/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.२:शेतातील गाळ उपसा करण्याची परवानगी मिळवून चक्की नदीघाटातून रेतीचा मोठ्या प्रमाणावर उपसा करण्यात येत असल्याचा प्रकार जिल्हा मुख्यालयापासून आठ किलोमीटर अंतरावरील साखरा गावात घडत आहे. दोन वर्षांपासून सुरु असलेल्या प्रकाराबाबत महसूल विभागाकडे तक्रार करुनही या विभागाचे अधिकारी मूग गिळून अप्प असल्याचा आरोप साखरा ग्रामपंचायतीचे सरपंच पुण्यवान सोरते व माजी जिल्हा परिषद सदस्य नीता साखरे यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
पुण्यवान सोरते आणि नीता साखरे यांनी सांगितले की, मोटवानी नामक इसमाने दहा-बारा वर्षांपूर्वी साखरा येथील नदीघाटाकडे शेती घेतली होती. त्याने शेतीतील गाळ उपसण्यासंदर्भात संबंधित विभागाची परवानगी घेतल्यानंतर मार्च २०२१ मध्ये ग्रामपंचायतीने त्यास नाहरकत प्रमाणपत्र दिले. परंतु प्रत्यक्षात तो नदीपात्रातील रेतीचा उपसा करीत आहे. शिवाय या रेतीची वाहतूक करण्यासाठी मोठमोठ्या ट्रकचा वापर केला असून, या ट्रकमुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या बाजूच्या शेतात रेती साचल्याने त्यांची शेती पीक घेण्यायोग्य राहिलेली नाही. शेतीचे बांध आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जवळपास ४० ते ५० जणांच्या शेतीकडे याच रस्त्याने जावे लागते. परंतु ट्रक येत असताना शेतकऱ्यांना त्या रस्त्याने बैलगाड्याही नेता येत नाही. दोन वर्षांपासून हा प्रकार सुरु असून, तक्रार करुनही महसूल विभाग काहीच कारवाई करीत लसल्याचा आरोप पुण्यवान सोरते व नीता साखरे यांनी केला.
यंदा २८ फेब्रुवारीला संबंधित इसमामार्फत नदीघाटातून रेती उपसा करीत असल्याचे दिसून आले. त्यावेळी गावकऱ्यांनी ट्रक आणि ट्रॅक्टर्स अडविले असता त्याने खोटी तक्रार केली, असेही सोरते आणि साखरे यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकाराबाबत जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांकडे तक्रार करुनही काही उपयोग झाला नाही. दोन-तीन दिवसांत कारवाई झाली नाही, तर उपोषण करु, असा इशारा सोरते आणि साखरे यांनी दिला. पत्रकार परिषदेला ग्रामपंचायत सदस्य उमाकांत हुलके, हेमराज जनबंधू उपस्थित होते.