शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

बुद्धिप्रामाण्यवादी, विज्ञानवादी देश घडविण्यासाठी सज्ज व्हा:प्रा.श्याम मानव

Monday, 2nd March 2020 04:13:41 AM

गडचिरोली,ता.२: भूत कुठेही अस्त्विात नाही. चमत्कार हे निव्वळ हातचलाखीचे प्रयोग आहेत. त्यामुळे अशाप्रकारच्या अंधश्रद्धांना बळी न पडता बुद्धिप्रामाण्यवादी व विज्ञानवादी भारत घडविण्यासाठी सर्वांनी सज्ज व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक संघटक प्रा.श्याम मानव यांनी केले.

गोंडवाना विद्यापीठ व महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व.नसरुद्दीनभाई पंजवानी वाणीज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमान आरमोरी येथील म.गांधी कला, विज्ञान महाविद्यालयात आयोजित जादुटोणाविरोधी कायदा जनजागृती कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष किशोर वनमाळी हे होते. यावेळी अनिसंचे प्रकल्प संचालक सुरेश झुरमुरे, सिनेट सदस्य अॅड. गोविंद भेंडारकर, मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष नूरअली पंजवानी, अनिसंचे राज्य संघटक हरिभाऊ पाथोडे, सिनेट सदस्य प्रा.संध्या येलेकर, प्रा.डॉ.कावळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार, प्रा.डॉ.विजय खोंडे, डॉ. प्रकाश धोटे, जगदीश बद्रे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.लालसिंग खालसा उपस्थित होते.

प्रा.श्याम मानव यांनी सुरुवातीला ७०० वर्षांपासूनची संत परंपरा आणि फुले-शाहू-आंबेडकर-प्रबोधनकार ठाकरे परंपरेने राज्यात लोकजागृतीचे काम केल्याचे सांगून जादुटोणाविरोधी कायद्याच्या निर्मितीच्या प्रक्रियेचा इतिहास, त्यातील अडथळे आणि विविध टप्प्यांविषयीची माहिती दिली. त्यानंतर प्रा.मानव यांनी या कायद्यातील प्रत्येक कलम, त्यांचा अर्थ आणि शिक्षेच्या तरतुदीविषयी विस्तृत विवेचन केले.

समर्थ रामदास आणि शिवरायांची कधीही भेट झाली नाही. तरीही ते आपल्या माथी मारण्यात आले. संत ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली, संत तुकाराम सदैव वैकुंठाला गेले, असे पद्धतशीरपणे लोकांच्या मनात बिंबविण्यात आले. या सर्व बाबी खोट्या असून, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम व संत गाडगेबाबा हे विज्ञानवादी संत आहेत. त्यांनी अंधश्रद्धेच्या विरोधात कठोर प्रहार केल्याचे प्रा.मानव यांनी संतांच्या विविध ओव्या आणि अभंगांचे दाखले देत सांगितले.

भूत अंगात येणे, देवी येणे हा मानसिक आजार आहे. कुणाच्या अंगात भूत येणे हा गुन्हा नाही. शिवाय भूत उतरविण्यासाठी पूजा-अर्चा करणे, प्रार्थना करणे हादेखील गुन्हा नाही. परंतु भूत उतरविण्यासाठी त्या व्यक्तीला मारहाण करणे हा गुन्हा आहे, असे प्रा.मानव यांनी स्पष्ट केले. भूत अस्तित्वातच नाही. ‘भूत दाखवा आणि २५ लाख रुपयांचं बक्षिस मिळवा’ असं जाहीर आव्हान अनिसंने दिलं होतं. परंतु गेल्या ३८ वर्षांत कुणीही हे आव्हान स्वीकारलं नाही, असे प्रा.मानव म्हणाले.

भुताप्रमाणे चमत्कारांचंदेखील अस्तित्व नाही. चमत्कार म्हणजे निव्वळ हातचलाखीचे प्रयोग आहेत. त्यांना बळी पडून कुणीही बाबा, बुवांच्या नादी लागू नये, असे आवाहन प्रा.मानव यांनी केले.

अनिसंचे प्रकल्प संचालक सुरेश झुरमुरे, अॅड.गोविंद भेंडारकर, किशोर वनमाळी, प्रा.डॉ.कावळे यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले. प्राचार्य डॉ.लालसिंग खालसा यांनी प्रास्ताविकातून कार्यशाळेच्या आयोजनामागची भूमिका विशद केली. प्रा.सीमा नागदेवे यांनी संचालन केले. या कार्यशाळेला गोंडवाना विद्यापीठांतर्गत विविध महाविद्यालयांचे प्राध्यापक, नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
IJ60H
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना