शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

गडचिरोली जिल्हा परिषदेच्या सभापतिपदांवर भाजप-राष्ट्रवादी युतीचे वर्चस्व

Friday, 17th January 2020 12:13:14 AM

गडचिरोली,ता.१६: जिल्हा परिषदेच्या सभापतीपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला पराभव पत्करावा लागला. विषय समित्यांच्या चारही सभापतिपदांवर भाजप-राष्ट्रवादी युतीने विजय मिळविला.

समाजकल्याण सभापतिपदावर भाजपच्या रंजिता कोडापे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदावर रोशनी पारधी, तर उर्वरित दोन समित्यांच्या सभापतिपदांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे युद्धिष्ठिर बिस्वास व भाजपचे प्रा.रमेश बारसागडे यांची वर्णी लागली.

उपजिल्हाधिकारी(भूसंपादन) धनाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा परिषदेच्या सभागृहात सभापतिपदाच्या निवडणुकीसाठी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला ५१ पैकी ५० सदस्य उपस्थित होते. काँग्रेसच्या वनिता सहाकाटे गैरहजर होत्या.

समाजकल्याण सभापतिपदासाठी काँग्रेसचे प्रभाकर तुलावी, प्रल्हाद कऱ्हाडे, अॅड.राम मेश्राम व भाजपच्या रंजिता कोडापे या चार जणांनी सहा अर्ज भरले होते. राम मेश्राम यांनी आपला अर्ज मागे घेतला. प्रभाकर तुलावी यांना शून्य मते मिळाली. रंजिता कोडापे यांना २६, तर त्यांचे प्रतिस्पर्धी प्रल्हाद कऱ्हाडे यांना २३ मते मिळाली. रंजिता कोडापे विजयी झाल्या. काँग्रेसच्या मनिषा दोनाडकर तटस्थ राहिल्या.

महिला व बालकल्याण सभापतिपदासाठी आविसं-काँग्रेस आघाडीच्या अनिता आत्राम, रुपाली पंदिलवार, सुनीता कुसनाके व भाजप-राकाँ युतीच्या रोशनी पारधी या चार उमेदवारांनी ६ अर्ज भरले होते. त्यापैकी आविसंच्या अनिता आत्राम व सुनीता कुसनाके यांनी आपले अर्ज मागे घेतले. या निवडणुकीत भाजप-राकाँ युतीच्या रोशनी पारधी २५ मते घेऊन विजयी झाल्या. त्यांच्या प्रतिस्पर्धी रुपाली पंदिलवार यांना २४ मते मिळाली. काँग्रेसचे प्रल्हाद कऱ्हाडे तटस्थ राहिले.

उर्वरित बांधकाम व कृषी आणि पशुसंवर्धन समित्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जगन्नाथ बोरकुटे, रासपचे अतुल गण्यारपवार, राकाँचे युद्धिष्ठिर बिस्वास, भाजपचे प्रा.रमेश बारसागडे, काँग्रेसचे रवींद्र शहा व मनिषा दोनाडकर या  सहा जणांनी नऊ अर्ज भरले होते. त्यापैकी जगन्नाथ बोरकुटे व मनिषा दोनाडकर यांनी आपले अर्ज मागे घेतले. सर्वप्रथम युद्धिष्ठिर बिस्वास यांना २७ मते मिळाली. बिस्वास यांना विजयी घोषित करण्यात आले. रवींद्र शहा व रमेश बारसागडे यांना प्रत्येकी २४ मते मिळाली. त्यामुळे ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली. यात रमेश बारसागडे विजयी झाले. बिस्वास व बारसागडे या दोघांच्या समित्यांचे वाटप जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात येणार आहे.

३ जानेवारीला झालेल्या निवडणुकीत काँग्रेस-आविस आघाडीचे अजय कंकडालवार अध्यक्ष तर मनोहर पोरटी उपाध्यक्ष झाले. परंतु आता चारही समित्यांवर विरोधक विराजमान झाले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या राजकारणात मजा येणार आहे. 

जखमी सदस्य आले स्ट्रेचरवर

या निवडणुकीसाठी सकाळी अपघातात जखमी झालेल्या भाजपच्या चारही सदस्यांना रुग्णालयातून स्ट्रेचरवर सभागृहात आणण्यात आले. त्यांनी मतदानात भाग घेतला. मात्र, सभापतिपदाची निवडणूक किचकट असल्याने अत्यंत गंभीर अवस्थेत चौघांनाही तब्बल साडेतीन तास सभागृहात राहावे लागले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
VHFAA
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना