर गोदावरी जिल्ह्याचे मुख्यालय होते. सिरोंचा आणि त्याचे कलेक्टर ग्लासफोर्ट़ सिरोंचात आज जे विश्रामगृह आहे, ते ग्लासफोर्ट साहेबांचे शासकीय निवासस्थाऩ. त्यावेळी या कलेक्टर साहेबांनी श्रीलंकेतील जाफना भागातून आंबा आणून तो आपल्या निवासस्थानी लावला. झाडाला आंबे लागले आणि लहान लहान आंबट आंब्याची चव चाखलेल्या लोकांना अप्रूप वाटू लागले. भला मोठा आकार आणि खोबऱ्यासारखी चव यामुळे सिरोंचा परिसरातील लोकांना आंबा आवडू लागला़

पुढे ब्रिटीश भारतातून गेले, तसे कलेक्टर ग्लासफोर्ट हेही दूरदेशी झाले. पण, त्यांचा आंबा लोकांच्या मनात घर करून गेला. कारण त्याचा आकार आणि वजनही तसेच होते 2 ते 5 किलो. 1965 ची गोष्ट असावी सिरोंचाचे शेतकरी कोंड्रा दुर्गया यांनी या आंब्याचे कलम करून शेतात एक झाड लावले. त्या झाडालाही तसेच आंबे लागले. तोच आकार, तेच वजन आणि तोच स्वाद़ मात्र, आंब्याचे नाव कोणालाही माहित नव्हते. कलेक्टर साहेबांनी आणलेला आंबा म्हणून लोक या आंब्याला 'कलेक्टर आंबा' म्हणू लागले. पुढे याच नावाने हा आंबा पंचक्रोशीत प्रसिद्ध झाला.

हा आंबा फुटबॉलसारखा दिसत असल्याने खेड्यातील लोक 'गोला आम' म्हणूनही त्यास ओळखतात.

कोंड्रा दुर्गय्या यांनी नंतर अनेक झाडे लावली. सध्या त्यांचे सुपुत्र कोंड्रा विश्वेश्वरराव या आंब्याची काळजी घेत आहेत. त्यांच्या बगिचात कलेक्टर आंब्याची 20 झाडे आहेत. जेव्हा दुसऱ्या आंब्याची किंमत 20 ते 30 रुपये किलो असते; तेव्हा कलेक्टर आंब्याला 80 ते 100 रुपये दर मिळतो. एका झाडापासून 5 ते 10 क्विंटल आंबे मिळतात. हा आंबा जसा आकार आणि चवीसाठी प्रसिद्ध आहे; तसेच त्याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. कलेक्टर आंब्याचा मुरब्बा 3 वर्षांपर्यंत चांगला राहू शकतो. पिकलेल्या आंब्यापेक्षा कच्चा आंबाच अधिक स्वादिष्ट लागतो, असे कोंड्रा विश्वेश्वरराव सांगतात.

असा हा आंबा भल्याभल्यांना मोहिनी घालून गेला. विशेषत: आधीच्या अविभक्त चंद्रपूर आणि नंतरच्या स्वतंत्र गडचिरोली जिल्ह्याचे बहुतांश जिल्हाधिकारी या कलेक्टर आंब्याच्या प्रेमात पडले. मुन्शीलाल गौतम, राजीव सिन्हा, सुब्रत राथो, अतुल पाटणे अशा अनेक जिल्हाधिकाऱ्यांनी या आंब्याची चव चाखली. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
H3H18
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना