शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

सावधान! गडचिरोलीत अतिक्रमीत जमिनीवर ले-आऊटचा धंदा

Saturday, 2nd July 2022 01:50:18 AM

गडचिरोली,ता.२: जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या गडचिरोली शहराचा भौगोलिक विस्तार झपाट्याने होत असल्याने शेतजमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. याचा फायदा घेत काही जण अतिक्रमण केलेल्या वनजमिनीवर प्लॉट(भूखंड) तयार करुन विक्री करीत असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. यामुळे शासनाची दिशाभूल होत असून,प्लॉट खरेदी करणाऱ्यांनाही भविष्यात अडचणींचा सामना करावा लागणार आहे. गडचिरोली शहरातील गोकुळनगर-आयटीआय बायपास मार्गालगत झुडपी जंगलाला लागून असलेल्या सर्वे क्रमांक २१ या जमिनीसंदर्भात असाच एक प्रकार उजेडात आला आहे. वनविभागाच्या दस्तऐवजानुसार,या जमिनीवर झुडपी जंगल असल्याचे दिसून येत आहे. परंतु तेथील २.०२ हेक्टर आर. जमिनीवर अतिक्रमण करून त्यावर ले-आऊट तयार करण्यात आला आणि प्लॉट विक्रीस उपलब्धही करुन देण्यात आले आहेत. हा प्रकार उजेडात आल्यानंतर वनविभागाकडून त्या जागेची चौकशी केली जात आहे.

ही जमीन एका इसमाची असल्याची सांगण्यात येत असले; तरी नियमानुसार त्यांना जमिनीचा पट्टा मिळाला आहे की नाही, हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. विशेष म्हणजे ही जमीन आपलीच असल्याचा दावा करणारा इसम आणि त्याची मुले शासकीय नोकरीवर असून त्यांना पट्टा कसा मिळू शकतो, असा प्रश्नदेखील उपस्थित झाला आहे. ही जमीन एका इसमाची असल्याचे वरकरणी सांगण्यात येत असले; तरी जमिनीवर प्लॉट तयार करुन त्यांची विक्री करणारे महाभाग दुसरेच आहेत, अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

यासंदर्भात गडचिरोलीचे वनपरिक्षेत्राधिकारी ए.एन.पेंदाम यांना विचारणा केली असता ते म्हणाले की,१९५६ पासून वनजमिनीवर अतिक्रमण असल्याचे संबंधित इसम सांगत आहे. त्याचे बयाण नोंदविण्यात आले असून, जमिनीचे दस्तऐवज सादर करण्यास सांगण्यात आले आहे. त्यासाठी त्याला ७ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. वनविभागाकडे उपलब्ध सातबाऱ्यावर संबंधित जमीन झुडपी जंगलाची असून, मालकी हक्क वनविभागाचा आहे. कुणाला वनजमिनीचा पट्टा मिळाला असेल तरी त्याला ती जमीन दुसऱ्यास हस्तांतरीत करता येत नाही, असेही श्री.पेंदाम यांनी स्पष्ट केले. गडचिरोलीत भूखंड विक्रीचा धंदा तेजीत

गडचिरोलीत काही जण भूखंड विक्रीतून मालामाल झाले आहेत. जमिनीचा मालक वेगळा, कागदपत्रे वेगळी आणि विकणारे वेगळेच असे प्रकार होऊ लागले आहेत. यातून ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता बळावली आहे. ज्यांना भूखंड खरेदी करावयाचा आहे; त्यांनी थोडे कष्ट घेऊन सर्च रिपोर्ट प्राप्त करावा,तेव्हाच फसवणूक होणार नाही, असे जाणकारांचे म्हणणे आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
P1414
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना