गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

३० एप्रिलपर्यंत विदर्भ द़या, अन्यथा पुतळे जाळू

Tuesday, 3rd March 2015 07:13:41 AM

 

गडचिरोली, ता.३: भाजपाने १९९७ च्या अधिवेशनात स्वतंत्र विदर्भाचा ठराव मांडल्याचे सांगून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मते मागून केंद्र व राज्यात सत्ता मिळविली. मात्र सत्ता मिळताक्षणीच त्यांची भाषा बदलली. आता हे खपवून घेतले जाणार नाही, असे सांगून विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या नेत्यांनी ३० एप्रिलपर्यंत स्वतंत्र विदर्भ राज्याची घोषणा न झाल्यास १ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांचे पुतळे जाळू, असा इशारा दिला.

विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने सिंदखेडराजा येथून निघालेली "विदर्भ गर्जना यात्रा" आज ३ मार्च रोजी गडचिरोलीत पोहचली, त्यानंतर येथील इंदिरा गांधी चौकात आयोजित जाहीर सभेत समितीच्या नेत्यांनी उपरोक्त इशारा दिला. यावेळी माजी आमदार अॅड. वामनराव चटप, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ.श्रीनिवास खांदेवाले,राम नेवले,  प्रबिरकुमार चक्रवर्ती, अॅड.नंदा पराते, डॉ.रमेश गजबे, सरोज काशीकर, मधुकर कुकडे, रंजना मामर्डे, दिलिप नरवडीया, धर्मराव रेवतकर, धनंजय धार्मिक, अरविंद भोसले अरुण मुनघाटे, प्रभू राजगडकर यांच्यासह अनेक विदर्भवादी नेते उपस्थित होते. अॅड. चटप म्हणाले, आजमितीस महाराष्ट्रावर ३ लाख्‍ा ४४ हजार कोटी रुपयांचे कर्ज असून, यंदाचे बजेट ४० टक्क्यांची कपात असणारे बजेट असणार आहे. विदर्भात अजूनही २ लाख २७ हजार नोकऱ्यांचा अनुशेष आहे. नोकरभरती ठप्प आहे. अशाही परिस्थितीत सरकार टोल आणि एलबीटी मुक्तीची घोषणा करीत आहे. चंद्रपूरला दारुबंदी केल्यानंतर महसुली उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण करणे गरजेचे असताना सरकार कुठल्याही हालचाली करताना दिसत नाही. परिणामी येणाऱ्या काळात हे राज्य दिवाळखोर राज्य म्हणून ओळखले जाईल, अशी भीतीही अॅड.चटप यांनी व्यक्त केली.

भारतीय जनता पक्ष आज राज्य व केंद्रात सत्तेवर आहे. या पक्षाने भुवनेश्वरच्या अधिवेशनात स्वतंत्र विदर्भाचा ठराव मंजूर केला होता. लोकसभा आणि विधानसभेतही तसे आश्वासन देऊन मते मागितली आणि सत्ता मिळविली. परंतु आता त्यांची भाषा बदलली. त्यामुळे स्वतंत्र विदर्भाची मागणी तीव्र करावी लागत आहे, असे सांगून अॅड. चटप यांनी ३० एप्रिलपर्यंत पावले न उचलल्यास १ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुतळे जाळू, असा इशारा दिला. यावेळी अन्य मान्यवरांनीही मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे संचालन रमेश भुरसे यांनी केले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
U0K5V
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना