/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.२६: चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारपवार यांना पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांनी मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी साक्षदारांना बयाण देण्यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालयात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. मात्र, खांडवे यांच्या भीतीपोटी आम्हाला तेथे हजर होणे शक्य नसून, पोलिसांनी गावात येऊन आमचे बयाण घ्यावे, अशी मागणी साक्षदारांनी आज पत्रकार परिषदेत केली.
पत्रकार परिषदेला मोहन मोहुर्ले, रामसिंग राठोड, भाऊराव कुमरे, अश्विन रायसिडाम, मोरेश्वर कुनघाडकर, पंकेश मेश्राम,किशोर कुनघाडकर, अंकेश शेंडे, सीताराम पदा व भूषण दहेलकार उपस्थित होते. हे सर्व जण चामोर्शी तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील रहिवासी आहेत. त्यांनी सांगितले की, दरवर्षीप्रमाणे आम्ही यंदा २० एप्रिलला पहाटे कालेश्वर येथे दर्शनासाठी खासगी वाहनातून जात होतो. पहाटे ४ वाजता चामोर्शी येथील टी पॉईंटवर पोलिसांनी आमची गाडी अडवली. त्यानंतर पोलिस ठाण्यात नेऊन पोलिस निरीक्षक खांडवे यांनी आम्हाला ‘तुम्ही गण्यारपवारचे माणसं आहात’, असे म्हणून बेदम मारहाण केली. आमचे मोबाईलही फेकले. काही वेळाने अतुल गण्यारपवार ठाण्यात पोहचताच त्यांनाही अमानुषपणे मारहाण केली.
भीतीमुळे आम्ही कुठेही तक्रार केली नाही. परंतु गण्यारपवार मारहाणप्रकरणी आम्ही साक्षदार असल्याने पोलिसांनी आम्हाला २५ मे रोजी नोटीस बजावून त्याच तारखेला पोलिस अधीक्षक कार्यालयात बयाण नोंदविण्यासाठी हजर राहण्यास सांगितले. मात्र त्याच दिवशी पोलिस निरीक्षक खांडवे यांनी चक्क न्यायाधीशांशी हुज्जत घातल्याची बातमी कानावर आल्याने आम्ही भीतीपोटी पोलिस अधीक्षक कार्यालयात जाणे टाळले. आता खांडवे यांना पोलिस अधीक्षक कार्यालयात जमा केल्याने आणि त्यांनी आधीच आम्हाला धमकी दिल्याने आम्ही तेथे जाऊ शकत नाही. त्यामुळे गावातील ग्रामपंचायत किंवा सार्वजनिक ठिकाणी येऊन पोलिसांनी आमचे बयाण घ्यावे, अशी मागणी उपस्थित नागरिकांनी पत्रकार परिषदेत केली. याप्रकरणी अपर पोलिस अधीक्षकांना निवेदन दिल्याची माहितीही त्यांनी दिली.