गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

मार्कंडा यात्रेला शिवभक्तांची अलोट गर्दी

Friday, 21st February 2020 02:34:04 AM

गडचिरोली,ता.२१: विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडादेव येथे आजपासून महाशिवरात्री यात्रेस प्रारंभ झाला आहे. राज्याचे रोहयो राज्यमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते आज पहाटे मार्कंडादेव येथील शिवलिंग व मार्कंडेय ऋषींची पूजा-अर्चा करण्यात आली.

गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील  मार्कंडादेव येथील हेमाडपंथी मार्कंडेय  देवालय हे खजुराहो येथील देवळासारखे दिसते. ही देवळे यादव काळापूर्वीची असल्याचे मानले जाते.  देवळाचा गाभारा  ११०० वर्षे पुरातन असून, आकर्षक नक्षीकामाने  नटलेला आहे.  

वैनगंगा नदीच्या डाव्या तिरावर बांधलेले हे प्राचीन देवस्थान असून, येथे वैनगंगा नदी  उत्तर वाहिनी होते. त्यामुळे भाविकांच्या दृष्टीने हे देऊळ विशेष महत्त्वाचे समजले जाते. दरवर्षी महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते. या यात्रेला महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांसह  शेजारच्या छत्तीसगड, मध्यप्रदेश व आंध्रप्रदेश या राज्यांतूनही भाविक ‘हर हर महादेव’चा गजर करीत लाखोच्या संख्येने येतात.

मंदिर परिसरात पूजा, आरती व भाविकांना मंदिरात जाण्याची व्यवस्था मार्कंडेश्वर देवस्थान ट्रस्टकडून करण्यात आली आहे.  पाच दिवस चालणाऱ्या या यात्रेसाठी पोलिस विभागाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. यात्रेकरुंच्या सोयीसाठी गडचिरोली आगाराने ६० विशेष बसफेऱ्या उपलब्ध केल्या आहेत. याशिवाय अहेरी आगार आणि चंद्रपूर जिल्ह्यातील मुल येथील आगारातूनही बसेस उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

जयंत निमगडे पीटीसी गडचिरोली

प्रशासन व स्वयंसेवी संस्थांची मदत

या यात्रेत विविध शासकीय विभागांनी योजनांच्या माहितीचे स्टॉल लावले आहेत. शिवाय विविध स्वयंसेवी संस्थांनी यात्रेकरुंसाठी पाणपोई, भोजनालय व अन्य सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत.

वैरागड, अरततोंडी येथेही यात्रेस प्रारंभ

आरमोरी तालुक्यातील वैरागड येथेही हेमाडपंथी मंदिर आहे. शिवाय कुरखेडा तालुक्यातील अरततोंडी आणि चामोर्शी तालुक्यातील चपराळा येथेही देवालय आहे. या दोन्ही ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरते. अरततोंडी येथील देवस्थानात आ.कृष्णा गजबे यांच्या हस्ते पहाटे शिवलिंगाची पूजा करण्यात आली. मनिष शर्मा यांनी पौरोहित्य केले.याप्रसंगी सेवानिवृत्त मुख्याध्यापक नानाजी खुणे, मुनेश्वर लांजेवार, अॅड.. प्रमोद  बुद्धे, उपसरपंच साईनाथ खुणे, खुशाल फुलबांधे, विवेक बुद्धे, तारेंद्र डहाळे व भाविक उपस्थित होते

या यात्रेदरम्यान भगवान महादेव देवस्थानचे अध्यक्ष डॉ.तेजराम बुद्धे,  नाना नाकाडे, कुरखेडा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक समीर केदार, कुरखेड्याचे नगराध्यक्ष रवींद्र गोटेफोडे, यांनी भेट देऊन महादेवाचे दर्शन घेतले

यात्रेदरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात हभप दुनेदार महाराज यांचे शिवमहिमा व एकनाथी भागवत, उमराव बहेटवार व सहयोगी चिखली यांचे अखंड संगीत रामायण, गुरुदेव सेवा मंडळाचे भजन यांचा समावेश आहे.

"क"दर्जाचं पर्यटन स्थळ

या ठिकाणाला शासनाने 'क' दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून घोषित केले असले; तरी अजूनपर्यंत विकासकामांना सुरवात झाली नाही. याकडे लोकप्रतिनिधीनी लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
EHGZJ
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना