शुक्रवार, 19 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  गडचिरोली: संवेदनशील ६८ मतदान केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट             गडचिरोली:तपासणी पथकाने जप्त केली ११ लाखांची रोकड             धर्मरावबाबा आत्राम आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण गरम           

गडचिरोली जिल्हा परिषदेवर काँग्रेस-आविसं आघाडीची सत्ता

Friday, 3rd January 2020 06:31:07 AM

गडचिरोली,ता.३: आज झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस-आदिवासी विद्यार्थी संघाच्या आघाडीने बाजी मारली. अध्यक्षपदी अजय कंकडालवार, तर उपाध्यक्षपदी मनोहर पोरेटी विजयी झाले. या निवडणुकीत भाजपच्या ४ सदस्यांनी काँग्रेस उमेदवाराच्या बाजूने मतदान केले. यामुळे अडीच वर्षे जिल्हा परिषदेवर असलेली भाजपची सत्ता संपुष्टात आली.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस-आविसं आघाडीचे अजय कंकडालवार यांना २९ तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे नामदेव सोनटक्के यांना २२ मते मिळाली. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस-आविसं आघाडीचे मनोहर पोरेटी यांना २९, तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजप-राकाँ आघाडीचे युद्धिष्ठिर बिस्वास यांना २२ मते मिळाली.

आज जिल्हा परिषदेच्या सभागृहात सकाळी ११ वाजतापासून अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला. पीठासीन अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील यांनी काम पाहिले. दुपारी २ वाजतानंतर निवडणूक घेण्यात आली. ५१ सदस्यीय जिल्हा परिषदेत भाजप २०, काँग्रेस १५, आदिवासी विद्यार्थी संघ ७, राष्ट्रवादी काँग्रेस ५, अपक्ष(रासप) २ व अपक्ष(ग्रामसभा) २ असे पक्षीय बलाबल आहे. अध्यक्षपदासाठी काँग्रेस-आविसं आघाडीतर्फे अजय कंकडालवार व उपाध्यक्षपदासाठी मनोहर पोरेटी यांनी नामनिर्देशनपत्र सादर केले. भाजप-राकाँ आघाडीतर्फे अध्यक्षपदासाठी नामदेव सोनटक्के, तर उपाध्यक्षपदासाठी युद्धिष्ठीर बिस्वास रिंगणात होते. परंतु अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या नीता साखरे, विद्या आभारे, श्रीदेवी पांडवला व शिल्पा रॉय, तसेच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ सदस्य जगन्नाथ बोरकुटे, अतुल गण्यारपवार व वर्षा कौशिक(दोन्ही रासप) यांनी काँग्रेसच्या बाजूने मतदान केले. यामुळे काँग्रेस-आविसं आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना २९, तर भाजप-राकाँ उमेदवारांना २२ मते मिळाली. ग्रामसभांचे उमेदवार अॅड. लालसू नोगोटी व सैनू गोटा यांनी भाजप-राकाँ उमेदवारांना मतदान केले.

निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांनी अध्यक्ष व उपाध्यक्षांची ढोल ताशांच्या निनादात रॅली काढून फटाक्यांची आतषबाजी केली. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, माजी आमदार दीपक आत्राम, काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव हसनअली गिलानी, युवक काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष पंकज गुड्डेवार, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, महासचिव कुणाल पेंदोरकर, काँग्रेसच्या अनुसूचित जाती आघाडीचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, आविसं नेते नंदू नरोटे, रवी सल्लम, बानय्या जनगाम व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
JE50S
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना