/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.१५: मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस कोसळत असल्याने नदी, नाल्यांना पूर आला असून, तब्बल २० मार्गांवरील वाहतूक बंद झाली आहे. पुरामुळे भामरागड येथील १५० आणि देसाईगंज येथील हनुमान वॉर्डातील ४३ अशा एकूण १९३ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.दोन्ही ठिकाणी प्रत्येकी एका मदत केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे.अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ७५ कच्ची घरे आणि २ गोठ्यांचे नुकसान झाले आहे.
मागील चोवीस तासांत कोरची तालुक्यात १६१.३ मिलीमीटर पाऊस पडला. त्याखालोखाल कुरखेडा तालुक्यात १२२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गोसेखुर्द धरणाचे सर्व ३३ दरवाजे अडीच मीटरने उघडण्यात आले असून, त्यातून ५ लाख २९ हजार ७२५ क्यूसेक्स, तर तेलंगणातील मेडिगड्डा धरणाच्या ८५ दरवाज्यांमधून ६ लाख ३६ हजार १३० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग केला जात आहे. यामुळे वैनगंगा, गोदावरी, प्राणहिता आणि इंद्रावती नद्यांची पाणी पातळी धोका पातळीच्या वर पोहचली आहे.
पुरामुळे गडचिरोली-आरमोरी,गडचिरोली-चामोर्शी, आलापल्ली-भामरागड, देसाईगंज-लाखांदूर, आष्टी-गोंडपिपरी, सिरोंचा-कालेश्वरम या प्रमुख मार्गांसह देसाईगंज-कोकडी-अरततोंडी, कोरची-भिमपूर-बोटेकसा, कोरची-मसेली-बेतकाठी, कुरखेडा-वैरागड, वैरागड-पातलवाडा, लाहेरी-बिनामुंडा, अहेरी-लंकाचेन, अहेरी-वट्रा, अहेरी-देवलमरी इत्यादी मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे.
दरम्यान, गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.