बुधवार, 24 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

३० हजार कोटींच्या राष्ट्रीय महामार्गांना मंजुरी

Sunday, 7th December 2014 05:20:30 AM

 

गडचिरोली, ता़७

गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात सुमारे ३० हजार कोटी रुपये किंमतीच्या ६ राष्ट्रीय महामार्गांना मंजुरी मिळाली असून, लवकरच या कामांना सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती खा़ अशोक नेते यांनी आज (ता़७) पत्रकार परिषदेत दिली़ संसदेच्या चालू अधिवेशनात ५ डिसेंबरला आपण स्वतंत्र विदर्भाचा अशासकीय ठराव मांडल्याचेही त्यांनी सांगितले़

खा़ अशोक नेते यांनी सांगितले की, गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात दळणवळणाची उत्तम व्यवस्था होण्याच्या दृष्टिने राष्ट्रीय महामार्ग निर्मितीसंदर्भात आपण केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता़ त्याअनुषंगाने श्री ग़डकरी यांनी ६ राष्ट्रीय महामार्गांना मंजुरी दिली असून, त्यांची अंदाजपत्रकीय किंमत ३० हजार कोटींच्या आसपास आहे़ सिरोंचा-कालेश्वर हा ७ किलोमीटरचा ३६३ क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग, करंजी-वणी-घुग्गुस-मुल-गडचिरोली-छत्तीसगड सीमेपर्यंतचा ९३० क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग, साकोली-लाखांदूर-वडसा-गडचिरोली-आलापल्ली-सिरोचा हा ३५३ क्रमांकाचा महामार्ग, नागपूर-उमरेड-ब्रम्हपुरी-आरमोरी हा ३५३-डी क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग, निजामाबाद-मंचेरियल-सिरोंचा-जगदलपूर राष्ट्रीय महामार्ग व नागपूर-उमरेड-भिसी-चिमूर-वरोरा हा नवा राष्ट्रीय महामार्ग असे सहा राष्ट्रीय महामार्ग निर्माण करण्यात येणार आहेत़ या महामार्गांमुळे दळणवळणाची समस्या सुटणार असून, उद्योजकांना उद्योग निर्मिती करण्याचा मार्ग प्रशस्त होईल, असे खा़ नेते म्हणाले़ वडसा-गडचिरोली या रेल्वेमार्गासाठी राज्य व केंद्र सरकारने त्यांचा प्रत्येकी ५० टक्क्यांचा वाटा देण्याचे मान्य केले असून, लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल, असेही ते म्हणाले़ रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी नक्षलग्रस्त भागात रेल्वेच्या विकासासाठी प्राधान्याने निधी देण्याचे आश्वासन दिले असून, आलापल्ली येथे रेल्वे आरक्षण सुविधा निर्माण करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली़

आपण ५ डिसेंबरला लोकसभेत स्वतंत्र विदर्भाचा अशासकीय ठराव मांडला असून, लवकरच त्यावर संसदेत चर्चा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले़ यापूर्वी १९९८ मध्ये राज्याच्या विधिमंडळात आ़ सुधीर मुनगंटीवार यांनी स्वतंत्र विदर्भाचा अशासकीय ठराव मांडला होता, याची आठवणही खा़ नेते यांनी करून दिली़ वनकायद्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प रखडले आहेत़ शिवाय अन्य विकासात्मक बाबींची पूर्तता करतानाही वनकायद्याचा अडसर येतो़ तो दूर करण्यासंदर्भात  येत्या १२ डिसेंबरला लोकसभेत अशासकीय ठराव मांडणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले़

पत्रकार परिषदेला आ़ डॉ़ देवराव होळी, भाजपाचे जिल्हा सचिव डॉ़ भारत खटी, ज्येष्ठ नेते प्रकाश अर्जुनवार, सरचिटणीस श्रीकृष्ण कावनपुरे, सुधाकर येनगंधलवार, स्वप्नील वरघंटे, प्रतिभा चौधरी, रेखा डोळस, विलास भांडेकर, संजय बारापात्रे, पराग पोरेड्डीवार, प्राचार्य डी क़े़ मेश्राम उपस्थित होते़


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
X7EO4
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना