शनिवार, 20 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

गडचिरोलीतील शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची विमानाने 'इस्रो' सहल

Wednesday, 15th January 2020 05:52:56 AM

गडचिरोली,ता.१५ : जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळेतील ५० विद्यार्थ्यांना अभ्यास सहलीतून 'इस्रो' या भारताच्या अंतराळ संशोधन संस्थेला भेट देण्याची संधी मिळाली आहे. गडचिरोली, अहेरी व भामरागड या तीन प्रकल्पातील एकूण ४३ आश्रमशाळा व दोन एकलव्य शाळेतील एकूण ५० विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षेतून करण्यात आली होती. ७ ते १४ जानेवारी या कालावधीत ही सहल आयोजित करण्यात आली होती.

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रकल्प अधिकारी डॉ.इंदूराणी जाखड यांच्या संकल्पनेतून  'भारतभ्रमण' या  नावीण्यपूर्ण उपक्रमातून ही अभ्यास सहल आयोजित करण्यात  आली. या सहलीदरम्यान दुर्गम व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना विमानाने दक्षिण भारतातील महत्वाची ठिकाणे यावेळी दाखविण्यात आली. विद्यार्थ्यांना जिल्हयाबाहेरील जग पाहता यावे, तसेच ते जवळून अभ्यासता यावे, शालेय जीवनातच चांगल्या शिक्षणातून चांगल्या ठिकाणी काम करु शकतो, याचे ज्ञान त्यांना घेता यावे, हा उद्देश या सहलीचा असल्याचे प्रकल्प अधिकारी डॉ.इंदूराणी जाखड यांनी सांगितले.

या अभ्यास सहलीदरम्यान दक्षिण भारतातील बँगलोर, म्हैसूर, वायनाड, कोची  या ठिकाणी भेटी देण्यात आल्या. यावेळी 'इस्त्रो' अंतरळ संस्था, नेहरु प्लॅनेटोरियम, एअरोस्पेस संग्रालय, कोची येथील मरीन ड्राईव्ह इत्यादी ठिकाणी भेटी दिल्या. पर्यटनाचा आनंदही विद्यार्थ्यांनी यावेळी घेतला. मैसूर झू, इस्कॉन मंदिर, विविध पॅलेस, संग्रहालय, बोटींग या ठिकाणीही त्यांनी भेटी दिल्या. यातील जवळजवळ सर्वच मुले अगदी गडचिरोली जिल्हयाच्या बाहेरही याअगोदर गेलेली नव्हती. या सहलीतून त्यांनी अगदी विमानाने प्रथमच  'भारतभ्रमण' केले असे म्हणता येईल. सहली वरुन परत आल्यावर भेटी दरम्यान आलेले अनुभव इतरांना सांगण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन इंग्रजी माध्यम आश्रमशाळा, सेमाना रोड येथे करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, प्रकल्प अधिकारी डॉ.इंदुराणी जाखड यांनी मुलांशी संवाद साधला. प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांनी अभ्यास सहलीतील आलेले अनुभव जिल्हाधिकाऱ्यांशी शेअर केले. यावेळी विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी यांनी मिळालेल्या ज्ञानाचा वापर आपल्या जीवनात निश्चित करा असा संदेश दिला.

 ‘’गडचिरोली जिल्हयातील दुर्गम भागातील मुलांना शालेय जीवनात प्रोत्साहन मिळावे, हा सहलीचा हेतू होता. यामुळे त्यांनाही भविष्यात उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील किंवा त्यांना तशा उच्च ठिकाणी काम करण्याची संधी मिळेल यासाठी अशा अभ्यास सहलीतून त्यांची मानसिक तयारी आपोआपच साधेल’’ अशी प्रतिक्रिया प्रकल्प अधिकारी डॉ.इंदुराणी जाखड यांनी व्यक्त केली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी या सहलीचा लाभ आमच्या जीवनात नक्कीच होईल आणि आम्हीही मोठ्या पदावर जाण्याचा प्रयत्न करु, अशा भावना व्यक्त केल्या.

या सहलीच्या आयोजनामध्ये सहायक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी विशेष प्रयत्न केले. सहलीमध्ये समन्वयक म्हणून अनिल सोमनकर, भास्क्‍र मदनकर, गजेंद्र सोनोने, निरमा ढाकरे, सविता शेंडे यांनी काम पाहिले.

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
11401
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना