शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020
लक्षवेधी :
  बालिकेवर अतिप्रसंग करणाऱ्यास १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा- विशेष सत्र न्यायालयाचा निवाडा             कार अपघातात प्रा.कालिदास टिकले व प्रा. विद्या टिकले हे शिक्षक दाम्पत्य ठार, कुरखेडा-देसाईगंज मार्गावरील कसारी फाट्यानजीकची घटना             गडचिरोली येथे विविध मोक्क्याच्या ठिकाणी वाजवी दरात प्लॉटस् व जमिनी विक्रीसाठी उपलब्ध-संपर्क साधा ९४२१७२८५५१           

आमचे मत - तुमचे मत

गडचिरोली --°C --°C

जनमताचा कौल

प्रश्न : कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याबाबत शासन चालढकल करीत आहे, असे वाटते काय?
होय :
94%
नाही :
6%

धर्म व परंपरेची चिकित्सा न केल्यानेच बहुजन समाज बौद्धिक गुलामगिरीत-डॉ.आ.ह.साळुंखे

Thursday, 12th December 2019 02:48:48 PM

गडचिरोली,ता.१२: धार्मिक ग्रंथ व ऋषीमुनींनी सांगिलेल्या बाबी ह्याच अंतिम सत्य, असे आपण मानत राहिलो. कारण येथे माणसाला चिकित्सा करण्याचा अधिकार नव्हता. म्हणूनच आपल्या पूर्वजांना अज्ञान व गरिबीच्या गर्तेत शेकडो वर्षे घालवावी लागली. जोपर्यंत धर्म व परंपरेची चिकित्सा होणार नाही; तोपर्यंत बौद्धिक गुलामगिरीच्या तुरुंगातून बहुजन समाजाची सुटका होणार नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व साहित्यीक डॉ.आ.ह.साळुंखे यांनी केले.

येथील सेलिब्रेशन फंक्शन सभागृहात विविध सामाजिक संघटनांच्या वतीने ‘विवेक जागर’ या कार्यक्रमांतर्गत डॉ.साळुंखे यांचा अमृतमहोत्सवी सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते प्रा.दिलीप चौधरी, तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा.अर्जुन्‍ जाधव व प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे उपस्थित होते.

डॉ.आ.ह.साळुंखे पुढे म्हणाले की, गौतम बुद्धानं व्यक्ती म्हणून स्वत:ला अलिप्त केलं होतं. त्यांनी ‘बुद्धं सरणं गच्छामी’ असं सांगितलं. म्हणजे ‘मी ज्ञानी माणसाला शरण जातो’ असा त्याचा अर्थ होतो. महात्मा बसवेश्वरांनीही ‘हा आमचा हा आमचा’ असा बंधुत्वाचा संदेश दिला. केवळ ज्ञान आणि एखाद्या विचाराच्या मुळाशी जाण्याच्या लालसेनेच चीनमधील बौद्ध भिक्खू हयूएन त्संग याने हाल अपेष्टा सहन करीत, लांब प्रवास करीत भारताचा दौरा केला. जोपर्यंत आपण ज्ञानावरची निष्ठा जपणार नाही;तोपर्यंत पर्यायी संस्कृती उभी करता येणार नाही, असे डॉ.साळुंखे म्हणाले.

३-४ हजार वर्षे बहुजनांना कसलाही अधिकार नव्हता. त्यामुळे आमच्या पूर्वजांना अंधकारमय आयुष्य  जगावं लागलं. आता यातून डोकं मुक्त करण्याची वेळ आली आहे. धर्म, परंपरेची चिकित्सा केल्याशिवाय बहुजनांची बौद्धिक तुरुंगातून मुक्तता होणार नाही. चिकित्सा केल्यामुळेच युरोपची प्रगती झाली. अरिस्टॉटलचा सिद्धांत गॅलिलिओने खोडून काढला, धर्मग्रंथांनी सांगितलेला सिद्धांत कोपरनिकसने खोटा ठरवीत पृथ्वी सूर्याभोवती फिरते, असं सांगितल आणि कोपरनिकसच्या पुढे जाऊन ‘पृथ्वी सूर्याभोवती लंबवर्तुळाकार फिरते’ असं केपलरनं सांगितलं, असं डॉ.साळुंखे यांनी स्पष्ट केलं. चार्वाकानं माणूस हा विवेक व बुद्धी यामुळे वेगळा आहे. त्यामुळे धर्मग्रंथांनी सांगितलेलं स्वीकारणार नाही. स्वातंत्र्य हाच मोक्ष आहे, असं सांगितलं. त्यापुढे जाऊन गौतम बुद्धानं इतरांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, असं सांगितलं आणि हीच गोष्ट बहुजनांसाठी क्रांतिकारक ठरत आहे, असे डॉ.आ.ह.साळुंखे यांनी विविध दाखले देत स्पष्ट केलं.

डॉ.साळुंखे यांनी सावित्रीबाई फुले ह्या भारतीय स्त्री जीवनातील मोठा अपवाद असल्याचं सांगून त्यांनी सहन केलेल्या हालअपेष्टांमुळेच आजच्या महिलांची प्रगती झाल्याचं प्रतिपादन केलं. अलिकडेच झालेल्या जागतिक सर्वेक्षणानुसार, भारतातील बहुसंख्य तरुणांकडे नव्या काळात जगण्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य नसेल. त्यामुळे २०३० पर्यंत या तरुणांची अवस्था अत्यंत बिकट झालेली असेल. त्यामुळे राष्ट्रीय ऐक्य टिकवायचं असेल, तर भावी पिढीला कोणता विचार देणार आहोत, याचा गंभीरपणे विचार व्हावा, असे ठाम मत डॉ.साळुंखे यांनी मांडले.

अध्यक्षस्थानावरुन प्रा.दिलीप चौधरी म्हणाले की, बहुजनांकडे उज्जवल परंपरा आहे. तरीही आपण पराभूत होत राहतो. महापुरुषांनी केवळ विद्रोहच केला नाही, तर नवा पर्याय दिला. शत्रू कोण याविषयीची स्पष्टता असूनही आपण हरलो, तर पुढची पिढी आपणास माफ करणार नाही, असा इशारा प्रा.चौधरी यांनी दिला. यापुढे संस्कृतीकरण झालेला समाजच जीवंत राहील व मूल्यांवर आधारित जीवनच टिकेल, असे प्रा.चौधरी म्हणाले. प्रा.अर्जुन जाधव यांनी आपल्या भाषणात विवेक जागर कार्यक्रमाची रुपरेषा मांडली.

याप्रसंगी विविध सामाजिक संघटनांच्या वतीने डॉ.आ.ह.साळुंखे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन प्रा.डॉ.नरेंद्र आरेकर, तर आभार विलास निंबोरकर यांनी मानले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
V5NGU
  © 2014 - 2015 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना