गडचिरोली | --°C | --°C |
मुंबई, ता.२४: राज्यातील ३२ जिल्ह्यांतील १०५ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २१ डिसेंबरला मतदान, तर २२ तारखेला मतमोजणी होणार आहे. त्याअनुषंगाने संबंधित नगरपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली. निवडणूक होणाऱ्या १०५ नगरपंचायतींमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील नऊ नगरपंचायतींचाही समावेश आहे.
श्री. मदान यांनी सांगितले की, एप्रिल २०२० ते मे २०२१ या कालावधीत मुदत संपलेल्या ८१ आणि डिसेंबर २०२१ मध्ये मुदत संपणाऱ्या १८, तसेच नवनिर्मित ६ अशा एकूण १०५ नगरपंचायतींच्या प्रत्येकी १७ सदस्यपदांसाठी सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. त्यासाठी १ ते ७ डिसेंबर २०२१ या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येतील. ४ व ५ डिसेंबर २०२१ रोजी सुटी असल्याने नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी ८ डिसेंबर रोजी होईल. २१ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान घेण्यात येईल. २२ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १० वाजतापासून मतमोजणी सुरू होईल. सार्वत्रिक निवडणूक होत असलेल्या नगरपंचायतींमध्ये गडचिरोली तालुक्यातील मुलचेरा, एटापल्ली, कोरची, अहेरी, चामोर्शी, सिरोंचा, धानोरा, कुरखेडा आणि भामरागड या नऊ नगरपंचायतींचाही समावेश आहे.
उमेदवारांना जात व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक
राखीव जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. त्याचबरोबर कोविड-१९ संदर्भात केंद्र व राज्य शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार व आवश्यक त्या उपाययोजना करून या निवडणुकांचा कार्यक्रम राबवावा. शिवाय राज्य निवडणूक आयोगाने १५ डिसेंबर २०२० रोजी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करावी, असेही निर्देश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहितीही श्री. मदान यांनी दिली.