/* */
![]() |
||
गडचिरोली | --°C | --°C |
गडचिरोली,ता.२८ : भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष कोदंडधारी उर्फ नाना नाकाडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपने वेगळी खेळी खेळत नाकाडे घराण्यातीलच श्रीमती आशा प्रशांत नाकाडे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे यांनी ही नियुक्ती केली आहे. जिल्ह्यात पक्ष वाढविण्यासाठी काम करणाऱ्या सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांच्या शिफारसींनुसार आशा नाकाडे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पक्षाने म्हटले आहे. श्रीमती नाकाडे यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर ,खासदार अशोक नेते, आमदार डॉ.रामदास आंबटकर, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे यांना दिले आहे.
श्रीमती आशा नाकाडे यांचे पती प्रशांत नाकाडे हे अनेक वर्षे भाजपचे जिल्हा सरचिटणीस होते. १२ फेब्रुवारी २०११ रोजी प्रशांत नाकाडे यांची नागपुरात हत्या झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी त्यांचे कनिष्ठ बंधू नाना नाकाडे यांना भाजपमध्ये जिल्हा उपाध्यक्ष हे महत्वाचे पद देण्यात आले. परंतु १८ नोव्हेंबरला शरद पवार यांच्या उपस्थितीत नाना नाकाडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे रिक्त जागेवर भाजपने नाना नाकाडे यांच्या वहिनी श्रीमती आशा नाकाडे यांची नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती म्हणजे नाना नाकाडे यांना शह देण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.