शुक्रवार, 29 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

ट्रकच्या धडकेत महिला ठार: संतप्त नागरिकांनी १० ट्रक जाळले

Tuesday, 27th September 2022 07:52:20 AM

गडचिरोली,ता.२७: सुरजागड पहाडावरुन लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने एक महिला जागीच ठार झाल्यानंतर संतप्त नागरिकांनी रस्त्याने जाणाऱ्या जवळपास ८ ते १० टिप्पर आणि ट्रकना आग लावली. ही घटना आज संध्याकाळी चार वाजताच्या सुमारास आष्टी-आलापल्ली मार्गावरील शांतीग्राम गावाजवळ घडली.

मुलचेरा तालुक्यातील कांचनपूर येथील सुभाष जयदार हे आज दुपारी चार वाजताच्या सुमारास पत्नीसह मोटारसायकलने गावाकडे जात असताना लगाम-शांतीग्राम गावादरम्यानच्या रस्त्यावर लोहखनिज घेऊन येणाऱ्या ट्रकने मागून धडक दिल्याने सुभाष जयदार यांची पत्नी बिजोली सुभाष जयदार (४५) जागीच ठार झाली. त्यानंतर नागरिक संतप्त झाले. त्यांनी रस्त्याने लोहखनिज घेऊन येणाऱ्या आठ ते दहा वाहनांना आग लावली. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी पोहचून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. मात्र, परिसरात तणाव कायम आहे.

सुरजागड येथील पहाडावरुन त्रिवेणी अर्थमूव्हर्स आणि लॉयड मेटल्स कंपनीतर्फे लोहखनिज उत्खनन करण्यात येत आहे. या खनिजाची वाहतूक टिप्पर आणि ट्रकद्वारे होत असून, दररोज चारशे ते पाचशे ट्रक रस्त्यावरुन धावत असल्याने आष्टी-आलापल्ली, आलापल्ली-एटापल्ली हे दोन प्रमुख रस्ते प्रचंड खराब झाले आहेत. यामुळे बरेचदा वाहतुकीची कोंडी होते. शिवाय अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. या विरोधात मागील आठवड्यात अहेरी आणि आलापल्ली येथील व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंदही ठेवली होती. परंतु प्रशासनाने लोकभावना लक्षात न घेतल्याने अपघातांचे प्रमाण वाढले असून, नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

मंत्र्यांचे पाठबळ भांडवलदारांना?

ग्रामसभा आणि एटापल्ली तालुक्यातील शेकडो गावांतील आदिवासींचा विरोध असतानाही दोन कंपन्यांनी मागील वर्षीपासून सुरजागड पहाडावरुन लोहखनिज उत्खनन सुरु केले. दररोज चारशे ते पाचशे ट्रकमधून खनिजाची वाहतूक होते. काही महिन्यांपूर्वीच शासनाने पहाडावर पोलिस ठाणेही सुरु केले. चक्क पोलिस संरक्षणात खनिज काढून नेण्यात येत आहे. त्यावेळी सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. परंतु त्यांनी आदिवासींच्या हिताकडे दुर्लक्ष करीत नेहमीच भांडवलवादी कंपन्यांच्या हिताची भूमिका घेतली, शिवाय प्रशासकीय अधिकारीही लोकांच्या आक्रोशाकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहेत, असे लोक आता मोकळेपणाने बोलून संताप व्यक्त करीत आहेत.

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
A9BC4
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना