गुरुवार, 25 एप्रिल 2024
लक्षवेधी :
  रानटी हत्तीने घेतला शेतकऱ्याचा बळी, भामरागड तालुक्यात दहशत             दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक             हेडरीत रक्तदान शिबिर: लॉयड्सच्या ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान             मतदानाची अंतिम टक्केवारी:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ७१.८८ टक्के मतदान           

२० ते २४ नोव्हेंबरदरम्यान अमेरिकेत डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांची बीजभाषणे

Monday, 11th November 2019 11:55:11 PM

 

गडचिरोली,ता.१२ : ‘अमेरिकन सोसायटी ऑफ ट्रॉपिकल मेडिसीन अँड हायजीन’च्या ६८ व्या वार्षिक संमेलनात बीजभाषणासाठी पद्मश्री डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांना निमंत्रित करण्यात आले आहे.  वॉशिंग्टननजीक गेलॉर्ड नॅशनल रिसॉर्ट अँड कन्वेंशन सेंटर, नॅशनल हार्बर, मेरीलँड येथे २० ते २४ नोव्हेंबर दरम्यान हे संमेलन आयोजित आहे. संमेलनाच्या प्रारंभिक सत्रात दोघेही उपस्थितांना संबोधित करणार आहेत. 

उष्णकटिबंधीय प्रदेशातील संसर्गजन्य रोग आटोक्यात आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना, सेवा व सुविधांवर व्यापक चर्चा या संमेलनात विविध सत्रांमध्ये होणार आहे. डॉ. अभय बंग आपल्या बीजभाषणात ‘लोकांसाठी व लोकांसोबत आरोग्य संशोधन’ या विषयावर बोलणार आहेत तर डॉ. राणी बंग ‘स्त्रियांना ऐकणे व समजून घेणे’ या विषयावर बोलणार आहेत. या भेटीत डॉ. अभय बंग हे जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठ, सेव्ह द चिल्ड्रेन व अॅटलांटाचे एमरी विद्यापीठ येथेही आरोग्याचे नवीन संशोधन व प्रयोगावर भाषणे देणार आहेत.   

 १९०३ मध्ये स्थापन केलेली अमेरिकन सोसायटी ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन अँड हायजीन ही उष्णकटिबंधीय संसर्गजन्य रोगांचे जगभरातील ओझे कमी करण्यासाठी आणि जागतिक आरोग्य सुधारण्यासाठी समर्पित असलेली तज्ज्ञांची सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक संस्था आहे. वैज्ञानिक पुरावे तयार करून आणि त्याचे एकत्रीकरण करून आरोग्य धोरणे ठरविण्यास सहकार्य करण्याचे काम ही संस्था करीत आहे. उष्ण कटिबंधीय प्रदेशातील तसेच जागतिक आरोग्य संशोधनासाठी आर्थिक सहकार्य करण्याचे आवाहन ही संस्था सातत्याने करीत आहे.

डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांचे शिक्षण अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ येथे १९८३ साली झाले. त्यानंतरच्या ३५ वर्षात त्यांनी ग्रामीण व आदिवासींच्या आरोग्यावर केलेले काम व संशोधन जगभर गाजली आहेत. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने त्या दोघांना आल्युम्नाय अवॉर्ड तसेच सोसायटी फॉर स्कॉलर्स या सर्वोच्च सन्मानांनी सन्मानित केले आहे. सेव्ह द चिल्ड्रेसचा तसेच कोअर संघटनेचा डोरी स्टार्म्स अवॉर्ड डॉ. अभय बंगांना मिळाला आहे. ते दोघेही मॅकऑर्थर फाउंडेशन पुरस्कार विजेते आहेत. वर्ष २००५ मध्ये त्यांना ‘टाईम’ नियतकालिकाने या दोघांना ग्लोबल हेल्थ हीरो म्हणून सन्मानित केले आहे.


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
WDAOX
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना