शनिवार, 28 मार्च 2020
लक्षवेधी :
  गडचिरोली जिल्ह्यात ३२२ वाहनधारकांवर कारवाई, ८१ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल-पोलिसांची कारवाई             आधारभूत धान खरेदी केंद्रे आता ३१ मेपर्यंत सुरु राहणार-आ.कृष्णा गजबे यांच्या पाठपुराव्याला यश, शेतकऱ्यांना दिलासा             कोरोना-गडचिरोली जिल्ह्यात बाहेरुन आलेल्या ५९५० प्रवाशांची नोंद, सर्व जण प्रशासनाच्या देखरेखीखाली             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           
bg1

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

एका सीडीपीओने परसबागेतून फुलविले बालक आणि मातांचे जीवन!

Friday, 27th December 2019 03:23:31 AM

गडचिरोली,ता.२५: सरकारी अधिकारी म्हटलं की तो शासकीय चाकोरीतूनच योजनांची अंमलबजावणी करतो. अनेक जण केवळ सरकारी काम आहे आणि ते करायचेच आहे, म्हणून शासकीय योजनांकडे बघतात. मात्र, मुलचेरा पंचायत समितीचे बालविकास प्रकल्प अधिकारी विनोद हटकर यास अपवाद असावेत. श्री.हटकर यांनी स्वकल्पनेतून अंगणवाड्यांमध्ये परसबागा निर्माण केल्या आणि त्यातून फुलले ते निरागस बालके, गरोदर आणि स्तनदा मातांचे जीवन!

हो, विनोद हटकर हा अफलातूनच माणूस आहे. मूळ नांदेड जिल्ह्यातला हा गृहस्थ. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या शाळेत एक तप  मास्तरकी केल्यानंतर हटकर यांनी २०१६ ला राज्यसेवेची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर ते बालविकास प्रकल्प अधिकारी झाले. जुलै २०१७ ला पहिली पदस्थापना झाली ती गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा पंचायत समितीत. हा तालुका बंगाली भाषिकबहुल लोकांचा आहे. तेथे रुजू झाल्याबरोबर महिनाभर त्यांनी एकच काम केले-अंगणवाड्यांना भेटी देण्याचे! अंगणवाडीत मुलं येत नाही, असं त्यांच्या लक्षात आलं. सेविकांना विचारलं तर मुलं आताच गेली, असं त्यांचं ठरलेलं उत्तरअसायचं. नंतर त्यांनी सर्व अंगणवाडीसेविकांची बैठक बोलावली. आधी मास्तरकी केल्यामुळे मुलांना कसं समजून घ्यायचं आणि त्यांची शिक्षणात रुची कशी वाढवायची, याविषयीची कला हटकर यांना अवगत होती. त्यामुळे अंगणवाडीच्या आवारातच एक परसबाग लावण्याचा विचार हटकर यांनी बैठकीत मांडला. यामुळे खिचडीची चव न्यारी येईल, मुलांची गोडी वाढेल आणि शासनाचे पैसे वाचतील व सर्वांचा वेळही वाचेल, असे हटकर यांनी स्पष्टकेलं. परंतु सुरुवातीला विरोध झाला. पुन्हा बैठक घेतली. सर्वांना विश्वासात घेतलं. मग, होकार मिळत गेला.

सुरुवातीला कोथिंबिर आणि टमाटर लावायचं ठरलं. ताजे कोथिंबिर आणि टमाटर खिचडीत मिळू लागल्याने मुलांचं अंगणवाडीत येण्याचं प्रमाण वाढू लागलं. काही दिवसांनी परसबागेत कोथिंबिर व टमाटरबरोबरच फुलकोबी, मुळा, पालक, मेथी व अन्य भाजीपाल्यांचीही लागवड करण्यात आली. बघताबघता तालुक्यातील ११६ अंगणवाड्यांमध्ये परसबागा तयार झाल्या. कुठे १० बाय २०, तर कुठे १२ बाय १५ फूट जागेत भाजीपाला लागवड झाली. त्यातील ताजा सेंद्रिय भाजीपाला मुले, गर्भवती व स्तनदा मातांना मिळू लागला. अन्नाची चव स्वादिष्ट असल्याने मुलांचे अंगणवाडीत येण्याचे प्रमाण वाढू लागले. कुपोषितांच्या संख्येत घट होऊन्‍ ते धष्टपुष्ट दिसू लागले. महिलांच्या रक्तातील हिमोग्लोबिन व जीवनसत्वांचे प्रमाणही वाढले. अंगणवाडी पर्यवेक्षिका प्रतिमा बांबोळे व अमरी विश्वजीत रॉय यांच्यासह बालविकास विभागातील कर्मचारीही हटकर यांना सहकार्य करु लागले. अंगणवाडी सेविकाही आवडीने हातपंपाचे पाणी रोपांना देऊन ते जगविण्यासाठी प्रयत्नशिल आहेत. वसंतपूर येथील अंगणवाडी सेविका शांती विनय चक्रवर्ती यांनी सांगितले की, परसबागेच्या उपक्रमामुळे बालकांच्या कुपोषणात घट झाली असून, महिलांचे हिमोग्लोबिनही वाढले आहे.

प्रस्तुत प्रतिनिधीने मुलचेरा तालुक्यातील धन्नूर, वसंतपूर, मच्छिगट्टा इत्यादी अंगणवाड्यांना भेटी दिल्या असता विनोद हटकर नामक सीडीपीओचा हा ‘हटके उपक्रम’ लक्षवेधी असल्याचे निदर्शनास आले. गावातील बालके आणि मातांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने गावकरीही आनंदित दिसले. राज्यभरातील बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांसाठी आदर्श ठरावा असा उपक्रम आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च २०१८ पासून देशभरात पोषण अभियान सुरु केले आहे. गर्भवती व स्तनदा माता आणि बालकांना प्रभावीपणे एकाच छताखाली पौष्टिक आहार सेवा उपलब्ध करणे, हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. हा हेतू साध्यकरण्याचा प्रयत्न एका सीडीपीओने करुन दाखविला आहे. या उपक्रमासाठी अंगणवाडी पर्यवेक्षिका, मदतनीस, कर्मचारी या सर्वाचे सहकार्य लाभले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ.विजय राठोड खंबीरपणे पाठीशी राहिले. त्यामुळेच हा उपक्रम सुरु करु शकलो, असे श्री.हटकर यांनी सांगितले.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
88J4S
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना