/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.४: बचत गटाच्या नावाखाली बेकायदेशीररित्या सावकारी करणाऱ्या दोन महिलांच्या घरांवर सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त केली. मोनिका खनके आणि संगीता निंबाळकर अशी या महिलांची नावे असून, त्या गडचिरोली नजीकच्या नवेगाव येथील सुयोगनगरात वास्तव्य करतात.
शासनाकडे २० जानेवारी रोजी मोनिका खनके व संगीता निंबाळकर करीत असलेल्या अवैध सावकारीसंदर्भात तक्रार प्राप्त झाली होती. त्याअनुषंगाने गडचिरोली येथील जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, तथा सावकारांचे निबंधक प्रशांत धोटे यांच्या आदेशान्वये गडचिरोलीचे सहायक निबंधक विक्रमादित्य सहारे यांनी मोनिका किशोर खनके यांच्या घरी व चामोर्शीचे सहायक निबंधक पंकज घोडे यांनी संगीता निबांळकर यांच्या घरी एकाच वेळी धाड टाकली.या मोहिमेत मोनिका खनके यांच्या घरी १२स्टॅम्प पेपर,१२ स्टॅम्प पेपरच्या छायांकित प्रती, ७ कोरे धनादेश, एक धनादेश बूक, २ साध्या पेपरवर केलेले करारनामे, रकमेच्या नोंदी असलेल्या २१ चिठ्ठया, ३ रजिस्टरची पाने, १० हिशोबाच्या नोंदवहया, ६ बँक पासबूक, अनेक व्यक्तींच्या नावाने असलेले मतदान कार्ड, पॅनकार्ड, आधारकार्ड आणि वीज बिलांच्या २४ छायांकित प्रती,विक्रीपत्र, मालमत्ता पत्र, तसेच इतर आनुषांगिक ३९ कागदपत्रे आढळून आली.
तसेच संगीता निबांळकर यांच्या घरी ६ स्टॅम्प पेपर, २ डायऱ्या, १२ कोरे धनादेश, ३ सातबारा नमुने, ५ सेलडिड नमुने, २१ चिठ्ठया, ६ विक्रीपत्रे, ५ मालमत्तापत्रे इत्यादी आक्षेपार्ह कागदपत्रे आढळून आली. ही कागदपत्रे चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आली आहेत. कागदपत्रांची चौकशी केल्यानंतर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सहायक निबंधक विक्रमादित्य सहारे यांनी सांगितले.
या कारवाईत सहकार अधिकारी सुशील वानखेडे, डी.आर.बनसोड, विजय पाटील, लोमेश रंधये, सचिन बंदेलवार, अनिल उपासे, वैभव निवाणे, हेमंत जाधव, शैलेंद्र खांडरे, ऋषिश्वर बोरकर, शालिकराम सोरते, शांताराम कन्नमवार, अशोक शेळके, उमाकांत मेश्राम, शैलेश वैद्य, तुषार सोनुले, प्रकाश राऊत, स्मिता उईके, शोभा गाढवे, अनिता हुकरे, धारा कोवे, कविता बांबोळे यांचा सहभाग होता.
या कारवाईसाठी पंच म्हणून विविध कार्यकारी सहकारी संस्था, गडचिरोलीचे गटसचिव रमेश कोलते व खरपुंडी येथील आदिवासी विविध कार्यकारी संस्थेचे सचिव घनश्याम भुसारी यांनी काम पाहिले.