बुधवार, 24 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

अहेरी जिल्ह्याच्या निर्मितीसाठी गडचिरोलीत रास्ता रोको

Thursday, 4th December 2014 06:47:01 AM

 

गडचिरोली, ता़४ 

गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन करून अहेरी जिल्ह्याची निर्मिती करण्यात यावी, त्याचबरोबर स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे, या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीच्या वतीने आज ४ डिसेंबरला गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़

अहेरी जिल्हा कृती समितीने ३ डिसेंबरपासून गडचिरोलीत बेमुदत उपोषण सुरू केले आहे़ आज त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले़ समितीचे अध्यक्ष प्रज्ज्वल नागुलवार व राष्ट्रीय जनहितवादी युवा समितीचे अध्यक्ष सुरेश बारसागडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले़ यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे़ निवेदनात उपोषणकर्त्यांनी म्हटले आहे की, जिल्ह््याच्या पूर्व व दक्षिण भागाचा विकास अजूनही झालेला नाही़ मात्र, शासन कोट्यवधी रुपये खर्च करीत असल्याचा देखावा करीत आहे़ जिल्हा मुख्यालयापासून केवळ १० किलोमीटर अंतरावर गेल्यास अविकसितेचे दृश्य दिसून येते़ त्यामुळे शासनाच्या घोषणांमुळे विकास होणार नाही, तर स्वतंत्र विदर्भ हाच त्यासाठी पर्याय असून, अहेरी जिल्हा निर्मितीमुळे दक्षिण विभागात विकास होऊ शकतो, असे उपोषणकर्त्यांनी म्हटले आहे़ जारावंडी, कसनसूर,गट्टा, पेरमिली, जिमलगट्टा, आष्टी इत्यादी तालुक्यांची निर्मिती करावी, सिंचन प्रकल्प सुरू करावे, नद्यांवर बंधारे बांधावे, अतिक्रमीत शेतकºयांना जमिनीचे पट्टेू द्यावे, त्यांना सातबारा द्यावा, आदिवासींप्रमाणेच गैरआदिवासींनाही नोकरी द्यावी, ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, सुरजागड लोहप्रकल्प एटापल्ली तालुक्यातच उभारावा, रेल्वे मार्ग तत्काळ सुरू करावा, धानाला ४ हजार रुपये भाव देऊन पाचशे रुपये बोनस द्यावा इत्यादी मागण्यांसाठी आजचे आंदोलन करण्यात आले़ या आंदोलनात अमोल दुर्गे, अरविंद मोहुर्ले, सरिता पुुंगाटी, राकेश पुंगाटी, पायल बारसा,निर्मला ओंगुलवार, दीक्षा झाडे, अविनाश लटारे, बंडू मट्टामी, लालसू मट्टामी,सेंदा जोई, डुंगा आतलामी, लिंगो लेकामी,सुखास लकडा, बिरजा नरोटे यांच्यासह अहेरी, एटापल्ली, भामरागड, मुलचेरा इत्यादी तालुक्यांतील कार्यकर्ते सहभागी झाले होते़ यावेळी पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना अटक करून नंतर त्यांची सुटका केली़आंदोलनादरम्यान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार डॉ़ नामदेव उसेंडी आणि प्रदेश सचिव हसनअली गिलानी यांनी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शविला़

दरम्यान, सामूहिक तथा वैयक्तिक वनाधिकाराचे पट्टे देण्यासह अन्य मागण्यांसाठी राष्ट्रीय जनहितवादी युवा समितीच्या वतीने ३ डिसेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयापुढे बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे़ समितीचे अध्यक्ष सुरेश बारसागडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येत आहे़ आज ४ डिसेंबरलाही त्यांचे उपोषण सुरूच होते़


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
WX79E
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना