शुक्रवार, 29 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

अबुझमाडच्या जंगलात २ नक्षलवाद्यांना कंठस्नान

Saturday, 30th November 2019 07:28:46 AM

 

गडचिरोली,ता.३०: भामरागड तालुक्यातील लाहेरीपलिकडील अबुझमाड जंगलात आज सकाळी झालेल्या चकमकीत पोलिसांनी दोन नक्षल्यांना कंठस्नान घातले आहे, तर ३ ते ४ नक्षली गंभीर जखमी झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. २ डिसेंबरपासून नक्षल्यांनी पीपल्स गुर्रिल्ला आर्मीचा स्थापना सप्ताह साजरा करण्याचे फर्मान सोडले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांचे  हे मोठे यश मानले जात आहे.

अबुझमाड जंगलात नक्षल्यांचे शिबिर सुरु असून, ते घातपात करण्याचा डाव आखत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कालपासून अभियान राबविण्यास सुरुवात केली. त्यावेळी पोलिसांची नक्षल्यांशी चकमक उडाली. त्यानंतर आज सकाळी पोलिस पुन्हा घटनास्थळाकडे गेले असता नक्षलवादी अॅम्बुश लावून बसले होते. नक्षल्यांनी आयईडी स्फोटही घडवून पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन नक्षली ठार झाले. त्याचे मृतदेह, तसेच चार बंदुका, एक प्रेशर कूकर, वायर, स्फोटक साहित्य, पुस्तके, तांदूळ, गहू, औषध व दैनंदिन वापराचे साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले.  या चकमकीत तीन ते चार नक्षली गंभीर जखमी झाल्याचा अंदाजही पोलिसांनी वर्तविला आहे.

पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी २७ नोव्हेंबरच्या रात्री कोरची तालुक्यातील भिमनखोजी येथील मनोज दयाराम हिडको या १७ वर्षीय युवकाची गोळ्या घालून हत्या केली  होती. तसेच अहेरी तालुक्यातील पेरमिली गावाजवळ झाडे आडवी टाकून व बॅनर बाधून रस्ता अडविला होता. मात्र, सप्ताह सुरु होण्यापूर्वीच्‍ कसनसूर दलमच्या कमांडरसह सहा नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले, तसेच आजच्या कारवाईत दोन नक्षली ठार झाल्याने नक्षल्यांचे मनसुबे उद्वस्त झाले आहेत.

 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
WEAE2
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना