गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

आमदार भाई जयंत पाटील आणि शेकाप

Tuesday, 7th July 2020 05:17:46 AM

शेतकरी, कष्टकरी व शोषितांसाठी सातत्याने रस्त्यावरच्या लढाईबरोबरच विधिमंडळातही जे अनेक वर्षांपासून संघर्षरत आहेत; असे शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ.भाई जयंत पाटील यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्त हा खास लेख.

…………………………………….

आमदार भाई जयंत पाटील आणि शेकाप

आमचे नेते आमदार भाई जयंत पाटील यांचा आज जन्मदिन. भाईंना सर्वप्रथम निरोगी दीर्घायुष्यासाठी सदिच्छा व्यक्त करतो. रायगड जिल्ह्याबरोबरच सबंध महाराष्ट्रातील शेकाप व अन्य डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी आपापल्या परीने त्यांच्या भावना यानिमित्ताने व्यक्त केल्या आणि तशाच त्या पक्ष-चळवळीपलीकडे असणाऱ्या भाईंच्या चाहत्यांनी, हितचिंतकांनी, सहकारी मित्रांनीसुद्धा व्यक्त केल्या असणार, हे अगदी निःसंशय. याचे प्रमुख कारण म्हणजे पक्ष, विचारसरणी, राजकारण, समाजकारण या चौकटी भेदून समाजातील सर्वच स्तरातील लोकांशी भाईंचा असणारा वैयक्तिक सुसंवाद, स्नेह, जिव्हाळा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रामाणिक स्वभाव. एकूणच सर्वत्रच भाईंची शब्द पाळण्याची खासियत हा प्रशंसेचा आणि सर्वमान्यतेचा विषय आहे.

 सूर्यप्रकाशाइतके स्वछ असणारे भाईंचे कार्य ही जगन्मान्य बाब आहे. सहकार, शिक्षण, वित्तसंस्था, ग्रामीण स्वायत्तसंस्था, धर्मादाय संस्था, भूमिपुत्रांच्या हक्काचा संघर्ष, विधीमंडळात कष्टकरी आवाज बुलंद करणे, समाजकारण या सर्वच आघाड्यांवर कार्याचा धडाका, आवाका आणि तो सांभाळण्याची भाईंची क्षमता हा वादातीत विषय आहे. त्याचबरोबर भाईंची उद्योजक म्हणून असणारी शिस्त, सचोटी आणि प्रगती ही आश्चर्यजनक, मार्गदर्शक व अनुकरणीय आहे. आज समाजातील अन्य उद्योजकांकडे पाहिले, तर दिखाऊपणा, अप्रामाणिकपणा, संकुचित आत्ममग्न वृत्ती, कोणत्याही किमतीवर सांपत्तिक हव्यास हे अगदी सार्वत्रिक नियमांसारखे आढळते. परंतु याच निराशाजनक वाळवंटात, त्याच्या बरोबर उलट असा, भाईंचा साधेपणा, विनातडजोड व्यावसायिक प्रामाणिकपणा, उदारवृत्ती, आर्थिक विरक्ती या प्रकर्षाने जाणवणाऱ्या गोष्टी एखाद्या ओयासिससारख्याच म्हणाव्या लागतील. आम्ही नेहमी ऐकत असलेले भाईंचे वाक्य यानिमित्ताने नमूद करतो, ते म्हणतात, "जीवन जगण्यासाठी फार थोडा पैसा लागतो, व त्यापलीकडे जमा केलेला पैसा हा रद्दीसमान आहे, जर तुम्ही तो फक्त स्वतःपुरता जमा केला तर."

भारतीय शेतकरी कामगार पक्ष आणि भाई जयंत पाटील हे समीकरण काही नियमित सहज घटना नाही, तर या समीकरणास एक अतुट संबंध म्हणून आपण पाहिलं पाहिजे. या संबंधास खोतीविरोधी ऐतिहासिक, अतुलनीय शेतकरी संघर्षाची पार्श्वभूमी आणि वारसा आहे. तो वारसा तेव्हापासून आजवर आपले लोकाभिमुख सामाजिक राजकीय चरित्र आणि परंपरा यशस्वीपणे टिकवून आहे. शिवाय तो विस्तारण्याचा एक नितांत प्रामाणिक प्रयत्न भाई करताना आज दिसतात. साधारणतः २०१४ दरम्यान कम्युनिस्ट चळवळीच्या संबंधित व औरंगाबादहून प्रसिद्ध होणाऱ्या 'साप्ताहिक महाराष्ट्र' मधून एक कल्पनाविलासी आणि चळवळीतील असूया दर्शविणारा टीकात्मक असा 'रायगडची पाटीलकी' हा खोडसाळ व वैचारिक दिवाळखोरी दर्शविणारा लेख प्रसिद्ध केला गेला. परंतु याचा सडेतोड प्रतिवाद, पक्षाच्या विद्यार्थी संघटनेचे संस्थापक बलवडीचे भाई संपतराव पवार यांनी संबंधित संपादकांची खरडपट्टी काढत केला. त्यावर मात्र संपादकांनी प्रांजळपणे चूक मान्य करून भाई संपतराव पवार यांच्याकडून "रायगडची पाटीलकी नव्हे; तर जीवनसंघर्ष’’ हा तो सडेतोड प्रतिवाद लिहून घेऊन त्याच साप्ताहिकात खुल्या मनाने प्रसिद्ध केला. अशा या बेदाग परंपरेचा वारसा लाभलेले आपले भाई आजच्या काळातही अनेक राजकीय दगलबाजी पचवून कष्टकरी राजकारणाची मशाल घेऊन आमच्यासारख्या वैचारिक बांधिलकी असणार्‍या कार्यकर्त्यांना आश्वस्त करत पहाडासारखे उभे आहेत.

आज वाढदिवसाच्या औचित्यानिमित्ताने भाई आणि शेकाप-डावी चळवळ यावर व्यक्त होण्याचा मोह आवरणे कठीण आहे. शेकापचे अस्तित्व संपवण्याचे अनेक मार्ग अवलंबले गेले. त्यापैकी यशवंतराव चव्हाणांनी केलेल्या सुनियोजित फोडाफोडीपासून, पुलोदच्या जाळ्यात ओढण्याचे डावपेच असोत की, अगदी त्यानंतर नात्यागोत्याचा खांदा वापरून पक्षाच्या गेल्या एकांगी हेकेखोर नेतृत्वाखाली झालेली पक्षाची संघटनात्मक व राजकीय मोडतोड, या सर्व बाबी एक सुनियोजित भांडवली राजकारणाचा परिपाक होत्या. नेहरू मॉडेलने दुर्लक्षित शेती वाऱ्यावर सोडून देशाची कसलीही ठोस प्रगती होणार नाहीद्व तर उलट कालांतराने देशात एक शेती अरिष्ट उभे राहिल, ही शेकापची मूळ मांडणी आज तंतोतंत खरी ठरलेली दिसते आणि शेकापची महाराष्ट्रातील राजकीय प्रासंगिकता पुन्हा अधोरेखित झाली आहे. मेहुण्या पावण्यांच्या दिशाभूल करणाऱ्या राजकारणातून जनसंघासोबत सत्तासीन होण्याचा डाग रायगडच्याच युनिटने भाईंच्याच खंबीर भूमिकेतून 'वाजपेयी सरकार शेकापच्या एका मताने पाडून पूर्णपणे धुऊन टाकला आहे.

अनेक चढउतार व धक्क्यांनंतर व संघटनात्मक दृष्टीने विस्कळीत झाल्यावर भाईंच्याकडे पक्षाची राज्याची धुरा आली. पक्षाचा काँग्रेसविरोधी हक्काचा जनाधार राज्यातील तीन रिजनल पक्षांमध्ये विखुरला गेल्याची पार्श्वभूमी असूनसुद्धा या विपरित परिस्थितीत आज भाई संयमाने, नियोजनबद्ध पद्धतीने एकेक माणूस पक्षविस्ताराच्या मोहिमेत निवडून जोडत आहेत. भाईंनी पक्षाची वजाबाकी तर रोखलीच आहे; परंतु पक्षामध्ये आज आपणास वैचारिक संघटनात्मक बेरीजच झालेली दिसेल. गेल्या निवडणुकीत झालेल्या दगाफटक्यास आपण भाईंच्याच नेतृत्वाखाली प्रत्युत्तर देणार आहोत. परंतु नियतीने आपल्या पक्षासमोर आणि भाईंच्या खंबीर नेतृत्वाला पुन्हा एकदा महाराष्ट्रातील कष्टकरी जनहिताचा खरा राजकीय पर्याय बनण्याची एक विस्तृत संधीच दिली आहे, असे मला वाटते.

महात्मा फुलेंच्या सत्यशोधकी विचारांचा कृतीशील वारसा आणि कष्टकरी जनहिताच्या संघर्षास अखंड वाहून घेत सामाजिक योगदानाचे प्रेरणादायी संचित आज भाईंच्या पाठीशी आहे. यातूनच नव्या परिवर्तनाचा लोकाभिमुख संकल्प नक्कीच विस्तारू शकतो. आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते यापुढील सर्वच संघर्षात आणि वाटचालीत भाईंच्या सोबतच रहाण्याच्या निर्धारास भेटवस्तू म्हणून विनम्रपणे सादर करतो.

जय हिंद-जय महाराष्ट्र-लाल सलाम

 

भाई चंद्रशेखर नलावडे-पाटील

मध्यवर्ती सदस्य: शेतकरी कामगार पक्ष

सौजन्य: शेतकरी कामगार पक्ष,जिल्हा शाखा-गडचिरोली


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
5H0O5
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना