शुक्रवार, 29 मार्च 2024
लक्षवेधी :
  अखेर मार्कडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ             गडचिरोली: जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या           

४७० गावांमध्ये दारुमुक्त निवडणुकीचे ठराव

Saturday, 19th October 2019 06:29:53 AM

 

गडचिरोली,ता.१९:एका दिवसावर असलेली विधानसभा निवडणूक दारूमुक्त करण्यासाठी तसेच शुद्धीत राहून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गडचिरोली जिल्ह्याच्या १२ तालुक्यांतील ४७० गावांनी ग्रामसभा व गावसभा घेऊन निवडणुकीदरम्यान दारूचा वापर होऊ देणार नसल्याचे ठराव पारित केले आहेत. निकोप लोकशाहीसाठी शुद्धीत राहूनच मतदान करण्याचा निर्धार गावांनी व्यक्त केला आहे.

गडचिरोली जिल्ह्यात १९९३ पासून कायदेशीर दारूबंदी आहे. पण त्याचे पालन होत नसल्याने छुप्या मार्गाने दारूची विक्री होते. हा प्रकार थांबविण्यासाठी २०१६ पासून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी मुक्तिपथ अभियान सुरू केले. या अभियानाच्या माध्यमातून दारूविक्री रोखण्यासाठी व्यापक प्रयत्न व जनजागृती केली जात आहे. या प्रयत्नांमुळेच आजवर जिल्हयातील ६०० गावांनी दारूविक्री बंद केली आहे. पण निवडणूक काळात उमेदवारांकडून मतदारांना दारूचे आमिष देऊन त्यांचे अमूल्य मत विकत घेण्याचा प्रकार घडतोही बाब बळकट लोकशाहीसाठी धोक्याची ठरतेत्यामुळे ही विधानसभा निवडणूक दारूमुक्त करण्यासाठी एक मोहीम मुक्तिपथ अभियानाद्वारे सुरू करण्यात आली. या अंतर्गत जिल्ह्यातील तब्बल ४७० गावांनी निवडणूक दारूमुक्त करण्याचे ठराव घेतले. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गावात दारू वाटप होऊ देणार नाही तसेच मतदान दारूच्या नशेत करणार नाही असे ठराव सभेत पारित केले. गावागावांमध्ये रॅली काढून दोन पैशाच्या दारूसाठी आपले अमूल्य मत विकू नका, निवडणूक दारूमुक्त करण्याचा संकल्प करा, ज्याला दारूबंदी नको  तो आमदार आम्हाला नको अशा घोषणा देत जनजागृती केली.

नवर्‍याला दारू पाजणार्‍यास नक्कीच पाडू

दारूमुक्त निवडणुकीच्या लढ्यात गावागावातील महिलांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. निवडणूक काळात पुरूषांना दारूचे आमिष दिले जाते. याचा परिणाम त्यांच्या मतदानावर होतो. सोबतच गावातील दारूबंदी प्रभावित होते. त्यामुळे नवर्‍याला दारू पाजणार्‍या उमेदवाराला मत देणार नसल्याची ठाम भूमिका महिलांनी घेतली आहे.

तालुकानिहाय ठराव घेणारी गावे

जिल्ह्यातील १२ ही तालुक्यातील ४७० गावांनी दारुमुक्त निवडणुकीचा निर्धार केला आहे. यामध्ये चामोर्शी तालुक्यातील ५४, देसाईगंज १९, एटापल्ली ७७, सिरोंचा ५२, कुरखेडा २८, धानोरा ३५, गडचिरोली ६४, मुलचेरा १७, आरमोरी ३४, कोरची २६ आणि भामरगड तालुक्यातील ६४ गावांचा समावेश आहे. 


तुमची प्रतिक्रिया लिहा

नाव :
ई-मेल :
संपर्क क्रमांक :
अभिप्राय:

(इंग्रजी किंवा मराठी लिहिण्यासाठी ctrl+g या कळ दाबा)
45SAG
  © 2014 - 2024 Gadchiroli Varta, All Rights Reserved ®
Designed & Developed By Rakesh Dongarwar

आमच्याबददल | संपर्क साधा | सुचना